*तुकारामांचे अभंग इंग्रजीत नेऊन त्यांना 'ग्लोबल' करणारे लेखक दिलीप पुरूषोत्तम चित्रे अर्थात दि_पु यांचा जन्मदिन.
जन्म. १७ सप्टेंबर १९३८ बडोदा येथे.
दिलीप पुरूषोत्तम चित्रे अर्थात 'दि.पु.' हे रुईया कॉलेजमधून पदवी व मुंबई विद्यापीठातून पदव्युत्तर शिक्षण घेतल्यानंतर ते इथिओपिया, अमेरीका, भोपाळ अशा ठिकाणी कामाच्या निमित्ताने राहिले. वयाच्या चौदाव्या वषीर्च त्यांनी लेखनाला सुरुवात केली. वडील पुरुषोत्तम चित्रे बडोद्यात 'अभिरुची' हे दर्जेदार मासिक चालवत असल्याने लहानपणापासूनच त्यांच्यावर वाचन लेखनाचे संस्कार झाले. मराठी साहित्यविश्वातील मानाचे पान समजल्या जाणा-या 'लघुनियतकालिक चळवळी'मध्ये त्यांचा मोलाचा वाटा होता. अरूण कोलटकर आणि रमेश समर्थ यांच्या जोडीने त्यांनी 'शब्द' हे लघुनियतकालिक सुरू केले.
दिलीप चित्रेंच्या मराठी आणि इंग्रजी कवितांची भारतीयच नव्हे; तर आंतरराष्ट्रीय पातळीवर दखल घेतली गेली. ऑफिसर्स, शिबा राणीच्या शोधात, चाव्या, कवितेनंतरच्या कविता, एकूण कविता भाग १ ते ३, दहा बाय दहा असे त्यांचे साहित्य आहे. 'पुन्हा तुकाराम' आणि 'सेज तुकाराम' या पुस्तकांमुळे तुकोबा जगभरात पोचले. ‘सेज तुका’ हे इंग्रजी भाषांतरही त्यांनी केले. या पुस्तकाला साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला होता. १९७५ साली अमेरिकेतील आयोवा शहरातील विद्यापीठाने त्यांना आंतरराष्ट्रीय लेखन कार्यक्रमासाठी निमंत्रण दिले. इंडियन पोएट्री लायब्ररीत त्यांचे महत्त्वाचे योगदान आहे. तसेच भोपाळच्या भारतभवन या कला वास्तूच्या स्थापनेतही चित्रेंचा मोठा वाटा आहे. त्यांनी नवी दिल्लीत जागतिक कवींचे संमेलनही भरवले होते. त्यांच्या 'एकूण कविता' हा कविता संग्रह नव्वदीच्या दशकात तीन खंडात प्रकाशित झाला. इंग्रजीतही ते लिहित. ट्रॅव्हलिंग इन द केज हा त्यांचा इंग्रजी कवितांचा संग्रह. 'एन एंथ्रोपॉलॉजी ऑफ मराठी पोएट्री' हा इंग्रजी ग्रंथही त्यांनी संपादित केला.भाषांतराच्या बाबतीतही दिपुंनी फार थोर काम केले आहे. चित्रकला, शिल्पकला, चित्रपट लेखन, दिग्दर्शनातही त्यांनी ठसा उमटवला. गोविंद निहलानींच्या 'विजेता'ची पटकथा त्यांचीच होती. 'गोदाम' या वेगळ्या वाटेच्या चित्रपटाचे लेखन, दिग्दर्शन, संगीत अशा सर्व बाजू त्यांनी एकट्यानेच साभाळल्या. त्याशिवाय त्यांनी डझनभर वृत्तपट आणि कित्येक लघुचित्रपट तयार केले. वीस व्हिडीओ डॉक्युमेंटरी फिचर्स त्यांच्या नावावर आहेत. अनेक चित्रपटांच्या कथा, पटकथा त्यांनी लिहिले आणि अनेकांच्या दिग्दर्शनातही सहभाग घेतला. १९९४ मध्ये एकूण कविता भाग एकसाठी त्यांना साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला. याच वर्षी सेज तुका या पुस्तकासाठी साहित्य अकादमीचा भाषांतराचा पुरस्कारही त्यांना मिळाला. दिलीप पु. चित्रे यांचे १० डिसेंबर २००९ रोजी निधन झाले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा