वासुदेव सीताराम बेंद्रे
जन्म. १३ फेब्रुवारी १८९४ रोजी पेणमध्ये.
इतिहास संशोधकांचे मुकुटमणी वि. का. राजवाडे यांना गुरू मानून वासुदेव सीताराम बेंद्रे यांनी त्यांची संशोधनाची परंपरा एकनिष्ठेने पुढे चालवली. शिवाजी महाराजांचा देदीप्यमान इतिहास अथक संशोधन करून महाराष्ट्रालाच नव्हे, तर जगाला दाखवून देण्याचं अभूतपूर्व कार्य बेंद्रे यांनी केलं आहे. शिवाजी महाराजांच्या जन्मतारखेबद्दल त्यांनी अथक संशोधनाअंती सांगितलेली १९ फेब्रुवारी १६३० ही तारीख आता राज्य सरकारतर्फे ग्राह्य धरली गेली आहे. तसंच त्यांनीच परिश्रमान्ती शोधून काढलेलं, डच चित्रकाराने काढलेलं शिवाजी महाराजांचं तैलचित्र आता अधिकृत चित्र म्हणून ओळखलं जातं. संभाजी राजांची पराक्रमी, संकटाला धीरोदात्तपणे तोंड देणारी, धोरणी, मुत्सद्दी अशी तेजस्वी प्रतिमा लोकांसमोर आणण्याचं श्रेय बेंद्रे यांचंच. तसंच संभाजीराजांची वढू गावाची समाधीसुद्धा त्यांनीच शोधून जगासमोर आणली होती.
त्यांचं ‘साधन चिकित्सा’ हे पुस्तक इतिहास संशोधन करणाऱ्या प्रत्येकाने अभ्यासायला हवं असंच! ऐतिहासिक स्थानांच्या किंवा व्यक्तींच्या दंतकथानुसार न जाता प्रत्यक्ष संशोधनाअन्ती पुराव्यांसह इतिहास उलगडण्याचं अत्यंत सचोटीचं आणि सडेतोड काम त्यांनी आयुष्यभर केलं.
बेंद्रे यांनी चार कोटींहून अधिक पानांच्या पेशवा-दप्तराच्या दस्तऐवजाचं वर्गीकरण आणि जुळणी करण्याचं, तसंच कॅटलॉगिंगचं क्लिष्ट काम पूर्ण केलं. त्यांचं आणखी अत्यंत महत्त्वाचं योगदान म्हणजे संत तुकारामाच्या गाथेत तीन गुरूंचा नामोल्लेख करणाऱ्या केवळ एका अभंगाच्या आधारे त्यांनी त्यांचा साधार शोध घेण्याचा प्रयत्न केला आणि महत्त्वपूर्ण माहिती मिळवली. त्यांच्या ग्रंथामुळे संत तुकारामविषयक अभ्यासाला एक स्वतंत्र परिमाण मिळालं आहे.
छत्रपती शिवाजी महाराज पूर्वार्ध आणि उत्तरार्ध, Maharashtra Of The Shivshahi Period, शिवराज्याभिषेक प्रयोग, संत तुकारामांचे अप्रकाशित अभंग, छत्रपती संभाजी महाराज, राजाराम महाराज चरित्र, साधन-चिकित्सा, तुकाराम महाराज यांचे संत-सांगाती, देहूदर्शन, महाराष्ट्रेतिहासाची साधने, महाराष्ट्रेतिहासाचे संशोधन क्षेत्र व साधनसंपत्ती, राणा जयसिंग आणि शिवाजी महाराज, शीघ्रध्वनी- लेखनपद्धती – मराठी, A Study Of Muslim Inscription, Downfall of "Angre's Navy", Stenography For India, Tarikh-I-Ilahi : Akbar's Devine Era असे त्यांचे ग्रंथ प्रसिद्ध आहेत. वासुदेव सीताराम बेंद्रे यांचे १६ जुलै १९८६ रोजी निधन झाले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा