*लक्ष्मणराव काशिनाथ किर्लोस्कर*
*जन्म : २० जून १८६९*
(गुर्लहोसूर)
*मृत्यू : २६ सप्टेंबर १९५६*
राष्ट्रीयत्व : भारतीय
नागरिकत्व : भारतीय
पेशा : संचालक, किर्लोस्कर समूह
प्रसिद्ध कामे : किर्लोस्कर समूह
अपत्ये : शंतनुराव किर्लोस्कर
वडील : काशिनाथ किर्लोस्कर महाराष्ट्रातील शेतकरी वापरत असलेल्या लोखंडी नांगराचे जनक लक्ष्मणराव काशिनाथ किर्लोस्कर यांचा जन्म बेळगावातील गुर्लहोसूर येथे झाला. त्यांचे बालपण बेळगाव येथे गेले. सुरुवातीला त्यांनी बेळगाव येथे सायकल दुरुस्तीचे दुकान टाकले. त्याचबरोबरीने त्यांनी दुकानाच्या मागील बाजूस लहान शेडमध्ये कडबा कापणीचे यंत्र तयार करण्याचे काम सुरू केले. त्यामुळे कोणत्याही एका कामाकडे लक्ष देता येत नाही, हे लक्षात आल्यामुळे लक्ष्मणरावांनी सायकल दुरुस्तीचा व्यवसाय बंद करण्याचे ठरवले व १९०३मध्ये सायकलचे दुकान तीन हजार रुपयांना विकले व कडबा कापण्याच्या यंत्रासोबत दुसरे शेतीला आवश्यक असणारे यंत्र तयार करण्याचे ठरवले.
भारत हा कृषिप्रधान देश असल्यामुळे सुमारे ८० टक्के लोक शेतीचा व्यवसाय करतात. तेव्हा त्यांना उपयुक्त व फायदेशीर ठरणारे यंत्र तयार केले तर आपल्या मालाला मागणी येईल, अशी त्यांना खात्री वाटली. त्या काळी पश्चिम भारतात, मुख्यतः महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात या राज्यांमधील शेतकरी वर्ग जमिनीच्या पूर्वमशागतीसाठी लाकडी नांगराचा उपयोग करत असत. या लाकडी नांगराने उथळ नांगरणी होत असे. लक्ष्मणरावांना त्या वेळेच्या पारंपरिक शेती नांगरणीतील समस्यांची पूर्ण जाणीव होती. अशा स्थितीत नांगरणीसाठी कोणत्या उपकरणांची आवश्यकता आहे, हे त्यांनी जाणले आणि लोखंडी नांगर बनवण्याची कल्पना त्यांच्या मनात निर्माण झाली. तेव्हा त्यांनी सुधारलेल्या परदेशी शेतीच्या आऊतांचे नमुने पाहिले. जमिनीच्या मशागतीसंबंधी शक्य ती सर्व माहिती त्यांनी गोळा केली. त्या वेळी शेतकी खात्याने विलायती नांगर प्रसारित करण्याचा प्रयत्न केला होता. तेव्हा शेतकी खात्याचे वरिष्ठ अधिकारी मल्हार लिंगो कुलकर्णी यांच्या साहाय्याने किर्लोस्कर यांनी नमुन्याचा नांगर तयार करण्याचे ठरवले. त्यासाठी एक विलायती नांगर आणला. या नांगराचे फाळ, पाठ, मधला भाग इ. बिडाचे होते व हाळीस व रूमणे लोखंडी पट्ट्याचे होते. हा नांगर तयार करायला लागणारी बिडाची भट्टी त्यांनी माळरानावर उभी केली. लोंढ्याहून मोल्डिंग सॅड व फायर क्ले मागवली. चार पोती कोक गोळा केला व साचे घालून ओतकामाला सुरुवात केली, परंतु या कामाचा अनुभव नसल्यामुळे त्यात त्यांना अपयश आले. परंतु तेव्हा त्यांनी हार न मानता अनेक युक्त्या लढवून आपल्याला हवे तसे नांगराचे भाग यशस्वीपणे तयार केले. त्या वेळेस किर्लोस्करांनी आपल्या छोटेखानी कारखान्यात सहा नांगर तयार केले, परंतु त्यातील एकही नांगर विकला गेला नाही. तसेच, शेतकऱ्यांच्या मनातील अंधश्रद्धेपोटी हा नांगर अनेक दिवस कारखान्यात पडून राहिला. पुढे मिरजमधील जोशी नावाच्या सुशिक्षित शेतकऱ्याला नांगराचे महत्त्व पटून ते सहाही नांगर विकत घेतले. त्यानंतर पलूस येथील पांडू पाटील यांनी किर्लोस्करांकडे ३५ नांगरांची मागणी केली. कालांतराने किर्लोस्करांच्या लक्षात आले की, काळ्या जमिनीत वापरण्यासाठीचा नांगर अधिक वजनदार हवा. त्यामुळे नांगरांचे काही भाग अधिक जड करून व हाळीस पट्ट्यांची लांबी वाढवून त्यात आवश्यक त्या सुधारणा त्यांनी केल्या. हा सुधारित नांगर त्यांनी शिफारशीसाठी शेतकी खात्याकडे पाठवला. युरोपीयन अधिकाऱ्यांनी नांगरात दोष असल्याचे सांगून विलायती नांगरांचीच शिफारस केली. त्यामुळे चिडलेल्या किर्लोस्करांनी आपल्या नांगरातील दोषांची शहानिशा करण्यासाठी व निरनिराळ्या विलायती कंपन्यांचे फाळ मागवले व त्याचा अभ्यास केला. तेव्हा त्यांनी विलायती फाळ तयार करण्यास कोणती पद्धत वापरतात याचा शोध लावला. ती पद्धत अवलंबल्यावर किर्लोस्करांचे फाळ विलायती फाळांसारखे होऊ लागले, परंतु तेवढ्यावर समाधान न मानता त्यांनी त्यात अनेकानेक प्रयोग करून फाळ अधिक उपयुक्त केला. १९१०मध्ये किर्लोस्करवाडी येथे आधुनिक पद्धतीचा पहिला लोखंडी नांगर तयार झाला. हाच नांगर महाराष्ट्राच्या शेतीसाठी क्रांतिकारक बदल करणारा ठरला.
नंतर हळूहळू शेतकऱ्यांना लोखंडी नांगराची उपयुक्तता पटली व त्यांनी नांगर खरेदी करण्यास सुरुवात केली. अल्पावधीतच किर्लोस्करवाडी येथील कारखान्यातून दिवसाला २००-२५० नांगर बाहेर पडू लागले. त्यावेळेस महाराष्ट्रातील जवळजवळ सर्व मोठ्या शेतकऱ्यांकडे लोखंडी नांगर होते. हे एक प्रकारे किर्लोस्कर यांच्या संशोधनाला मिळालेले यशच म्हणता येईल. शेती क्षेत्रात लागणाऱ्या अवजारांत घडलेली ही एक क्रांतीच होय.
किर्लोस्करांनी पुढे कडबा कुट्टी यंत्र, शेंगा फोडणी यंत्र, उसाचे गुर्हाळ आणि पाण्याच्या पंपाचे उत्पादनसुद्धा सुरू केले. महाराष्ट्राच्या शेतीला लागणाऱ्या दोन महत्त्वाच्या गोष्टी, एक-लोखंडी नांगर व दोन-पाण्याचा पंप, किर्लोस्करांनी दिला. लक्ष्मणरावांच्या या योगदानाबद्दल भारत सरकारने त्यांच्या नावाचे टपाल तिकीट काढले. त्यांचे सुपुत्र शंतनु किर्लोस्कर यांनी कारखानदारीत जगात नाव उज्ज्वल केले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा