सागरी आव्हान पेलणाऱ्या
डॉ. आदिती पंत
आदिती पंत हे नाव आता आपल्या • चांगले परिचयाचे झाले आहे. सागरी वैज्ञानिक म्हणून त्यांची ओळख आहे. अंटार्क्टिका म्हणजेच दक्षिण ध्रुवावर जाणाऱ्या त्या पहिल्या भारतीय महिला आहेत.
मुळात आपल्या देशात संशोधनाकडे कल कमी आहे, त्यात महिलांचे या क्षेत्रात येण्याचे प्रमाणही कमी आहे. त्यातून सागरी संशोधन हा विषय अतिशय धाडसीच; पण सागराची आव्हानेही महिला समर्थपणे पेलू शकतात, हे आदिती पंत यांनी दाखवून दिले. अंटार्क्टिकावर त्या चार महिने राहिल्या होत्या. अंटार्क्टिकावर भारताच्या दक्षिण गंगोत्री या प्रकल्पात त्यांचे योगदान मोठे आहे. १९८३-८४ मध्ये अंटार्क्टिकावर गेलेल्या भारतीय शास्त्रज्ञांच्या तिसऱ्या मोहिमेत आदिती पंत यांचा समावेश होता.
नागपूर येथे जन्मलेल्या आदिती पंत यांनी विज्ञान शाखेतील पदवी पुणे विद्यापीठातून घेतली. अमेरिकेतील हवाई विद्यापीठातून त्यांनी मरिन सायन्स म्हणजे समुद्र विज्ञानात एम.एस. केले आणि लंडन विद्यापीठातून सागरी शैवालाची शरीररचना या विषयात त्यांनी डॉक्टरेट मिळवली. गोव्यातील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशनोग्राफी आणि पुण्यातील नॅशनल केमिकल लॅबोरेटरीत त्यांनी काम केले.
आदिती पंत यांच्या मते अंटार्क्टिकाची मोहीम ही त्यांच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाची मोहीम होती. त्यावेळच्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या आग्रहामुळे दक्षिण ध्रुवावर भारताचा बेस कॅम्प उभा राहिला. अंटार्क्टिका हे शास्त्रज्ञांचे स्वप्न आहे, असे त्या म्हणतात.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा