प्रसिद्ध कारखानदार गुरुनाथ प्रभाकर ओगले
प्रभाकर कंदिलांचे उत्पादक व भारतातील औद्योगिकीकरणास हातभार लावणारे प्रसिद्ध कारखानदार व ओगलेवाडी येथील 'ओगले ग्लास वर्क्स' चे एक संस्थापक. गुरुनाथ प्रभाकर ओगले यांचे मॅट्रिकपर्यंतचे शिक्षण कोल्हापूर येथे, व नंतरचे मुंबईच्या व्हिक्टोरिया ज्युबिली टेक्निधकल इन्स्टिट्यूट मध्ये झाले. ह्या संस्थेतून त्यांनी एल्. एम्. ई.चा शिक्षणक्रम पहिल्या क्रमांकाने पूर्ण केला. पुढे ते बार्शीच्या 'लक्ष्मी टेक्निकल इन्स्टिट्यूट' मध्ये काही काळ प्रमुख अध्यापक होते. स्वतंत्र व्यवसायातील अपयशामुळे गुरुनाथांनी किर्लोस्कर बंधूंच्या कारखान्यात अभियंत्याची नोकरी पत्करली.
ओगलेवाडी येथील आपल्या भावाच्या काच कारखान्यात ते काम करू लागले. हिंदुस्थान सरकारने त्यांना काच उत्पादनच्या उच्च शिक्षणार्थ शिष्यवृत्ती देऊन विलायतेस पाठविले. शेफील्ड येथील अभ्यासानंतर ते अमेरिकेस गेले. अमेरिकेतील पिट्सबर्ग विद्यापीठात काचनिर्मितीच्या तंत्राचा अभ्यास करून ते स्वदेशी परतले. तसेच कंदीलनिर्मितीची यंत्रसामग्री खरेदी करण्याकरिता ते १९२४ मध्ये जर्मनीस गेले. तेथून भारतात परतल्यावर १९२५ - २६ पासून प्रसिद्ध प्रभाकर कंदिलांचे उत्पादन त्यांनी सुरू केले. सायकली व विजेचे पंखे यांच्या उत्पादनाच्या योजनाही गुरुनाथांनी आखल्या होत्या; तथापि त्या साकार होई शकल्या नाहीत. पूर्वीचे त्रावणकोर व श्रीलंका येथील सरकारांशी काच कारखाने सुरू करण्याबद्दल त्यांनी वाटाघाटी करून प्रत्यक्ष कारखान्यांची उभारणी केली; तथापि प्रभाकर कंदिलांची निर्मिती ही गुरुनाथांनी सर्वांत महत्त्वाची कामगिरी समजली जाते. प्रभाकर कंदील पुढे लवकरच जगद्विख्यात झाला. ओगलेवाडीच्या कारखान्यात विविध प्रकारचा काचमाल, एनॅमलवेअर, प्रभाकर कंदील व स्टोव्ह, विजेच्या मोटरी व पंप ह्यांचे उत्पादन होत असून तेथे २,००० कामगार काम करतात. पुण्याजवळील पिंपरी येथे मूळ ओगलेवाडी कारखान्याची शाखा असून तेथे स्वयंचलित दाबयंत्रावर काचेचे पेले, टंबलर व बरण्या ह्यांचे उत्पादन होते. या कारखान्यात २५० कामगार आहेत. गुरुनाथांनी एडिसनचे चरित्र व अमेरिका ही दोन पुस्तके लिहिली असून किर्लोस्कर मासिकातून विविध लेखन केले. मा.गुरुनाथ प्रभाकर ओगले यांचे १६ ऑक्टोबर १९४४ रोजी निधन झाले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा