*क्रांतिसिंह नाना पाटील*
(क्रांतिकारक व समाजसुधारक)
*जन्म : ३ ऑगस्ट १९००*
(येडे मच्छिंद्र, वाळवा तालुका सांगली)
*मृत्यू : ६ डिसेंबर, १९७६ (वय ७६)*
(वाळवा)
चळवळ : भारतीय स्वातंत्र्यलढा, संयुक्त महाराष्ट्र चळवळ
धर्म : हिंदू क्रांतिसिंह नाना पाटील हे भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील सैनिक आणि स्वातंत्र्योत्तर काळातील मराठी राजकारणी होते. क्रांतिसिंह नाना पाटील हे, महाराष्ट्रातील एक महत्त्वाचे क्रांतिकारक मानले जातात. त्यांचे कार्यक्षेत्र हे प्रामुख्याने सांगली सातारा या परिसरामध्ये होते. नाना पाटील यांच्या वरती प्रारंभीच्या काळात सत्यशोधक विचारांचा प्रभाव होता. पुढील काळात ब्रिटिशांच्या अन्याय कारक राजवटीस आव्हान देण्यासाठी त्यांनी क्रांतिकारक मार्गाचा पुरस्कार केला. साताऱ्यातील प्रतिसरकारच्या स्थापनेत त्यांचा वाटा महत्त्वाचा होता. नाना पाटील यांनी साताऱ्यामध्ये प्रतिसरकारची स्थापना करून महाराष्ट्रातील क्रांतिकारी चळवळीला मोठे योगदान दिले. भूमिगत चळवळीच्या माध्यमातून त्यांनी प्रतिसरकारची स्थापना केली. प्रतिसरकारची स्थापना झाल्यावर ग्रामीण भागात ब्रिटिशांचे अस्तित्व नाममात्र राहिले. नाना पाटील यांनी युवकांची संघटना स्थापन करून इंग्रजांपुढे जबरदस्त आव्हान निर्माण केले. प्रती सरकारचे नेते या नात्याने त्यांनी केलेल्या कार्यामुळेच त्यांना क्रांतिसिंह म्हणून ओळखले जाऊ लागले. महाराष्ट्रातील क्रांतिकारी चळवळीच्या भूमिगत कार्यकर्त्यांमध्ये नाना पाटलांचे योगदान महत्त्वपूर्ण ठरले. या काळामध्ये महाराष्ट्रातील सातारा, सांगली या परिसरात नाना पाटलांची ब्रिटिशांवर एक मोठी दहशद निर्माण झाली होती. प्रतिसरकार अथवा 'पत्री सरकार' म्हणून या काळात ते ओळखले गेले. मंत्र प्राप्तीनंतर हे नाना पाटील यांनी सातारा सांगली परिसरामध्ये आपले सामाजिक कार्य पुढे चालू ठेवले कारमध्ये त्यांना मोठी लोकप्रियता देखील मिळाली.ते महत्त्वाचे क्रांतिकारक होते.
🔮 *जीवन* महाराष्ट्रात (प्रामुख्याने सातारा, सांगली भागात) स्वातंत्र्य चळवळीचे नेतृत्व करणारे, तसेच पत्री सरकार किंवा प्रतिसरकार हा समांतर शासनाचा एकमेवाद्वितीय प्रयोग राबवणारे लढवय्ये राजकीय कार्यकर्ते म्हणजे क्रांतिसिंह नाना पाटील होत.
नाना पाटील यांचा जन्म सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील येडे मच्छिंद्र या गावी झाला. लहानपणापासूनच नानांना दणकट शरीराचे वरदान लाभले होते. म्हणूनच पुढील काळातही त्यांच्या भारदस्त व्यक्तिमत्वामुळेच लोक त्यांच्याकडे आकर्षित होत. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर नानांनी काही काळ तलाठी म्हणून नोकरी केली. पण समाजकारण व राजकारणाची ओढ असलेले नाना लवकरच नोकरीतून बाहेर पडले. १९३० च्या सविनय कायदेभंग चळवळीपासूनच त्यांचा स्वातंत्र्य लढ्यात सहभाग होता. स्वातंत्र्यलढा आणि बहुजन समाजाचा विकास या दोन्ही मार्गांनी त्यांचे कार्य चालू होते.
💥 *स्वातंत्र्य लढा* १९३० च्या सविनय कायदेभंग चळवळीचे कार्य करण्यासाठी नाना पाटलांनी नोकरीचा त्याग केला. त्यांनी ग्रामीण जनतेला गुलामगिरीची जाणीव करून देऊन, जनतेला धाडसी बनवण्याचा प्रयत्न केला. नानांवर वारकरी संप्रदायाचा प्रभाव होता. तसेच लोकांच्या भाषेत प्रभावी भाषणे करून, त्यांच्यात प्रेरणा उत्पन्न करण्याची हातोटी नानांकडे होती. ग्रामीण भागातील, बहुजन समाजातील लोकांचा स्वाभिमान जागृत करून त्यांना स्वातंत्र्य चळवळीत सहभागी करून घेणे हे क्रांतिसिंहांचे प्रमुख योगदान होय.
ब्रिटिश शासनाला समांतर अशी शासन यंत्रणा उभी केली पाहिजे असा नाना पाटलांचा विचार होता. ‘आपुला आपण करू कारभार’ हे सूत्र त्यांनी इ.स. १९४२च्या चले जाव चळवळीत प्रत्यक्ष अंमलात आणले. आपल्या देशाचा कारभार आपणच केला पाहिजे या जाणिवेतून प्रतिसरकार ही संकल्पना नानांनी प्रत्यक्षात आणली होती. प्रतिसरकारच्या माध्यमातून लोकन्यायालये, अन्नधान्य पुरवठा, बाजार व्यवस्था यासारखी लोकोपयोगी कामे केली जात. ब्रिटिशांची राज्यव्यवस्था नाकारून त्यांनी १९४२ च्या दरम्यान सातारा जिल्ह्यात स्वतंत्र राज्याची स्थापना केली. प्रतिसरकारचा प्रचार ज्येष्ठ कवी ग. दि. माडगुळकर लिखित पोवाड्यांच्या माध्यमातून आणि शाहीर निकम यांच्या खड्या आवाजाद्वारे केला जात होता.
नाना पाटील यांच्या नेतृत्वाखाली प्रतिसरकारमध्ये विविध दलांची स्थापना झाली. त्यातल्या एका दलाचे-तुफान दलाचे- फील्ड मार्शल जी.डी. लाड (बापू) आणि कॅप्टन आकाराम (दादा) पवार होते. ह्या दलाची कुंडल येथे युद्धशाळा होती. या युद्धशाळेतून प्रशिक्षित अशा पाच हजारांवर जवानांच्या दोनशे शाखा स्वातंत्र्यपूर्व काळात गावोगाव काम करीत. तलवारी, जांबिया या परंपरांगत हत्याराबरोबरच पिस्तूल बॉंबगोळे फेकण्याचे प्रशिक्षण या जवानांना होते. प्रतिसरकारने गावटग्यांवर बसवलेल्या दहशतीमुळे या सरकारची पत्री सरकार अशी ओळख तयार झाली.
या प्रतिसरकारच्या माध्यमातून बाजारव्यवस्था, अन्नधान्य पुरवठा, भांडणतंटे सोडवण्यासाठी लोकन्यायालयांची स्थापना, दरोडेखोरांना-पिळवणूक करणाऱ्या सावकारांना -पाटलांना कडक शिक्षा - अशी अनेक समाजोपयोगी कामे करण्यात येत होती. या सरकार अंतर्गत नाना पाटील यांनी ‘तुफान सेना’ या नावाने सैन्य दलाची स्थापना केली होती. ब्रिटिशांच्या रेल्वे, पोस्ट आदी सेवांवर हल्ला करून त्यांना नामोहरम करण्याचे तंत्रही नाना पाटील यांनी यशस्वीरीत्या राबवले. १९४३ ते १९४६ या काळात सातारा व सांगली जिल्ह्यातील सुमारे १५०० गावांत प्रतिसरकार कार्यरत होते. या संकल्पनेचा प्रयोग पुढे देशातही अनेक ठिकाणी करण्यात आला.
नाना पाटलांच्या ’प्रति सरकार’ला लोक ’पत्रीसरकार’ म्हणत आणि नाना पाटील ब्रिटिश अधिकाऱ्याच्या तळपायाला पत्रा ठोकीत अश्या अफवा असत. १९२० ते १९४२ या काळात नाना ८-१० वेळा तुरुंगात गेले. १९४२ ते ४६ या काळात ते भूमिगतच होते. ब्रिटिशांनी त्यांना पकडण्यासाठी बक्षीस लावले, जंगजंग पछाडले पण क्रांतिसिंह ब्रिटिशांना सापडले नाहीत. ते भूमिगत असताना ब्रिटिशांनी त्यांच्या घरावर जप्ती आणली, त्यांची जमीनही सरकारजमा केली. याच काळात त्यांच्या मातोश्रींचे निधन झाले. क्रांतिसिंहांनी आपला जीव धोक्यात घालून, धावपळीत मातोश्रींवर अंत्यसंस्कार केले होते. भारताला स्वातंत्र्य मिळणार हे नक्की झाल्यावरच (१९४६) क्रांतिसिंह कऱ्हाड तालुक्यात प्रकट झाले.
यांच्यावर महात्मा फुले यांच्या सत्यशोधक विचारांचा तसेच राजर्षी शाहूंच्या कार्याचा प्रभाव होता. त्यांनी 'गांधी -विवाह' ही अतिशय कमी खर्चात विवाह करण्याची पद्धत रुजवण्याचा प्रयत्न केला, तसेच शिक्षण प्रसार, ग्रंथालयांची स्थापना, अंधश्रद्धा निर्मूलन, ग्रामीण जनतेची व्यसनमुक्ती या माध्यमातून समाजसुधारणेचे कार्य केले. त्यांच्यामुळे शाहीर निकम, नागनाथअण्णा नायकवडी यांसारखे कार्यकर्ते घडले.
स्वातंत्र्यपूर्व काळापासून प्रामुख्याने सांगली जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात एक प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व म्हणून सातत्याने प्रकाशात असणाऱ्या क्रांतिसिंहांचे ६ डिसेंबर इ.स. १९७६ वाळवा मध्ये निधन झाले. मला वाळव्यामधेच दहन करण्यात यावे ही त्याची इच्छा होती त्यानुसार वाळव्यामधेच दहन करण्यात आले. ♨️ *स्वातंत्र्योत्तर काळ*
देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर नाना पाटलांनी संयुक्त महाराष्ट्र आंदोलनातही भाग घेतला. त्यांनी शेतकरी कामगार पक्ष व भारतीय कम्युनिस्ट पक्ष या पक्षांच्या माध्यमातून कार्य केले. १९५७ मध्ये ते उत्तर सातारा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून आले. १९६७ मध्ये कम्युनिस्ट पक्षाचे उमेदवार म्हणून ते बीड मतदारसंघातून लोकसभेवर निवडून आले. संसदेत मराठीतून भाषण करणारे ते पहिले खासदार होते.
📚 *संबंधित साहित्य* क्रांतिसिंह नाना पाटील (लेखक : विलास पाटील, क्रांतिवैभव प्रकाशन)
सिंहगर्जना : क्रांतिसिंह नाना पाटील यांची निवडक भाषणे. (संपादक: रा.तु. भगत, क्रांतिवैभव प्रकाशन)
क्रांतिसिंह नाना पाटील आणि शेतकरी चळवळ (लेखक : दिनकर पाटील, कीर्ती प्रकाशन)
क्रांतिसिंह नाना पाटील: चरित्र आणि कार्य (लेखक : दिलीप मढीकर, ललितराज प्रकाशन)
पत्री सरकार : चरित्र, व्यक्तिमत्त्व आणि चळवळ (लेखक : प्राचार्य व.न. इंगळे)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा