*तात्यासाहेब कोरे*
सहकारमहर्षी तात्यासाहेब कोरे यांचा जन्म १७ ऑक्टोबर १९१४ रोजी झाला तर
स्मृतीदिन १३ डिसेंबर १९९४ आहे.
सहकारमहर्षी कै.श्री.व्ही.ए. ऊर्फ तात्यासाहेब कोरे हे *स्वातंत्र्यसैनिक व समाजसुधारक*. माजी उपपंतप्रधान कै.यशवंतराव चव्हाण यांचे निकटचे सहकारी नि सहकार चळवळीचे समर्थक.
सहकार चळवळीतून ग्रामोद्धार तत्त्वाचे द्रष्टे. वारणा सहकारी संकुलाच्या स्थापनेद्वारे ७० खेड्यातील कोरडवाहू जमिनीला सुजलाम सुफलाम करणारे नेते.
मुरबाड माळातून नंदनवन उभारणाऱ्या सहकारमहर्षी तात्यासाहेब कोरे यांचा १७ ऑक्टोबर १९१४ रोजी पन्हाळा तालुक्यातील कोडोली येथे विश्वनाथ कोरे तथा तात्यासाहेब कोरे यांचा जन्म झाला.
*१९३९ मध्ये कोल्हापूरला स्थापन झालेल्या प्रजापरिषदेचे उपाध्यक्ष म्हणून त्यांनी कार्यारंभ केला. स्वातंत्र्य चळवळीत ते सहभागी झाले होते. प्रतिसरकारच्या भूमिगत क्रांतिकारांना आश्रय दिला. पण संधी मिळूनही त्याचा मोबदला घेतला नाही.* वारणेकाठी सहकारी तत्त्वावर साखर कारखाना उभारला आणि त्या परिसराचे नंदनवनात रूपांतर करणे हेच आपले जीवितकार्य मानले; ते साकार करून दाखविलेही.
वारणा बालवाद्यवृंदापासून ते इंजिनीअरिंग महाविद्यालयापर्यंत आणि वारणा बझार पासून ते वारणा औद्योगिक वसाहती पर्यंत विधायक कामांचे डोंगर उभे केले. उजाड माळरानावर हरितक्रांती साकारली. वारणा कागदापासून वारणा श्रीखंडापर्यंत मजल मारली. हा सारा प्रताप तात्यासाहेबांच्या दूरदृष्टीचा.
‘अवघे जन मेळवावे, एक विचारे भारावे’ हे ध्येय ठेवून त्यांनी वाटचाल केली. सहकारांच्या माध्यमातून परिसराचा सर्वागीण विकास साधणारा हा हाडाचा कार्यकर्ता. अवघ्या देशाला आदर्शवत वाटावे असे कार्य तात्यासाहेबांनी केले. सहकाराला सुगंध दिला.
त्यांनी उभारलेला वारणा बाल वाद्यवृंद नुसत्या भारतभर नव्हे तर जगभर नावाजला गेला. त्याची पावती दिली ती महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व पु.ल.देशपांडे यांनी, म्हणून पुढे ती त्यांच्याच शब्दात देत आहे.
*वारणानगरीतले बाल-किन्नर*
मी वारणानगरातल्या त्या सभागृहात गेलो आणि रंगमंचावरची ती बालचमू पाहून चाटच पडलो. सतारींची उंची सतार- वादकांपेक्षा अधिक होती. समोरच तीन पेटीवादक. पेटी पलिकडे फक्त तीन चिमुकली डोकी दिसत होती. त्यांतली एक मुलगी तर चौथे वर्ष लागताक्षणीच शंकररावांकडे वयाचा दाखला घेऊन आलेली असावी. तबलेवाले बसल्यानंतर तबल्या डग्ग्यांएवढेच उंच वाटत होते. नाना प्रकारची देशी-विदेशी वाद्ये होती. व्हायलिन्स होती, मेंडोलिन्स, तारशहनाई, सारंगीसुद्धा होती. सतारी त्या चिमुकल्या हातांना पेलत नसल्यामुळे त्यांना लाकडी स्टॅन्डचा आधार दिला होता. ढोलकी होती, ढोलक होता, इलेकट्रिक गिटार होती, इलेक्ट्रॉनिक ऑर्गन- एखाद्या चित्रपटातल्या संगीतवाल्यांचा वाद्यवृंद असावा असा वाद्यवृंद. तेवढ्यात एक चुण- चुणीत देखणा मुलगा उभा राहिला. त्याने नामवंत साहित्यिक, इचलकरंजी संमेलनाचे अध्यक्ष माननीय श्री. पु. ल. देशपांडे यांच्या स्वागताचे दणदणीत भाषण ठोकले. 'त्यांना फक्त अर्धाच तास वेळ आहे हे आमचं दुर्भाग्य... आमचा कार्यक्रम साडेतीन- चार तासांचा आहे...' असे ठसक्यात सांगता सांगता 'आम्ही एका अटीवर त्यांच्यापुढं आमचं वृंदवादन सादर करीत आहोत... आमच्या कार्यक्रमानंतर त्यांनी आम्हांला पेटी वाजवून दाखवली पाहिजे.
स्वागतपर भाषण संपले. एक पावणेतीन फूट उंचीची चिमुरडी उभी राहिली. तिने कंडक्टरचे 'बेटन' हलवीत लयीचा इशारा दिला आणि अहो आश्चर्यम्! त्या चिमुकल्या तबलियाने ऐसा फर्मास तुकडा मारला की क्षणभर मला हा प्लेबॅक वगैरे आहे की काय असे वाटले. तिथून पुढला अर्धा, पाऊण, एक, सव्वा करत, दीड तास केव्हा झाला ते कळले नाही. समोरचे चिमुकले गोविंदराव टेंबे दात(काही पडलेले)- ओठ खाऊन पेटीवर लयबद्ध तानांचे सट्टे फेकत होते. व्हायिलन वाजवणारी मुलगी विलक्षण दमदारपणाने वाजवत होती. संतूरसारख्या बिकट वाद्यावरची नेमकी तारच झणकारत होती. चारी मुले लयीत मुरलेली होती. नुसती सरांनी बसवलेली गाणी वाजत नव्हती. सुरात आणि लयीत घुसून वाजवत होती. शंकररावांनी त्यांच्या अंत:करणात गाणे पेरले होते.
आयुष्यात मला भावलेलं एक गुज सांगतो. उपजिविकेसाठी आवश्यक असणाऱ्या विषयाचं शिक्षण जरुर घ्या. पोटापाण्याचा उद्योग जिद्दीनं करा, पण एवढ्यावरच थांबू नका. साहित्य, चित्र, संगीत, नाट्य, शिल्प, खेळ ह्यांतल्या एखाद्या तरी कलेशी मैत्री जमवा. पोटापाण्याचा उद्योग तुम्हाला जगवील, पण कलेशी जमलेली मैत्री तुम्ही का जगायचं हे सांगून जाईल.
*पु.ल.देशपांडे*
*************
वारणा बाल वाद्यवृन्दाची लिंक
https://youtu.be/UIjdPwHlfMc
उमलत्या वयात शिक्षणाबरोबरीने मुलांनी संगीत / वाद्य शिकले पाहिजे म्हणूनसर्व प्रकारची वाद्ये / संगीत शिक्षक उपलब्ध करून देणारे सहकार क्षेत्रातील अग्रणी व्यक्तिमत्व, वारणा परिसराच्या विकासाचे शिल्पकार, वारणा सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक, विश्वनाथ अण्णा तथा तात्यासाहेब कोरे यांचे कार्य थोरच !
👌👌
उत्तर द्याहटवा