भारतातील सर्वश्रेष्ठ वास्तुरचनाकार म्हणून आंतरराष्ट्रीय स्तरावर नावाजले गेलेले ज्येष्ठ नगररचना तज्ज्ञ चार्ल्स कोरिया
जन्म. १ सप्टेंबर १९३० सिकंदराबाद येथे.
उत्तमोत्तम वास्तुरचना करतानाच किफायतशीर व जीवनशैली उंचावणाऱ्या घरांच्या मांडणीचे श्रेय चार्ल्स कोरिया यांना जाते.
चार्ल्स कोरिया यांचे कॉलेज शिक्षण मुंबईतील सेंट झेवियर्स कॉलेजमध्ये झाले. त्यानंतर त्यांनी मिशिगन विद्यापीठ आणि एमआयटी या जगप्रसिद्ध संस्थेत उच्चशिक्षण घेतले. वयाच्या अवघ्या २८ व्या वर्षी चार्ल्स कोरिया यांनी अहमदाबाद येथील गांधी स्मारकाची उभारणी केली होती. त्यांच्या सुरुवातीची गांधी स्मारक संग्रहालय, ही रचना अतिशय गाजली होती. हे संग्रहालय म्हणजे ३०/३५ झोपडय़ांचा समूह आहे. सर्व चौकोनी झोपडय़ा आणि उतरत्या मंगलोरी छपरांच्या. मध्ये पाणी बाहेर काढण्यासाठी गटर, मध्ये मध्ये उघडे चौक आणि मध्यभागी एक मोठे पाण्याचे जलाशय! अशी काहीशी त्याची रचना आहे. म्हटली तर पारंपरिक म्हटली तर आधुनिक, पन्नास वर्षे उलटून गेली तरी रचनेची टवटवी आजही टिकून आहे.
चार्ल्स कोरिया यांनी उभारलेल्या वास्तूंमध्ये गुजरातमधील गांधी स्मारक, जयपूरचे जवाहर कला केंद्र, भोपाळमधील विधान भवन, गोव्यातील कला अकादमी, पुण्यातील आयुका,बेलापूर सीबीडी रेल्वे स्टेशन, संयुक्त राष्ट्रसंघातील भारताचे कार्यालय या वास्तूंचा समावेश आहे. ‘ओपन टू स्काय’ हे त्यांच्या रचनेचे वैशिष्ट्य. भारतातील वास्तूंसोबतच मॅसेच्युसेट इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीतील (एमआयटी) द ब्रेन सेंटर कॅनडा येथील ‘इस्माइली सेंटर इन टोरोंटो’ आणि ‘युनो’तील भारताचे कार्यालय अशा परदेशांतील वास्तूंचीही त्यांनी उभारणी केली. १९७०च्या दशकामध्ये नवी मुंबईच्या उभारणीत त्यांचा सिंहाचा वाटा होता. सामान्यांना परवडणारी घरे आणि शहरीकरण या विषयाचे ते तज्ज्ञ होते. शहरीकरण होत असताना पर्यावरण देखील जपले पाहिजे हा दृष्टिकोन समोर ठेऊन १९८४ मध्ये त्यांच्या पुढाकारानेच ‘अर्बन डिझाईन रिसर्च इन्स्टिट्युट‘ची स्थापन करण्यात आली. वास्तुकलेतील आगा खान पुरस्कार तसेच प्रीमियम इम्पेरियल ऑफ जपान आणि रॉयल गोल्ड मेडल ऑफ दी रॉयल इन्स्टट्यिूट ऑफ ब्रिटिश आर्किटेक्ट्स (रिबा) या प्रतिष्ठित पुरस्कारांचे ते मानकरी होते. जपान तसेच इंग्लंडनेही त्यांचा प्रतिष्ठित पुरस्कारांनी सन्मान केला. रॉयल इन्स्टिटय़ूट ऑफ ब्रिटिश आर्किटेक्ट्सने भारतातील सर्वात मोठे वास्तुरचनाकार म्हणून त्यांना नावाजले. भारत सरकारने १९७२ मध्ये त्यांना ‘पद्मश्री‘ तर २००६मध्ये ‘पद्मविभूषण‘ हा पुरस्कार देऊन गौरवले होते. भारतात व जगभरातही अनेक विद्यार्थ्यांना त्यांनी वास्तुरचनेचे धडे दिले. अरुण खोपकर यांनी चार्ल्स कोरिया यांच्या जीवनावर 'व्हॉल्युम झीरो' हा लघुपट बनवला होता. चार्ल्स कोरिया यांचे १६ जून २०१५ रोजी निधन झाले.
🙏🙏🙏
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा