पुण्यात प्लेगची साथ सुरु असताना घराघरात घुसून आमच्या आया बहिणींच्या इभ्रतीवर हात टाकणाऱ्या रँड नावाच्या नराधमाचा चापेकर बंधूनी वध करुन त्याला यमसदनी धाडले होते.*
आज त्या ऐतिहासिक क्षणाला बरोब्बर १२४ वर्षे पूर्ण झाली.. चापेकर बंधूंच्या या साहसाला, या अतुलनीय पराक्रमाला त्रिवार वंदन..
२२ जून आला की लोकांना हटकून चापेकर बंधू - रॅंड आयर्स्ट - गणेशखिंड - 'गोंद्या आला रे' वगैरे गोष्टी आठवतात. वर्षोनवर्षे हेच सुरु आहे. चार ओळी श्रध्दांजली फेसबुकवर 'फेकली' की आपलं 'राष्ट्रीय कर्तव्य' झालं!
हे न करता मी आज काहीतरी वेगळं लिहीतोय.
वॉल्टर चार्ल्स रॅंड हा आय सी एस ऑफीसर होता. इंग्लंडमधल्या लिव्हरपूलजवळ त्याचं आयुष्य गेलं. १८९७ मध्ये त्याचा खून होण्यापूर्वी १३-१४ वर्षे तो भारतातच - खास करून मुंबईच्या आसपास होता. रॅंडचे कागद अभ्यासत असताना त्याच्या हस्ताक्षरातलं हे पत्र ब्रिटीश लायब्ररीत मिळालं. २३ सप्टेंबर १८८३ चं त्याच्या हस्ताक्षरातलं हे पत्र. तो अंडर सेक्रेटरीला लिहीतोय की त्याने मुंबईला जाण्यासाठी 'व्हिक्टोरीया' जहाजात जागा बुक केली आहे. पण त्याला अजून ऑफीशियल सेलिंग ऑर्डर्स (Sailing Orders) मिळालेल्या नाहीत. त्या डलविचला पाठविण्याची व्यवस्था व्हावी. २४ सप्टेंबरला हे पत्र इंडीया ऑफीसला मिळाले आणि २६ तारखेला त्याच्या सेलिंग ऑर्डर्स पाठवल्या गेल्यासुध्दा (हे सगळे तारखांचे शिक्के पत्रावर आहेत!)
त्याचा आणि आयर्स्टचा खून झाल्यावर ३ महिन्यांच्या आत श्रीमती रॅंड व श्रीमती आयर्स्ट ह्यांना स्पेशल पेन्शन सुरु झाले. श्रीमती रॅंड ह्यांना वार्षिक £१८७ व त्यांच्या मुलांना प्रत्येकी वार्षिक £२१ मिळत होते तर श्रीमती आयर्स्ट ह्यांना वार्षिक £१५० व त्यांच्या मुलांना वार्षिक £१५ मिळत असत. दोघेही ऑन-ड्यूटी मारले गेले असल्याने ही खास वाढीव दराने पेन्शने होती. हे सगळे पेन्शनचे कागद ब्रिटीश लायब्ररीत आहेत.
दामोदर चापेकरांच्या पत्नी दुर्गाबाई (ज्यांचे नावही आपल्याला माहीत नसते!) १८९७ मध्ये फक्त १७ वर्षांच्या होत्या. ह्या पुढे ६० वर्षे - म्हणजे १९५६ पर्यंत जगल्या - १९४७ मध्ये भारत स्वतंत्र झाल्यानंतर ९ वर्षे जगूनही ना त्यांना कोणते पेन्शन मिळाले ना कोणते त्यांचा नवरा स्वातंत्र्यसैनिक असल्याचे ताम्रपट - माझ्यामते २२ जूनची ही खरी शोकांतिका आहे!
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा