भारतरत्न महर्षी धोंडो केशव कर्वे !!
स्त्री-शिक्षण क्षेत्रातील दीपस्तंभ
आणि एका शतकातील सामाजिक व राजकीय घडामोडींचे मूर्तिमंत साक्षीदार.
महर्षी कर्वे यांचा जन्म रत्नागिरी जिल्ह्यातील शेरवली येथे झाला. त्यांना सामाजिक कामाची आवड त्यांचे गुरुजी सोमण मास्तर यांनी लावली. त्यांचे इंग्रजी तीन इयत्तांचे शिक्षण मुरूडला झाले. त्यापुढील शिक्षणासाठी ते मुंबईच्या ‘रॉबर्ट मनी हायस्कूल’मध्ये दाखल झाले. पाचव्या, सहाव्या व सातव्या इयत्तेत त्यांना शिष्यवृत्ती मिळाल्या. शाळेत असल्यापासूनच ते शिकवण्या करीत. त्यांची गणित शिकवण्यात ख्याती होती. १८८४ साली बी. ए. च्या विद्यार्थ्यांत ते गणितात पहिले आले होते.
सकाळी साडेचारला त्यांचा शिकवण्याचा कार्यक्रम सुरू होई. घरी आल्यानंतर रात्री ते पत्नी राधाबाईंना शिकवीत. राधाबाईंच्या मृत्यूनंतर पुनर्विवाह करायचाच तर विधवेशीच करायचा असे त्यांनी ठरविले. आपले स्नेही नरहरपंत यांची विधवा बहीण गोदूबाई हिच्याशी त्यांनी लग्न केले.
(या गोदूबाई म्हणजे पंडिता रमाबाईंच्या शारदा सदनमधील विधवा-विद्यार्थिनी होत.)
१८९१ मध्ये त्यांनी फर्ग्युसन कॉलेजात गणित शिकवायला सुरुवात केली. पुढे सुमारे २३ वर्षे त्यांनी फर्ग्युसनमध्ये अध्यापनाचे कार्य केले.
विधवा स्त्रियांच्या पुनर्विवाहांना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांनी ‘विधवा विवाह प्रतिबंध निवारक मंडळी’ स्थापन केली. या संस्थेच्या फंडाच्या व्याजाचा उपयोग पुनर्विवाहेच्छू विधवांच्या मदतीसाठी केला जात असे. १ जानेवारी, १८९९ रोजी त्यांनी पुण्यात ‘अनाथ बालिकाश्रम’ या संस्थेच्या कार्याची सुरुवात केली. (याच संस्थेला पुढे हिंगणे स्त्री शिक्षण संस्था म्हणून ओळखले जाऊ लागले. आज ही संस्था महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था म्हणून सुपरिचित आहे.) १९०० साली महर्षी कर्वे यांनी आश्रमासाठी पुण्याजवळ हिंगणे येथे एक झोपडीवजा घर बांधले. येथेच त्यांनी स्त्री-शिक्षणाच्या कार्याची सुरुवात केली.
१९०७ साली त्यांनी ‘महिला विद्यालयाची स्थापना केली. या विद्यालयात बालसंगोपन, आरोग्य,
गृहजीवन शास्त्र आदी विषयांचे
प्रशिक्षण महिलांना दिले जात होते. बदलत्या काळानुसार व गरजांनुसार कर्वे यांनी पुढे शिक्षणपद्धतीत व अभ्यासक्रमात अनेक सुधारणा केल्या. म. गांधी, स्वातंत्र्यवीर सावरकर, पं. नेहरू अशा अनेक मान्यवर नेत्यांनी प्रत्यक्ष हिंगणे येथे भेट देऊन महर्षी कर्वे यांच्या कार्याची प्रशंसा केली होती. १९१४ साली फर्ग्युसन कॉलेजमधून निवृत्त झाल्यानंतर त्यांना सारा वेळ आश्रम आणि महिला विद्यालयाकडे देता येऊ लागला. १९१६ साली त्यांनी जपानच्या धर्तीवर महिला विद्यापीठाची स्थापना केली. हे भारतातील पहिले महिला विद्यापीठमानले जाते. या विद्यपीठाच्या महाविद्यालयाचे कर्वे हे पहिले प्राचार्य झाले. पुढील वर्षी शिक्षकांना प्रशिक्षण देणार्या विद्यालयाची त्यात भर पडली. [या विद्यापीठाचे पुढे ‘श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी विद्यापीठ] (एस.एन.डी.टी. विद्यापीठ) - असे नामकरण करण्यात आले. या विद्यापीठात शिक्षणाचे माध्यम
मराठी होते. परंतु इंग्रजी या ज्ञानभाषेचे शिक्षण, नर्स (परिचारिका) प्रशिक्षण आदी विशेष अभ्यासक्रमही विद्यापीठात शिकवले जात असत.
खेड्यातील महिलांना शिक्षित करण्याच्या कार्याकडेही अधिक लक्ष द्यायला हवे असे ठरवून त्यांनी ‘महाराष्ट्र ग्राम प्राथमिक शिक्षण मंडळ’ नावाची संस्था उभी केली. समाजामध्ये समता यावी, अस्पृश्यतेचे निर्मूलन व्हावे या उद्देशाने त्यांनी तीनशे समविचारी सहकार्यांना बरोबर घेऊन १९४४ साली ‘समता संघ’ स्थापन केला. स्थापन केलेल्या संस्थांना त्यागी वृत्तीने सामाजिक कार्य करणारे कार्यकर्ते मिळण्यासाठी त्यांनी कार्यकर्ते घडवणार्या ‘निष्काम कर्ममठ’ या संस्थेची स्थापना सुरुवातीलाच केली होती .
अल्बर्ट आइनस्टाइन, मादाम मॉंटेसरी,
रवींद्रनाथ टागोर या विद्वानांनी त्यांच्या कार्याचा गौरव केला. १९४२ साली बनारस हिंदू युनिर्व्हसिटीने त्यांना मानद पदवी देऊन त्यांचा सत्कार केला. १९५५ साली त्यांना पद्मविभूषण सन्मान देऊन गौरविण्यात आले. १९५८ साली, वयाच्या शंभराव्या वर्षी त्यांना ‘भारतरत्न’ हा देशातील सर्वोच्च पुरस्कार प्रदान करण्यात आला.
महर्षी कर्वे यांना महाराष्ट्र ‘अण्णा’
या नावानेही ओळखतो. प्रत्येक क्षण
समाजाच्या सेवेसाठी जगलेले अण्णा सुमारे १०५ वर्षांचे कृतकृत्य जीवन जगले.
दुस-याना उपदेश देन फ़ार सोप असत , लोकांना उपदेश न देता, स्वत: पुण्यात पहीला जाहिर विधवा पुर्नविवाह करणारे, स्त्रीयांच्या स्वातत्र्यासाठी हक्कासाठी आयुष्य वेचणारे खरे खुरे महर्षी धोडॊ केशव कर्वे उर्फ़ आण्णासाहेब कर्वे या महात्म्याचा आज जन्म दिन... विनम्र अभिवादन !!
-----------------
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा