श्यामची आई
संस्कार म्हणजे नक्की काय?
बहुतेकांच्या मते घरी संध्याकाळी शुभंकरोती म्हणणे, मोठयांचा आदर करणे, खरे बोलणे, स्वच्छतेचे पालन करणे… पण हे संस्कार मुलांमध्ये रूजणार कसे? संस्कार हे एका पिढीतून दुस-या पिढीत रूजवायचे असतात. संस्कारांचा अनमोल ठेवा साने गुरूजी यांनी ‘श्यामची आई’च्या रूपाने लिहून ठेवला आहे. ‘श्यामची आई’ पुस्तकावर कितीतरी पिढया संस्कारक्षम झाल्या; साने गुरुजीनी लिहिलेले ‘श्यामची आई’ हे पुस्तक कोणत्याही काळात उपयुक्त ठरणारे पुस्तक आहे. कित्येक पिढ्यांवर सुसंस्कार करण्याचं काम या एका पुस्तकाने केलं.
प्रेम आणि मातृत्वाचा साक्षात्कार घडवून आणण्याची ताकद ज्यांच्या लेखणीत व वाणीत होती, अशा मा.साने गुरुजी यांच्या `श्यामची आई' या अवीट गोडीच्या पुस्तकाच्या लिखाणाची सुरुवात ९ फेब्रुवारी १९३३ साली झाली. स्थळ होते, नाशिकचा तुरुंग व समोर श्रोते होते, तुरुंगात विविध गुन्ह्यांसाठी शिक्षा भोगणारे कैदी. स्वातंत्र्य चळवळीत सत्याग्रह केल्याच्या `गुन्ह्या'साठी साने गुरुजीही सजा भोगत होते., कैद्यांना रात्री आईच्या गोष्टी सांगतानाच साने गुरुजी त्या आठवणी लिहून काढत राहिले. पाच दिवसांत म्हणजे १३ फेब्रुवारीपर्यंत त्यांनी पुस्तक लिहीले.
`श्यामची आई' ही साने गुरुजींच्या लहानपणीच्या जीवनाची गोष्ट. पांडुरंग सदाशिव साने नावाचा कोकणातला मुलगा त्याच्या आई-वडिलांसह परिस्थितीशी झुंज देत देत मोठा होतो. वडिलांच्या पडत्या काळात घर सांभाळतानाच मुलांवर चांगले संस्कार व्हावेत, म्हणून आईची चाललेली धडपड रोजची अनुभवतो. या साऱ्याचे त्याच्या बालमनावर खोलवर परिणाम होत राहतात. तीच स्पंदने `श्यामची आई' मध्ये टिपलेली आहेत. यातला `श्याम' म्हणजे स्वत: साने गुरुजी. स्वत:ला स्वत:पासून दूर करून आत्मकथन करण्याचा विलक्षण वेगळा व कठीण प्रयोग साने गुरुजींनी `श्यामची आई'ची रचना करताना साकारला. तो कमालाचीचा यशस्वीही झाला.
`श्यामची आई'च्या प्रत्येक प्रकरणाचे शीर्षक `रात्र' असे आहे. अशा ४२ रात्रींत श्यामच्या आईचे कथानक पूर्ण होते. `श्यामची आई' वाचताना ज्याच्या डोळ्याच्या कडा ओलावल्या नाहीत, असा माणूस क्वचितच सापडेल. हे कथानक म्हणजे खरे तर गद्य रुपात साने गुरुजींनी रचलेले काव्यच आहे.
त्यावर आधारित `श्यामची आई' हा मराठी चित्रपट मा.आचार्य अत्रे यांनी १९५३ साली निर्माण केला. तो प्रचंड गाजलाच, शिवाय त्याच वर्षीपासून सुरू झालेला राष्ट्रीय पातळीवरील सर्वोत्तम चित्रपटाचा पुरस्कार याच चित्रपटाला मिळाला.
🙏🙏🙏
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा