विशेष प्रश्नमंजुषा टेस्ट सोडवा सर्टिफिकेट मिळवा

समाजकारण /राजकारण

मी विजय भुजबळ ग्रेट इंडियन या ब्लॉगवर सहर्ष स्वागत करत आहे WELCOME TO MY BLOG GREAT INDIAN THANKS FOR VISIT MY BLOG AND FOLLOW MY BLOG
FOLLOW MY BLOG


 

Translate /ब्लॉग वाचा जगातील कोणत्याही भाषेत

लेखक श्रीपाद दामोदर सातवळेकर

 

*आज मराठी चित्रकार, संस्कृत पंडित, वेदांचे अभ्यासक-संशोधक विद्वान, वैदिक तत्त्वज्ञानाचे भाष्यकार व मराठी लेखक श्रीपाद दामोदर सातवळेकर यांचा जन्मदिन.*

जन्म. १९ सप्टेंबर १८६७ सावंतवाडी संस्थानातील कोलगाव येथे. 

श्रीपाद दामोदर सातवळेकर यांचे इंग्रजी सहावीपर्यंतचे शालेय शिक्षण आणि चित्रकलेच्या पहिल्या दोन परीक्षा सावंतवाडी येथे झाले. १८९० मध्ये त्यांनी सर जे. जे. स्कूल ऑफ आर्ट मध्ये चित्रकलेच्या आणि शिल्पकलेच्या उच्च शिक्षणासाठी प्रवेश घेतला. तेथे त्यांना रावबहादूर (एम्. व्ही.) धुरंधर, एम्. एफ्. पीठावाला, एस्. पी. आगासकर, ए. एक्स्. त्रिंदाद यांसारखे थोर चित्रकार सहाध्यायी म्हणून लाभले. ‘जे. जे.’ मध्ये असताना त्यांना अनेक पारितोषिके मिळाली; प्रतिष्ठेचे ‘मेयो’ पदकही दोनदा (एकदा चित्रकलेसाठी; दुसऱ्यांदा शिल्पकलेसाठी) मिळाले. औंध संस्थानचे अधिपती भवानराव पंतप्रतिनिधी ह्यांचा स्नेहही त्यांना ह्याच काळात लाभला. त्यांच्या, तसेच त्यांचे पुत्र माधव श्रीपाद सातवळेकर ह्यांच्या आयुष्यात हा स्नेह फार महत्त्वाचा ठरला. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर सातवळेकरांना औंध संस्थानातच नोकरी मिळाली (१९००); पण ती सोडून हैदराबाद (आंध प्रदेश) संस्थानात येऊन तेथे त्यांनी आपला कलागार (स्टुडिओ) काढला. एक चित्रकार म्हणून हैदराबादमध्ये त्यांचा निजामाशी संबंध आला आणि जमही बसला. व्यक्तिचित्रकार म्हणून ते ख्याती पावले. राजे, सरदार आदींनी त्यांच्याकडून आपली व्यक्तिचित्रे काढून घेतली. या सुमारास भारतीय स्वातंत्र्याची चळवळ जोरात होती. पंडितजी आर्य समाजाकडे आकृष्ट झाले. १९०१–१८ पर्यंत त्यांनी आर्य समाजाचे काम केले. चित्रकलेप्रमाणेच वेदाध्ययनाचा वारसाही त्यांना त्यांच्या वडिलांकडूनच मिळाला होता. पंडितजींनीही सखोल वेदाध्ययन केले; वेदांवर व्याख्याने दिली; स्वामी दयानंद सरस्वतींच्या सत्यार्थप्रकाश व ऋग्वेदादिभाष्य भूमिका या ग्रंथांचे त्यांनी भाषांतर केले. विश्ववृत्त ह्या कोल्हापूरच्या एका नियतकालिकातून त्यांनी ‘वैदिक राष्ट्रगीत’ (१९०७) प्रसिद्घ केले. ‘वैदिक राष्ट्रगीत’ व ‘वैदिक प्रार्थनांची तेजस्विता’ (१९०८) या लेखांमुळे इंग्रज सरकारची गैरमर्जी होऊन त्यांना कारावासही झाला. ‘वैदिक राष्ट्रगीता’ च्या हिंदी अनुवादाच्या प्रती ब्रिटिशांनी जप्त करून जाळल्या. त्यांच्या ह्या राजकीय सक्रियतेमुळे त्यांना हैदराबाद सोडावे लागले. उत्तर भारतातील कांग्री येथील गुरुकुलात ते काही दिवस राहिले. ब्रिटिश सरकारचा त्यांच्यावर संशय असल्यामुळे त्यांना अनेक स्थलांतरे करावी लागली. पुढे औंधमध्ये त्यांचे वास्तव्य तीस वर्षे होते. त्यांच्या राजकीय विचारांवर आरंभी लोकमान्य टिळकांचा प्रभाव होता; तथापि टिळकांच्या मृत्यूनंतर ते गांधीवादाकडे ओढले गेले. औंध संस्थानात चरखा, ग्रामोद्घार इत्यादींचा त्यांनी प्रचारही केला होता; तथापि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचेही त्यांना आकर्षण वाटे. १९४२ साली ‘छोडो भारत’ चळवळ सुरू झाली, तेव्हा ब्रिटिश सरकारविरोधी पत्रके छापण्याचे काम त्यांनी औंधमध्ये केले. परिणामतः ह्या धामधुमीच्या काळात त्यांची चित्रकला जवळजवळ संपुष्टात आली. १९४८ साली महात्मा गांधींच्या हत्येनंतर उसळलेल्या दंगलींच्या झळा औंध संस्थानापर्यंत पोहोचल्या. त्या परिस्थितीत औंध सोडून गुजरातमधील बलसाड जिल्ह्यातील पारडी येथे जाण्याचा निर्णय सातवळेकरांनी घेतला. औंध येथील वास्तव्यात त्यांनी १९१८ मध्ये ‘स्वाध्याय मंडळा’ ची स्थापना केली होती. वेदाध्ययन आणि वेदप्रसार हे त्यांचे मुख्य उद्दिष्ट होते. ह्या दृष्टींनी पारडी हे स्थळ त्यांना सोयीस्कर वाटले. १ जुलै १९४८ रोजी त्यांच्या स्वाध्याय मंडळाचे काम पारडी येथून सुरू झाले. पारडी येथील जागेत वेदमंदिर, अध्ययनकक्ष, अतिथिगृह, मुद्रणालयाची इमारत असे विविध विभाग होते. मुद्रणालयातील यंत्रसामग्री जर्मनीहून आणली होती. स्वाध्याय मंडळातर्फे वैदिक वाङ्‌मयाचे संशोधन, अनुवाद, प्रकाशन इ. कामे केली जात. जोहॅनिसबर्ग, झांझिबार येथेही ‘स्वाध्याय मंडळा’ ची केंद्रे होती. औंध येथील वास्तव्यात वैदिक धर्म (१९१९) हे हिंदी व पुरुषार्थ (१९२४) हे मराठी मासिक त्यांनी काढले. त्यांतून प्रामुख्याने वैदिक वाङ्‌मय व तत्त्वज्ञान या विषयांचे लेखन त्यांनी केले. त्यांची ग्रंथसंपदा विपुल असून मराठी, हिंदी व इंग्रजी या भाषांमध्ये त्यांचे सु. ४०० ग्रंथ प्रकाशित झाले आहेत. संस्कृत स्वयंशिक्षक या मालिकेतील २४ पुस्तके, अथर्ववेदाचा सुबोध अनुवाद (१९६०; भाग १ ते ५), अथर्ववेदातील प्राणसूक्त (१९६२), मनुसूक्त (१९६३), ऋग्वेदातील पुरुषसूक्त (१९६६), वेदकालीन सामाजिक, राजकीय, आर्थिक स्थितीचे दर्शन घडविणारी १२ पुस्तकांची आगम-निबंधमाला, दैवतसंहिता (चारही वेदांतील देवतामंत्रांचे एकत्रीकरण), उपनिषद्‌भाष्य-ग्रंथमाला (१,००० पृष्ठे ), यज्ञोपवीत संस्कार-रहस्य, ईशोपनिषदातील राजकारण इ. त्यांचे लेखन वैदिक संस्कृतीच्या परिशीलनातून राष्ट्ररचनेची तेजस्वी विचारधारा समाजात प्रसृत करण्याच्या उद्देशाने झाले आहे. पुरुषार्थ प्रबोधिनी (१९३३–३६) हाभगवद्‌गीते वरील भाष्यग्रंथ, तसेच गीतालेखमाला (७ भाग) व गीता -श्लोकार्थसूचि हे ग्रंथ; रामायण-महाभारत या ग्रंथाचे मराठी अनुवाद, मंगलमूर्ति गणेश (१९५०), पुराणग्रंथांसंबंधीचे गैरसमज दूर करण्यासाठी लिहिलेला पौराणिक गोष्टींचा उलगडा (१९५१), भारतीय संस्कृती हा लेखसंग्रह इ.लेखन त्यांनी केले. पंडित सातवळेकर यांची चित्रे फारशी उपलब्ध नाहीत. २६ जुलै २००५ रोजी मुंबईतील अतिवृष्टीच्या तडाख्यात त्यांचे चित्रकार पुत्र माधव सातवळेकर ह्यांच्या स्टुडिओत असलेली सातवळेकर पितापुत्रांची अनेक चित्रे नष्ट झाली. पंडितजींनी चित्रकलेवर समीक्षात्मक लेखनही केले होते. कदाचित मराठीतील ही पहिली चित्रकला-समीक्षा असू शकेल. स्वातंत्र्यासाठी वेदप्रसाराद्वारे जनजागृती करण्यासाठी त्यांनी स्वतःला झोकून दिले. त्यामुळे ‘पंडित वेदव्यास सातवळेकर’ हीच त्यांची प्रतिमा जनमानसात रूढ झाली. पंडितजींना त्यांच्या आयुष्यामध्ये अनेक मानसन्मान मिळाले. ‘सर जे. जे. स्कूल ऑफ आर्ट’ मधील पारितोषिकाव्यतिरिक्त त्यांना वेदमूर्ती, वेदवाचस्पती इ. पदव्यांनी गौरविले आहे. श्रीपाद दामोदर सातवळेकर यांचे निधन ३१ जुलै १९६८ रोजी झाले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा