योगगुरू बी के एस अय्यंगार
जन्म. १४ डिसेंबर १९१८
शाळेत शिक्षक असलेले वडील कृष्णम्माचार आणि गृहिणी असलेली आई शेषम्मा यांच्या संस्कारात बी. के. एस. अय्यंगार यांचे बालपण गेले. बालपणापासूनच सतत कुठल्या ना कुठल्या आजारामुळे अय्यंगार घरीच झोपून असायचे. सततचे कुपोषण तसेच मलेरिया, टीबी, टायफॉइड, इन्फ्लूएन्झा या आजारांमुळे बालपणी बी. के. एस. अय्यंगार यांची प्रकृती अगदीच नाजूक होती. जेमतेम पाच वर्षाचे असताना अय्यंगार यांना कुटुंबीयांसोबत कायमचे बेंगळुरू येथे स्थलांतर करावे लागले. तिथेच आणखी चार वर्षांनी वडिलांचे निधन झाले आणि अय्यंगार यांना अल्पावधीतच जबाबदारीची जाणीव झाली. त्यांनी योगासने करण्याचा आणि योगासनांशी संबंधित विषयांवर सखोल अभ्यास करण्याचाच ध्यास घेतला.
कृष्णम्माचार्य यांच्या सल्ल्ल्यानुसार १९३७ मध्ये १८ व्या वर्षी बी. के. एस. अय्यंगार योगासनांचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी पुण्यात आले आणि कायमचे स्थिरावले. जिद्दू कृष्णमूर्ती, राजकीय नेते जयप्रकाश नारायण, व्हायोलीन वादक येहुदी मेनुहिन या मान्यवरांना बी. के. एस. अय्यंगार यांनी योगासनांचे प्रशिक्षण दिले. बेल्जियमच्या राणी एलिझाबेथ यांना ८० व्या वर्षी शिर्षासन करण्याचे प्रशिक्षण देण्याची किमया अय्यंगार यांनी केली होती. व्हायोलीन वादक येहुदी मेनुहिन यांच्यामुळे अय्यंगार विदेशातही योगासनांचे प्रशिक्षण वर्ग घेण्याची संधी मिळाली. योगासनांशी संबंधित विषयांवर अय्यंगार यांनी १४ पुस्तके लिहिली. ही पुस्तके जगातील १७ प्रमुख भाषांमध्ये भाषांतरित झाली आहेत. पत्नीच्या निधनानंतर १९७५ मध्ये बी. के. एस. अय्यंगार यांनी रमामणी अय्यंगार यांच्या नावाने योगप्रशिक्षण संस्था सुरू केली. ही संस्था आजही हजारो नागरिकांना देशाविदेशात योगासनांचे प्रशिक्षण देत आहे. योगगुरू बी. के. एस. अय्यंगार यांनी अय्यंगार योग, पातंजली योग, प्राणायाम या विषयांवर विपुल लेखन केले होते. केंद्र सरकारने अय्यंगार यांना १९९१ मध्ये पद्मश्री, २००२ मध्ये पद्मभूषण आणि २०१४ मध्ये पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित केले होते. टाइम मॅगझिनने २००४ मध्ये जगातील सर्वाधिक प्रभावी अशा १०० व्यक्तींच्या यादीत योगगुरू बी. के. एस. अय्यंगार यांचा समावेश केला होता.
बी. के. एस. अय्यंगारयांचे २० ऑगस्ट २०१४ रोजी निधन झाले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा