सर्कसचे जनक विष्णुपंत मोरेश्वर छत्रे
जन्म. १८४६
ही गोष्ट आहे फार पूर्वीची, १८८० च्या सुमाराची. कुर्दुवाडीच्या राजांच्या तबेल्यात घोड्यांना प्रशिक्षण देण्याचं काम अंकलकोपचे विष्णुपंत छत्रे करीत असत. एकदा ते राजांबरोबर इटालियन सर्कस पाहायला मुंबईला गेले होते. तिथले कलाकार, त्यांची चपळाई, त्यातला अतीव वेग हे सारं पाहून ते दोघं थक्क झाले. असा काही खेळ त्यांनी पूर्वी कधीच पाहिलेला नव्हता. या साऱ्याचं त्यांना मनस्वी कौतुक वाटलं होतं. पण ते कौतुक, ते अप्रुप फार वेळ टिकलं नाही. सर्कसचे संचालक असलेले विल्यम चिरीनी त्यांना भेटले आणि ते संचालक म्हणाले की, अजून दहा वर्षे तरी भारतीयांना अशी सर्कस उभी करता येणार नाही, जमणारच नाही त्यांना!
विष्णुपंत छत्रे यांना हे वाक्य चांगलंच झोंबलं. आणि त्यांनी हे आव्हान स्वीकारलं. त्यानंतर त्यांनी अनेक महिने सराव केला, सर्कशीतले खेळ समजून, शिकून घेत तयारी केली आणि २० मार्च १८८० रोजी काही निवडक, आमंत्रित लोकांसमोर पहिली वहिली सर्कस पेश केली. तिचंच नाव ‘ग्रॅण्ड इंडियन सर्कस’. दस्तुरखुद्द कुर्दवाडीच्या राजांसमोर हा पहिला खेळ झाला. आणि त्या खेळात छत्रेंच्या पत्नींनीही आपली कला सादर केली. जंगली प्राण्यांना प्रशिक्षण देऊन सर्कशीत खेळ तर त्यांनी केलेच; पण सर्कशीतल्या झुल्यांवर झुलणाऱ्या कलाकारांत एक त्याही होत्या. इथून सुरू झालेला भारतीय सर्कसचा हा प्रवास त्यात आपल्याकडच्या प्राचीन युद्धकलांसह विदेशी कसरतीही सहभागी होत गेल्या.
विष्णुपंतांची ही पहिली भारतीय सर्कस ‘ग्रँड इंडियन सर्कस, गांवोगांवी, शहरा शहरातून फिरू लागली. सर्व भारतभर त्यांचे खेळ झाले. त्याचबरोबर आपल्या मित्राला गुरुबंधूला आसरा दिला व संगीत शास्त्राचा अनमोल हिरा गावी रहिमत खाँसाहेब जनतेपुढे, रसिकांपुढे सादर झाला. विष्णुपंतांचा एक दंडक होता. ज्या गांवांत सर्कशीचा खेळ होईल त्या गांवातील एका शिक्षण संस्थेला उदारहस्ते देणगी देऊनच खेळ सुरु होई. विष्णुपंत गेल्यावर पण त्यांची “ग्रँड इंडियन सर्कस” पुढे चालूच राहिली. नव्हे जास्तच फोफावली!! विष्णुपंतांचे धाकटे बंधू काशिनाथपंत छत्रे यांनी ही सर्कस पुढे चालू ठेवली. त्या सर्कशीचे खेळ भारतातच नव्हें तर परदेशातही गाजू लागले. हे सर्व करीत असताना त्यांनी आपला स्वाभिमान, देशाभिमान कधीच बाजूला सारला नाही. स्वातंत्रासाठी लढणा-या क्रांतीकारकांना, नेत्यांना (पुढारी मंडळी) पुर्णपणे सहकार्यच करीत होते.
भूमिगत कार्यकर्त्यांना सर्कसचे डोअर कीपर करून परदेश व देशांतर्गत हालचालीसाठी पूर्णतः मदत करीत असत. “छत्रे” या नावांशी लो.टिळकांचा फार घनिष्ट संबंध होता. केरुनाना छत्रे त्यांचे गुरु, सर्कसवाले काशिनाथपंत त्यांचे परममित्र. नेपाळच्या मुक्कामात लो. टिळक त्यांच्याबरोबर सर्कशीत रहात होते व तेथेच त्यांची स्वातंत्र्यलढ्यातील गुप्त खलबते होत असत. *विष्णुपंत छत्रे* यांचे निधन २० फेब्रुवारी १९०५ रोजी झाले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा