क्रांतिसिंह नाना पाटील
.
क्रांतिसिंह नाना पाटलांच्या प्रतिसरकारमधील आघाडीचे सेनानी, तुफान सेनेचे कॅप्टन, ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी कॅप्टन रामचंद्र ऊर्फ रामभाऊ श्रीपती लाड (वय १०१) यांचे शनिवारी सायंकाळी तासगाव येथे निधन झाले. शनिवारी सकाळी प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांना पलूस येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचारांनंतर त्यांना पुढे तासगाव येथील खासगी रुग्णालयात नेण्यात आले. तेथे सायंकाळी त्यांचे निधन झाले.
सातारा जिल्ह्यात क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या नेतृत्वाखाली ९ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट यादरम्यान १९४२ साली प्रतिसरकार स्थापन झाले . इंग्रजांची राजवट जुमानायची नाही,आपणच आपलं सरकार बनवायचं ही या सरकारची मूळ कल्पना होती. या सरकारमध्ये क्रांतिवीर नागनाथअण्णा नायकवडी, क्रांतिअग्रणी जी डी लाड,किसन वीर,पांडुरंग पाटील उर्फ पांडू मास्तर यांच्यासारखे लढाऊ तरुण सहभागी झाले.
न्यायदानाच्या अंमलबजावणीसाठी व जनतेच्या संरक्षणासाठी प्रति सरकारने ५००० सैनिकाचे पोलिस दल उभारले होते त्या दलाचे नाव होते 'तुफान सेना' .
या तुफान सेनेचे कॅप्टन होते आदरणीय रामभाऊ लाड.
प्रतिसरकारचा १४ कलमी कार्यक्रम असा होता
१) अट्टल गुंड व दरोडेखोरांचा बंदोबस्त व पूर्ण बिमोड.
२) महिलांची छेड काढणाऱ्यांना किंवा छळ करणाऱ्यांना जरब बसवून जरूर त्यास कठोर शिक्षा.
३) भरमसाठ व्याज आकारून चाललेली सावकारी नष्ट केली. सावकारी पाशातून गोरगरिबांची मुक्तता केली.
४) काळाबाजार करणाऱ्यांचा पूर्ण बंदोबस्त.
५) अनैतिक गुन्हे करणाऱ्यांना शिक्षा.
६) सक्तीने वसुली करणाऱ्या अधिकाऱ्यांना गावातून कायमचे पळवून लावणे.
७) गावागावातून संपूर्ण दारूबंदी करणे.
८) उपद्रवी चोर व समाजकंटकांना गप्प बसवले.
९) पाटील, तलाठी, पोलीस हस्तक व खबरे आणि साक्षीदारांना प्रथम ताकीद देऊन नंतर आवश्यकतेनुसार दंड करणे.
१०) अत्यल्प खर्चात लग्न करण्याची प्रथा सुरू केली.
११) गावोगावी सार्वजनिक वाचनालय व साक्षरता वर्ग सुरू केले.
१२) सरकारी खजिना किंवा दंड या विविध प्रकारांनी जमा झालेल्या पैशाच्या वाटपावर नियंत्रण
१३) ग्रामसफाई कार्यक्रम कटाक्षाने राबविला.
१४) वारसा हक्क, खरेदी, बक्षीस किंवा मृत्युपत्राव्यतिरिक्त सर्व प्रकारच्या वादांवर न्यायदान मंडळाने निवाडे दिले.
वरील कार्यक्रम राबविण्यासाठी प्रतिसरकारच्या हेतू पूर्तीसाठी आझाद सेना व तुफान सेना त्यांची स्थापना करण्यात आली होती.
भाऊनी स्वातंत्र्यचळवळीच्या लढाईनंतर हैदराबाद मुक्तिसंग्रामात भाग घेतला. लोकनेते उद्धवरावदादा पाटील यांच्या खांद्याला खांदा लावून त्यानी रझाकारांचा बंदोबस्त केला. मराठवाड्यात त्यानी रझाकारांच्या विरोधात लढणाऱ्या सैनिकांच्यासाठी शस्त्र प्रशिक्षण केंद्रे सुरू केली. त्यानंतर गोवा मुक्ती आंदोलनातही सहभाग घेतला. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात तर भाऊंचे गाव अग्रभागी होते.त्यांचे ज्येष्ठ सहकारी जी डी बापू लाड या लढ्यात एक महत्त्वाचे नेते होते.या चळवळीत भाऊंनी खड्या आवाजात ‘बेळगाव, निपाणी, कारवारसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे’ ही घोषणा अजूनही लोकांच्या लक्षातून गेलेली नाही.
संपूर्ण आयुष्य वेगवेगळ्या लढाईत घालवलेला कॅप्टनभाऊ नावाचा माणूस जन्माला आला तो गरीब कुटुंबात.मोठे झाल्यावर जवळपास असलेल्या किर्लोस्कर कारखान्यात ते नोकरीला लागले. पण त्याचदरम्यान चळवळ सुरू झाली मग कसलीही पर्वा न करता नोकरी सोडली.चळवळीत अनेक अवघड मोहिमा फत्ते केल्या. तुफान सेनेचे कॅप्टनपद कर्तृत्वाने सिद्ध केले. इंग्रजी राजवटीच्या बळावर गोरगरीब लोकांना छळणाऱ्या गावगुंडांना अद्दल घडवली. त्यावेळी या क्रांतिकारकांचा बंदोबस्त करण्यासाठी इंग्रजी सरकारने दरोडेखोरांना हाताशी धरले होते.पोलिसांची साथ मिळाल्यामुळे दरोडेखोर मातले होते. अपसिंगेचा म्हातारबा आणि हिवतडचा दत्त्या हे दोन दरोडेखोर असेच होते. या दोघांचा भाऊंनी असा बंदोबस्त केला की कोणत्याही दरोडेखोराने भाऊंचे नाव ऐकले तरी ते थरथर कापत.
भाऊंनी इतिहास घडवला आहे तसेच तो लिहिलाही आहे. ‘सातारचा रोमहर्षक इतिहास’, ‘असे आम्ही लढलो’ या दोन पुस्तकांतून त्यांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी घडवलेला इतिहास सगळ्यांच्या समोर आणला आहे. या पुस्तकात त्यांनी स्वातंत्र्यचळवळीत सहभागी असलेल्या सहकाऱ्यांच्या व्यक्तिरेखा लिहिल्या आहेत. मराठी भाषेतला हा महत्त्वाचा व्यक्तिरेखा संग्रह आहे.
nice articals
उत्तर द्याहटवा