विशेष प्रश्नमंजुषा टेस्ट सोडवा सर्टिफिकेट मिळवा

समाजकारण /राजकारण

मी विजय भुजबळ ग्रेट इंडियन या ब्लॉगवर सहर्ष स्वागत करत आहे WELCOME TO MY BLOG GREAT INDIAN THANKS FOR VISIT MY BLOG AND FOLLOW MY BLOG
FOLLOW MY BLOG


 

Translate /ब्लॉग वाचा जगातील कोणत्याही भाषेत

नारायण भिकाजी परुळेकर उर्फ नानासाहेब_परुळेकर

‘सकाळ’ वृत्तपत्राचे संस्थापक संपादक, प्रेस ट्रस्ट ऑफ इंडियाचे माजी अध्यक्ष नारायण भिकाजी परुळेकर उर्फ नानासाहेब_परुळेकर यांचा जन्म.२० सप्टेंबर १८९७ रोजी गोडची, जि.कोल्हापूर येथे. 

आपल्या शिक्षणाचा उपयोग लोकशिक्षणासाठी झाला पाहिजे असे नानासाहेबांना कायम वाटत असे.

१९२९ साली नानासाहेब परुळेकर आपले अमेरिकेतील शिक्षण पूर्ण करून भारतात परतले. आपल्या दहा वर्षांच्या परदेशातल्या वास्तव्यात त्यांनी तेथील पत्रकारिता जवळून अनुभवली. फ्रेंच, जर्मन आणि अमेरिकन वृत्तपत्रांत बातमीदारी केली. आधुनिक पत्रकारिता, वाचकाभिमुख दैनिक, आपला वाचक वर्ग, दैनिकाचे स्वरूप या संबंधीचे त्यांचे आडाखे याच काळात निश्चित झाले.

खरं तर ते भारतात आले त्या वेळी स्वातंत्र्य चळवळीत उडी घ्यायचंही त्यांच्या मनानं घेतलं होतं, पण पत्रकारितेकडं वळायची काही खास कारणं होती. एक तर आपल्या शिक्षणाचा उपयोग लोकशिक्षणासाठी झाला पाहिजे अशी त्यांची धारणा होती, आणि वृत्तपत्र माध्यम हे त्यासाठी प्रभावी माध्यम होते. दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे लोकमान्य टिळकांचं आयुष्य आणि कार्य हे नानासाहेबांचे आदर्श होते. त्यांनी देशसेवेला दिलेले प्राधान्य आणि केसरीमार्फत केलेले लोकजागृतीचे कार्य यांचा त्यांच्यावर प्रभाव होता. त्यांचा पिंड हा एका सत्याग्रहीपेक्षा एका पत्रकाराचा होता. त्यामुळे नानासाहेबांची पत्रकारिता निश्चित झाली.

नानासाहेब भारतात परतले तो काळ देशातील राजकीय अस्थिरतेचा तर होताच शिवाय आर्थिक मंदीचाही होता. नवीन व्यवसाय सुरू करायला वातावरण आजिबात अनुकूल नव्हते. पण त्याला न जुमानता नानासाहेब जोरदार तयारीला लागले. त्यांना मराठीपेक्षा इंग्रजी लिखाणाचा चांगला सराव होता. शिवाय त्या वेळी मराठी वृत्तपत्रांपेक्षा इंग्रजी वृत्तपत्रे तेजीत होती. त्यांना सरकार दरबारीही महत्त्व होते. याउलट मराठी वृत्तपत्रे मात्र कशीबशी तग धरून होती. मराठी दैनिकांची अवस्था फारच बिकट होती. त्यामुळे नानासाहेबांनी जेव्हा आपला मराठी दैनिक सुरू करण्याचा मनोदय बोलून दाखवला, त्या वेळी तात्यासाहेब केळकरांपासून अनेक नामवंतांनी त्यांना परावृत्त करण्याचा प्रयत्न केला. पण नानासाहेब आपल्या निर्णयावर ठाम होते. कारण प्रांतिक भाषेतील वृत्तपत्रांचे महत्त्व त्यांनी परदेशात असतानाच जाणले होते. शिवाय समाजातील मोठ्या वर्गाशी संवाद साधायचा असेल, तर प्रादेशिक भाषेशिवाय पर्याय नाही याची त्यांना जाण होती.

दैनिक काढण्यामागची नानासाहेबांची भूमिका खूप वेगळी होती. त्यांना वृत्तपत्राचे स्वरूप अधिकाधिक खुले करायचे होते. समाजातील सर्व थरांना त्यात सामावून घ्यायचे होते. आपल्या वृत्तपत्राने एखाद्या विषयाची तात्त्विक चर्चा न करता, त्यावर बोजड भाषेत लेख न लिहिता आसपास घडणार्यार लहानात लहान घटनांचा मागोवा घ्यावा अशी त्यांची भूमिका होती. असे केल्याने ते दैनिक अधिक वाचकाभिमुख होणार होते आणि ते वाचकाभिमुख झाले तरच येणार्याो भविष्यकाळात तगणार होते.

नानासाहेबांनी प्रत्यक्ष दैनिक सुरू करण्यापूर्वी त्या वेळच्या दैनिकांचा अभ्यास केला. त्याचा वाचकवर्ग कमी का हे तपासून पाहिले. त्यांना दिसून आले की, वाचकांना तपशीलात बातम्या तर मिळत नाहीतच, पण त्या ताज्याही मिळत नाहीत. त्यांनी एक परिपूर्ण मराठी दैनिक कसे देता येईल याचा विचार सुरू केला.

सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांना मराठी दैनिक यशस्वी करून दाखवायचं होतं. नानासाहेबांच्या तळागाळातल्या लोकांपर्यंत पोहोचण्याच्या उद्देशाला त्यांचा हा हेतू पूरकच होता. वृत्तपत्र सुरू करताना ते पारंपरिक वाचकवर्गाकडे न वळता नवीन वाचकवर्ग तयार करण्याच्या कामी लागले. त्यासाठी आपले धोरण आखतानाच स्वरूप वार्ताभिमुख ठेवले. दैनिक वृत्तपत्रात बातमीला किती महत्त्व आहे याचा अनुभव नानासाहेबांनी घेतला होता. त्यामुळे आपल्या वृत्तपत्राला त्यांनी प्रथम मतपत्राच्या रिंगणातून बाहेर काढले. 

वाचकांना ताजी बातमी देणे, केवळ राजकीय बातम्यांना प्राधान्य न देता शैक्षणिक, सासंकृतिक, सामाजिक बातम्यांनाही स्थान देणे, शहरातील विविध कार्यक्रमांचे वृत्तान्त, कोर्ट, पोलीस कचेरी येथून बातम्या मिळवणे यांवर नानासाहेबांनी भर दिला. ग्रामीण भागातील बातम्या मिळवण्यासाठी त्या भागांत वार्ताहर नेमले. मुंबई हे घटनांचे केंद्रस्थान आहे हे जाणून तिथे खास प्रतिनिधीची नेमणूक केली. वृत्तपत्राचे स्वरूप बदलताना नानासहेबांनी त्याच्या रचनेत, मांडणीत आणि भाषेतही मूलभूत बदल केले. साध्या, सोप्या आणि सुबोध भाषेचा वापर सुरू केला. बातमीबरोबर छायाचित्र देण्याचा पायंडा पाडला. वृत्तपत्रात दिवसभरातील अधिकाधिक बातम्यांना स्थान मिळावे म्हणून नानासाहेबांनीच प्रथम सत्रपाळी सुरू केली. थोडक्यात, आजच्या पत्रकारितेत पाळली जाणारी सर्व मूलभूत धोरणे नानासाहेबांनी त्या काळी निश्चित केली. आजची पत्रकारिता ही अशाप्रकारे नानासाहेबांच्या पत्रकारितेच्या विचारांवर उभी राहिली.

सुरूवातीला कुठल्याच भांडवलाचे पाठबळ त्यांना नव्हते. त्यांनी कुठल्याच राजकीय पक्षाची किंवा मतप्रवाहाची बांधिलकी मानली नाही त्यामुळे तिकडूनही मदत येण्याची शक्यता नव्हती. काही स्नेहीजनांनी मदतीचा हात पुढे केला, तरी त्यांना मोठ्या रकमेचे कर्ज घ्यावे लागले. पण केवळ एकट्याच्या हिमतीवर त्यांनी १ जानेवारी १९३२ रोजी ‘सकाळ’ चा पहिला अंक प्रकाशित केला. सुरुवातीची काही वर्षे नानासाहेबांसाठी खडतर गेली. आर्थिक मंदी आणि आर्थिक ओढाताण यांमुळे सर्व व्यवहार काटकसरीने करावे लागत. आर्थिक विवंचनेतून कुठे सुटका होते, तोपर्यंत संपादकीय आणि व्यवस्थापकीय समस्या डोकं वर काढत. पण नानासाहेब या सर्वांना पुरून उरले. सचोटीने व्यवहार करून त्यांनी ‘सकाळ’ ला यशाचा मार्ग दाखवला आणि त्यातून मिळणार्यात पैशाचा उपयोग आपला व्यवसाय आणखी वाढवण्यासाठी केला. उत्तरोत्तर प्रगती करताना त्यांच्या सकाळने जीवनाच्या विविधांगांनाही स्पर्श करण्याचा प्रयत्न केला. परदेशातील निवडणुका, ऑलिम्पिक सामने, रेस (घोड्यांच्या शर्यती), बाजार, ललित कला, संगीत, कीर्तनप्रचार सभा, नाट्यवाचन, ग्रंथपुरस्कार यासंबंधीच्या बातम्यांमुळे `सकाळ’ लवकरच सर्वसामान्यांपासून ते बौद्धिक जीवन जगणार्या् प्रत्येकाचा मित्र झाला. सकाळ सुरू केल्यानंतर वर्षभरातच नानासाहेबांनी ‘साप्ताहिक सकाळ’ हे स्वतंत्र साप्ताहिक सुरू केले, आणि ते सुरू करून काही दिवस होतायत तोवरच ‘तेज’ नावाचे एक कमी किंमतीचे दैनिकही सुरू केले. एकदा पुण्यातली वृत्तपत्रे मार्गी लावल्यावर आता मुंबईमध्येही वृत्तपत्र सुरू करण्याचे विचार नानासहेबांच्या डोक्यात घोळू लागले.

मुंबईतील दैनिकाचा विचार पक्का होताच नानासाहेबांनी २१ मार्च १९३६ रोजी ‘स्वराज्य’ दैनिक सुरू केले. पुढे ‘स्वराज्य’ चे दैनिक स्वरूप बदलून ते साप्ताहिक करण्यात आले आणि कालांतराने तर त्याची मुंबईतूनही उचलबांगडी झाली. ‘तेज’ दैनिक तर बंद पडलेच पण ‘सकाळ’लाही आर्थिक तूट भरून काढावी लागली. नानासाहेबांना तीस -चाळीस खटल्यांना तोंड द्यावे लागले. मानसिक क्लेशही सहन करावे लागले. १९८५ मध्ये 'सकाळ'च्या व्यवस्थापनात बदल झाला आणि त्याची सूत्रे ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे बंधू, उद्योजक प्रतापराव पवार यांच्याकडे आली. भारत सरकारने नानासाहेब परुळेकर यांना 'पद्मभूषण' सन्मानाने गौरविले होते. त्यांचे 'निरोप घेता' हे आत्मचित्र प्रसिद्ध आहे. नानासाहेब परुळेकर यांच्या जयंतीनिमित्त विविध विषयांवर आणि सामाजिक प्रश्नां वर सातत्याने लेखन करणाऱ्या ‘सकाळ’च्या बातमीदारांना दर वर्षी पुरस्काराने गौरविण्यात येते. स्वातंत्र्यसैनिक व ज्येष्ठ पत्रकार (कै.) ना. अ. पेंडसे यांनी दिलेल्या निधीतून हा पुरस्कार देण्यात येतो. नानासाहेब परुळेकर यांचे निधन ८ जानेवारी १९७३ रोजी झाले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा