*बॕरिस्टर नाथ बापू पै*
(स्वातंत्र्य सैनिक)
*जन्म : 25 सप्टेंबर 1922*
वेंगुर्ला , भारत
*मृत्यू : 18 जानेवारी 1971*
(वय 48)
राजकीय पक्ष : प्रजा सोशलिस्ट
पार्टी
खासदार, लोकसभा : 1957–
1971
मतदार संघ : राजापूर
नाथ बापू पै हे स्वातंत्र्य सैनिक, संसदपटू आणि निष्णात घटनातज्ञ. जन्म वेंगुर्ले येथे. तेथेच प्राथमिक शिक्षण. बेळगावच्या लिंगराज कॉलेजमधून अर्थशास्त्र घेऊन बी. ए. (१९४७). नंतर लंडनच्या लिंकन्स इनमधून बार अट लॉ (१९५५). त्यांचे वडील लहानपणीच वारले. आई तापी आणि वडीलबंधू अनंत (भाई) यांच्या संस्कारांचा नाथांच्या व्यक्तिमत्त्वाच्या घडणीत मोठा वाटा होता. संस्कृत, मराठी, इंग्रजी या भाषांवर त्यांनी लहानपणीच प्रभुत्व मिळविले व वक्तृत्व गुणाचाही परिपोष केला. विल्यम शेक्सपिअर, पर्सी शेली, जॉर्ज बायरन इत्यादींच्या साहित्याचे आणि विदग्ध संस्कृत वाङ्मयाचे परिशीलनही त्यांनी केले होते. १९६० साली क्रिस्टल मिशेल या ऑस्ट्रियन युवतीशी त्यांनी विवाह केला. त्या सध्या व्हिएन्ना येथे भारत सरकारच्या परराष्ट्र विभागात काम करतात. महाविद्यालयात असतानाच त्यांनी स्वातंत्र्य चळवळीत भाग घेण्यास सुरुवात केली.
तत्कालीन भूमिगत चळवळींमध्ये त्यांचा मोठा वाटा होता. टपाल-कचेऱ्या लुटणे, पोलीस-कचेऱ्यांवर हल्ला करणे इ. कारणांसाठी त्यांच्यावर त्यावेळी खटले भरण्यात आले. तुरुंगातील बेदम मारामुळे त्यांच्या हृदयावर विपरीत परिणाम झाला. १९४६ च्या प्राथमिक शिक्षकांच्या संपात, तसेच गोवामुक्ती आंदोलनात ते सहभागी झाले. १९४७ साली ते इंग्लंडला गेले. तेथील इंटरनॅशनल नाथ पै युनियन ऑफ सोशॅलिस्ट यूथचे ते सहा वर्षे अध्यक्ष होते. मजूर पक्षाच्या कामगार संघटनांतून काम करीत असताना फ्रेनर ब्रॉक्वे, रेजिनल्ड सरेनसन इ. मजूर नेत्यांशी त्यांचा निकटचा संबंध आला. गोवामुक्तीसाठी रोममध्ये पोर्तुगीज वकिलातीसमोर त्यांच्या नेतृत्वाखाली जोरदार निदर्शने करण्यात आली होती. ज्ञानसंपन्नत्ता व अखंड व्यासंगीवृत्ती तसेच गरिबांविषयीची कळकळ, हे त्यांचे स्थायीभाव होते. बेळगावच्या प्रश्नावर त्यांनी सतत लढा दिला. साराबंदी चळवळीत प्रामुख्याने भाग घेतले (१९६०). त्याच वर्षीच्या सरकारी नोकरांच्या संपाचे ते प्रमुख होते. त्यात त्यांना अटक झाली.
लोकसभेत त्यांचा स्पष्टवक्तेपणा, निर्भयपणा व चिकित्सक अभ्यास हे गुण दिसून येत. सुसंस्कृत राजकारणी (जंटलमन पोलिटिशिअन) अशा शब्दांत पं. नेहरूंनी त्याचा गौरव केला आहे. जगातील अनेक राष्ट्रांच्या राज्यघटनांचा त्यांचा सखोल अभ्यास होता. गोलकनाथ प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाविरुद्ध लोकसभेत त्यांनी घटनादुरुस्ती विधेयक मांडले. ‘ज्या घटनेत दुरुस्ती होऊ शकत नाही, ती मृतवत होय’, असे त्यांनी ठणकावून सांगितले. त्यांच्या या विधेयकाची राष्ट्रीय पातळीवर चर्चा झाली. रोजगारी हा मूलभूत हक्क आहे आणि तो देता येत नसेल, तर सरकारने बेकारी भत्ता मंजूर करावा, असेही एक विधेयक त्यांनी मांडले होते. आणि आणीबाणीत न्यायालयात दाद मागता येत नाही, म्हणून घटनेतील त्या संबंधीचे ३५९ वे कलम रद्द करावे, असेही विधेयक त्यांनी मांडले. आपली वाणी व बुद्धी त्यांनी जनहितासाठी राबविली. शासनसत्तेचे अधिष्ठान तत्त्वतः लोकशक्तीत असते, अशी त्यांची धारणा होती. कोकण रेल्वे व कोकण विकासासाठी ते आयुष्यभर झगडले.
१९७० मध्ये महाबळेश्वर येथे झालेल्या मराठी साहित्य संमेलनाचे ते उद्घाटक होते. चेकोस्लोव्हाकिया व हंगेरी या देशांतील रशियन सैनिकी कारवायांविरुद्ध लोकसभेत त्यांनी केलेली भाषणे उल्लेखनीय आहेत (१९५६). अशी त्यांची अत्यंत महत्त्वाची निवडक भाषणे लोकशाहीची आराधना (१९७२) या पुस्तकात संग्रहीत केलेली आहेत. हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी १७ जानेवारी १९७१ रोजी ते बेळगावला गेले. तेथील सभेत भाषण झाल्यावर हृदयविकाराने त्यांचे आकस्मिक निधन झाले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा