समाजकारण /राजकारण

मी विजय भुजबळ ग्रेट इंडियन या ब्लॉगवर सहर्ष स्वागत करत आहे WELCOME TO MY BLOG GREAT INDIAN THANKS FOR VISIT MY BLOG AND FOLLOW MY BLOG
FOLLOW MY BLOG


 

Translate /ब्लॉग वाचा जगातील कोणत्याही भाषेत

विशेष प्रश्नमंजुषा टेस्ट सोडवा सर्टिफिकेट मिळवा

*पंडिता रमाबाई*पंडिता रमाबाई*स्त्रियांच्या-विशेषतः परित्यक्त्या, पतिता व विधवांच्या-सर्वांगीण उद्धाराकरिता समर्पित भावनेने कार्यरत राहिलेली महाराष्ट्रीय विदुषी. रमा डोंगरे, पंडिता रमाबाई सरस्वती, रमाबाई डोंगरे, मेधावी, मेरी रमाबाई अशा स्थितंतरातून अतिशय खडतर आयुष्य जगलेली पंडिता रमाबाई सरस्वती बनली आणि स्त्री शिक्षणाची दीपस्तंभ ठरली.


भारतीय महिलां मध्ये शिक्षणाची, नवविचारांची ज्योत पेटविणाऱ्या पंडिता रमाबाई यांचा जन्म २३ एप्रिल १८५८ रोजी झाला.


दीडशे वर्षांपूर्वीचा समाज अज्ञान, पारंपरिक विचारसरणीच्या अंधकारात अडकला होता. मुलींना तर बाहेर पडणे शक्यही नव्हते. त्या काळात अनंतशास्त्र्यांनी मुलीला संस्कृत शिकवले. त्यामुळेच पौराणिक संस्कृतात ही मुलगी पारंगत झाली. फक्त शिक्षण देऊन थांबवले नाही, तर मुलीवर लग्नासाठी दबावही आणला नाही. उलट शक्य तेवढे ज्ञान ग्रहण कर असा उपदेशच केला. रमाबाईंवरचा हा उदारमतवादी पिता मात्र जास्त काळ जगू शकला नाही. रमाबाई सोळा वर्षाच्या असतानाच अनंतशास्त्री वारले. त्यांची पत्नीही गेली. रमाबाई आणि त्यांच्या भावाला आता कुणीही नव्हते. पण पित्याने दिलेल्या संस्कृताच्या शिदोरीच्या जोरावर रमाबाई उत्तर दिग्विजयाला निघाल्या. त्या काळात त्या भारतभर हिंडल्या. आपल्या बुद्धिमत्तेने त्यांनी अनेकांना चकीत केले. कोलकत्याला तर प्रचंड मोठा समुदाय त्यांना ऐकण्यासाठी आला होता. इथेच त्यांना 'सरस्वती' आणि नंतर त्यांच्या नावाचा अविभाज्य भाग झालेली 'पंडिता' ही पदवी मिळाली. रमाबाईंच्या विद्वत्तेला लोकमान्यता मिळाली. आपल्या या प्रवासात रमाबाईंना देशभरातील स्त्रियांच्या हलाखीच्या परिस्थितीची कल्पनाही आली. उच्च जाती पुढारल्याचा दावा करीत असल्या तरी त्यातील स्त्रियांचे मागासलेपण किती आहे, हेही त्यांना अस्वस्थ करत होते. 


विचारांनी अतिशय पुरोगामी असलेल्या रमाबाईंनी याच काळात बाबू बिपिन बिहारी माघनी या बिहारमध्ये रहाणार्या बंगाली वकिलाशी लग्न केले. पण ते हलक्या जातीचे होते. त्यांच्या या विवाहाने तत्कालीन सनातनी समाजात एकच खळबळ उडाली. टीकेचा भडीमार झाला. पण ते वादळही अल्पावधीत मिटले. त्यांना मनोरमा नावाची मुलगीही झाली. पण रमाबाईंच्या आयुष्यातील दुर्देवाचे दशावतार मात्र संपले नाही. सुखाचे दिवस आले असे वाटत असतानाच त्यांच्या पतीचे याच काळात निधन झाले. आणि हिंदू समाजातील विधवेला काय काय सहन करावे लागते, याचा अनुभव त्यांना आला. शवपनापासून अनेक प्रथा हिंदू समाजातील उच्च जातीच्या स्त्रियांना पाळाव्या लागत. रमाबाईंना हे सारे सहन होईना. याच काळात त्यांनी वंचित, पीडीत स्त्रियांसाठी काम करणे सुरू केले होते. या सगळ्या परिस्थितीत रमाबाईंना पुणे गाठले. तिथे त्यांनी विधवा आणि अनाथ महिलांसाठी आश्रम काढला. नंतर मुंबईतही तो सुरू केला. या केंद्रांत महिलांना मुलभूत शिक्षण देण्यात येई. शिवाय समाजात रहाण्यासाठी आवश्यक व्यावसायिक शिक्षणही त्यांना देण्यात येईल. अल्पावधीतच रमाबाई वंचित, पीडीत महिलांच्या जणू वकिलच बनून गेल्या. त्यांच्या या समाजकार्यातच त्यांचा ख्रिस्ती मिशनर्यांशी संबंध आला. त्यांच्याच माध्यमातून १८८३ मध्ये त्यांना इंग्लंडला जायची संधी मिळाली. तिथे गेल्यानंतर तेथील स्त्रियांची स्थिती त्यांनी पाहिली. हिंदू रूढीवादी मानसिकतेत स्त्रियांचा होत असलेला संकोच त्यांना प्रकर्षाने जाणवला. त्यावर आधारीत त्यांनी उच्च जातीतील हिंदू स्त्रिया नावाचे पुस्तकही लिहिले. त्याचा अनुवाद इंग्रजीत होऊन त्याचा प्रसार इंग्लंड-अमेरिकेत झाला. त्याचवेळी त्यांनी बायबलचाही अभ्यास सुरू केला. आणि याचाच परिणाम म्हणून त्यांनी ख्रिश्चन धर्म अंगीकारला. त्यांच्या धर्मांतराने तत्कालीन सनातनी समाजात मोठी खळबळ उडाली. टीकेचा भडीमार झाला. पण रमाबाईंनी आपल्या धर्मांतराचे समर्थन केले. धर्मांतर करणे म्हणजे भारतीय संस्कृतीशी आणि तिच्या मुळांशी जोडलेली नाळ तोडणे नव्हे, असे त्यांनी परोपरी समजावून सांगितले. पण तरीही त्यांच्यावर व्हायची टीका ती झालीच. 


इंग्लंडहून परतल्यानंतर त्यांनी स्वतःला सामाजिक कार्यात झोकून दिले. कुमारी मातांसाठी केंद्र, स्त्री सहाय्यता केंद्र, गरीब मुलींसाठी शाळा असे अनेक उपक्रम त्यांनी राबविले. मुंबईत शारदासदन आणि केडगावला मुक्तीमिशन या त्यांच्या संस्था. एकीकडे त्यांच्या समाजसुधारणेचे आयाम विस्तारत असताना त्यांनी ज्या ख्रिश्चन धर्मात प्रवेश केला, त्यातील लोकही त्यांच्यावर टीका करायला लागले. त्याचे कारण वेगळेच होते. रमाबाई ख्रिश्चन धर्मात आल्या तरी त्या ज्यांच्यासाठी काम करत होत्या, त्या महिलांनी ख्रिश्चन धर्मात यावे यासाठी त्या काहीही करत नव्हत्या. त्यामुळे रमाबाईंचे धर्मांतरण हे दांभिक आहे, अशी टीका करण्यास त्यांनी सुरवात केली. रमाबाईंनी बिशप वगैरे परंपराही नाकारली. त्यामुळे त्यांचा अधिकच भडका उडाला. त्यावर रमाबाईंचे म्हणणे स्पष्ट होते. ''मी ख्रिस्ताच्या चर्चची खरी भाविक आहे. पण बिशप किंवा ख्रिस्ती पुजार्याच्या तोंडून येणार्याे प्रत्येक शब्दाचे पालन करण्यास मी बांधिल नाही. कारण हिंदू संस्कृतीतील भिक्षुक पुरोहित संस्कृतीतून स्वतःला मी सोडवून घेतले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा तशाच प्रकारच्या भिक्षुक संस्कृतीत स्वतःला अडकविण्याची माझी इच्छा नाही.'' 

त्यांच्या कार्याबद्दल त्यांना तत्कालीन ब्रिटिश राज्यव्यवस्थेतील सर्वोच्च पुरस्कार कैसर-ए-हिंदने गौरविण्यात आले. पुढे १९८९ मध्ये त्यांच्यावर टपाल तिकीटही काढण्यात आले. 


अबला स्त्रीयांची मागासलेल्या हालाखिची परिस्थिती, पुरुष व अन्य महिलांकडून त्यांची होणारी पिळवणूक, अनिष्ट रूढी व परंपरा यांविरूद्ध त्यांनी आवाज उठवला. कुमारी मातांसाठी केंद्र, स्त्री साहाय्यता केंद्र, गरीब मुलींसाठी शाळा असे अनेक उपक्रम राबवून त्यांनी स्त्री शिक्षणाची चळवळ पुढे चालू ठेवली. महाराष्ट्रात नऊवारी ऐवजी पाचवारी साडी नेसण्यास महिलांनी सुरुवात करण्यामागे पंडिता रमाबाई यांचे प्रयत्न होते. हा फक्त कपड्यापुरता मुद्दा नव्हता, तर स्त्री स्वातंत्र्य व स्वनिर्णयाचा हक्क हे मुद्दे महत्त्वाचे होते.


रमाबाई आपल्या वडिलांप्रमाणेच काळाच्या पुढे होत्या. अत्यंत बुद्धिवान असलेल्या या महिलेचे अंतःकरण अत्यंत उदार व दीनदुबळ्या स्त्रियांकरिता सतत तळमळणारे होते. वैयक्तिक दुःखांची किंवा अडचणींची पर्वा त्यांनी कधीच केली नाही. त्यांनी जरी दीनदुबळ्यांच्या सेवेचे व्रत स्वीकारले, ख्रिस्ती धर्म स्वीकारला, तरी कोणताही विशिष्ट ख्रिस्ती धर्मपंथ त्यांनी स्वीकारला नाही. त्या धर्माने ख्रिस्ती झाल्या; मात्र त्यांनी हिंदू समाज व संस्कृती कधी सोडली नाही. शेवटपर्यंत त्या शाकाहारी राहिल्या. त्यांनी सतत खादी वापरली व आश्रमवासींनाही ते वापरायला लावली. स्त्रियांच्या उद्धाराकरिता त्यांनी आजन्म व अथकपणे केलेले प्रयत्न त्यांच्या समर्मित जीवनाचेच एक अंग होते. ज्या व्यक्त्तींनी आपल्या सेवेने भारताची प्रतिष्ठा वाढविली त्यांमध्ये रमाबाईंचे स्थान वैशिष्टपूर्ण आहे.कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा