स्वातंत्र्यसैनिक #अरुणा_असफ_अली (#पूर्वाश्रमीच्या_अरूणा_गांगुली) (16 जुलै 1909 - 29 जुलै 1996) ह्या शिक्षिका, राजकीय कार्यकर्ती आणि प्रकाशक, दिल्लीच्या पहिल्या महापौर होत्या. 1942 मध्ये भारत छोडो चळवळीच्या वेळी गोवालिया टँक, मुंबई येथे भारतीय राष्ट्रीय ध्वज फडकावल्याबद्दल भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील सक्रिय सहभागाबद्दल आणि दाखविलेल्या हिंमतीबद्दल नेहमीच त्यांचे स्मरण केले जाते. स्वातंत्र्यानंतर त्या राजकारणात सक्रिय राहिल्या, दिल्लीच्या पहिल्या महापौर झाल्या.
पदवी शिक्षणानंतर त्यांनी कलकत्ता येथील गोखले मेमोरियल स्कूलमध्ये शिक्षिका म्हणून काम केले. अलाहाबादमध्ये काँग्रेस पक्षाचे नेते असफ अली यांच्याशी भेट झाली. धर्म आणि वयाच्या कारणास्तव (वयात 20 वर्ष अंतर) पालकांचा विरोध असूनही त्यांनी 1928 मध्ये लग्न केले. मीठाच्या सत्याग्रहात भाग घेतल्याने त्यांना अटक करण्यात आली. 1932 मध्ये त्यांना तिहार तुरुंगात असताना तेथे उपोषण करून राजकीय कैद्यांबाबतीत उदासीन धोरणाचा त्यांनी निषेध केला होता. त्या प्रयत्नांमुळे तिहार कारागृहात परिस्थिती सुधारली. सुटकेनंतर त्या राजकीयदृष्ट्या फारशा सक्रिय नव्हत्या.
परंतु 1942 च्या शेवटी त्यांनी भूमिगत चळवळीत भाग घेतला. प्रमुख कार्यकारी नेते आणि काँग्रेस कार्यकारिणीतील सर्व सदस्यांना अटक करून सरकारने प्रत्युत्तर दिले आणि अशाप्रकारे आंदोलन अयशस्वी करण्याचा प्रयत्न केला. तरुण अरुणा या 9 ऑगस्ट रोजी उर्वरित अधिवेशनाच्या अध्यक्ष झाल्या आणि गोवालिया टँक मैदानावर झेंडा फडकविला. आणि यामुळेच 1942 चे आंदोलन पुन्हा जोमाने सुरू होण्यास कारणीभूत झाले. अधिवेशनात पोलिसांनी जमावावर गोळीबार केला.
अरुणा यांना तेव्हापासून चळवळीची नायिका म्हणून ओळखले जाऊ लागले आणि नंतरच्या काळात त्यांना स्वातंत्र्य चळवळीची ग्रँड ओल्ड लेडी म्हटले गेले. मोठे नेते तुरूंगात असल्याने थेट नेतृत्व नसतानाही, स्वातंत्र्य मिळविण्याच्या भारताच्या तरुणांच्या इच्छेचे अभिव्यक्ती म्हणून देशभर उत्स्फूर्त निदर्शने आणि प्रदर्शने करण्यात आली. अरूणा या अटक टाळण्यासाठी भूमिगत झाल्या आणि 1942 साली भूमिगत चळवळ सुरू केली.
#त्यांची_मालमत्ता_जप्त_करुन_विक्री_केली_गेली. दरम्यान राम मनोहर लोहिया यांच्यासमवेत त्यांनी काँग्रेस पक्षाचे मासिक इन्किलाबचे संपादन केले. 1944 च्या एका अंकात त्यांनी तरुणांना हिंसाचार आणि अहिंसेविषयी व्यर्थ चर्चा विसरून क्रांतीमध्ये सामील होण्यासाठी कृती करण्यास सांगितले. जयप्रकाश नारायण आणि अरुणा असफ अली यांच्यासारख्या नेत्यांना "गांधींचे राजकीय अपत्य, पण कार्ल मार्क्सचे अलीकडील विद्यार्थी" असे वर्णन केले गेले. त्यांना पकडण्यासाठी सरकारने पाच हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले.
स्वातंत्र्यानंतर त्या काँग्रेस सोशलिस्ट पक्ष, 1948 मध्ये 'सोशलिस्ट पार्टी', भारतीय कम्युनिस्ट पार्टीमध्ये प्रवेश केला. परंतु 1956 मध्ये त्यांनी पक्ष सोडला. दिल्लीच्या पहिल्या महापौरपदी त्यांची निवड झाली. 1964 मध्ये त्यांनी पुन्हा काँग्रेस पक्षात प्रवेश केला पण सक्रिय राजकारणामध्ये भाग घेणे बंद केले. आणीबाणीबाबत मतभेद असूनही, त्या इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांच्या जवळच्या राहिल्या.
अरुणा असफ अली यांना 1964 चा आंतरराष्ट्रीय लेनिन शांतता पुरस्कार व 1991 मध्ये जवाहरलाल नेहरू आंतरराष्ट्रीय ऐक्य पुरस्काराने तर 1992 मध्ये त्यांना पद्मविभूषण पुरस्काराने गौरविण्यात आले. 1997 मध्ये सर्वोच्च नागरी पुरस्कार भारतरत्न मरणोत्तर देण्यात आला. 1998 मध्ये त्यांच्या स्मरणार्थ टपाल तिकिट जारी करण्यात आले. त्यांच्या सन्मानार्थ नवी दिल्लीतील अरुणा असफ अली मार्गाचे नाव देण्यात आले. ऑल इंडिया मायनॉरिटीज फ्रंटतर्फे डॉ अरुणा असफ अली सद्भावना पुरस्कार दरवर्षी दिला जातो. 29 जुलै 1996 रोजी त्यांचे दिल्लीत निधन झाले.
विनम्र अभिवादन
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा