पक्षी शास्त्रज्ञ आणि पर्यावरणवादी डॉ. सलीम अली
जन्म. १२ नोव्हेंबर १८९६
सलीम अली यांनी यांनी भारतातील ब्रिटिश राजवटीच्या काळात भारतातील पक्ष्यांचा आढळ, त्यांच्या सवयी, पक्ष्यांच्या विविध जाती आणि जातींमधील वैविध्य यांचा बारकाईने अभ्यास केला. त्यांच्या ह्या कार्याने भारतात हौशी पक्षिनिरीक्षक बनण्याची परंपरा चालू झाली. भारतातील हे पक्षी निरीक्षक सलीम अली यांना आद्य गुरू मानतात. जुन्या मुंबईच्या खेतवाडी मध्ये मुस्लिम कुटुंबात अली यांचा जन्म झाला. लहानपणी भेटवस्तू म्हणून दिलेल्या छ-याच्या बंदूकीने लहान पक्षी टिपायचे हा त्यांचा छंद होता. एके दिवशी टिपलेल्या चिमण्यांमध्ये त्यांना वेगळी चिमणी मिळाली. हिच्या गळ्यापाशी पिवळा ठिपका होता. नेहेमी पेक्षा वेगळा दिसल्याने त्यांची उत्सुकता चाळवली व त्यांच्या मामांकडे हा पक्षी कोणता याची विचारणी केली. मामांनी सरळ त्याला बॉम्बे नॅचरल हिस्टरी सोसायटीच्या संचालकाकडे घेउन गेले. तेथे संचालकांनी लहान अलीला हा कोणता पक्षी आहे हे सविस्तर सांगितले. तसेच भुसा भरलेल्या पक्ष्यांचा संग्रह दाखवला. भारावलेल्या लहान सलिम अलींना पक्ष्यांची जी भुरळ पडली ती कायमचीच. ब्रम्हदेशातील आपल्या बंधूंच्या धंद्याला मदत म्हणून रंगूनला गेले. तेथे धंद्यात मदतीसोबत ब्रम्हदेशातील जंगले फिरुन पक्ष्यांना टिपून नोंदी ठेवायचा छंद चालू ठेवला. १९२४ मध्ये रंगून मधील धंद्यात अपयश आल्यानंतर अली भारतात परत आले. त्यांना बॉम्बे नॅचरल हिस्टरी सोसायटीमध्ये गाईड लेक्चररची नोकरी मिळाली परंतु अलींना ते पुरेसे नव्हते. त्यावेळेस भारतात पक्षीशास्त्र (ornithology) हा विषय अस्तित्वातच नव्हता. यासाठी त्यांनी जर्मनीमध्ये जाऊन पक्षीशास्त्रावर प्रशिक्षण घेतले व काही काळ इंग्लंडमध्ये काम केले. त्यांनी सुगरण पक्ष्याच्या वर्तनावर अतिशय बारकाईने अभ्यास केला व त्यावर बीनएचएस च्या जर्नलमध्ये प्रदीर्घ शोधनिबंध लिहीला. या निंबधाने त्यांना पक्षीशास्त्रज्ञ म्हणून नावलौकिक मिळवून दिला. तसेच केवळ टिपून भुसा भरुन संग्रहालयात ठेवण्यापुरते पक्षीशास्त्र नाही हे त्यांनी जगाला दाखवून दिले व एकूणच पक्षीशास्त्राला वेगळी दिशा दिली. सलीम अलींचे पक्षी शास्त्रज्ञ म्हणून मोठेपण कशात आहे तर त्यांनी प्रकाशित केलेली पुस्तके. भारतभर फिरुन त्यांनी जी तपशीलवार माहिती गोळा केली होती, त्यांचे त्यांनी केवळ रेकॉर्डसमध्ये स्थान न ठेवता ती माहिती सर्व सामान्यांना वापरता येईल अश्या शैलित पुस्तके लिहिली.
त्यांनी लिहीलेल्या हँडबुक ऑफ इंडिया अँन्ड पाकिस्तान व पिक्टोरियल गाईड या दहा खंडीय पुस्तकाने त्यांना खऱ्या अर्थाने अजरामर केले. डॉ सिडने डिलन रिप्ली यांच्या साथीत त्यांनी अपार परिश्रम घेउन भारतीय पक्ष्यांच्या १२०० जाती, २१०० उपजातींच्या नोंदी, सवयी, शास्त्रशुद्ध सर्वांगीण माहिती चित्रांसहीत एकाच ठिकाणी उपलब्ध केली. १९५० व ६० च्या दशकात जेव्हा भारतात पर्यावरण हा शब्द अस्तित्वातच नव्हता त्यावेळेस भरतपूरच्या केवलदेव घाना राष्ट्रीय उद्यान तसेच केरळमधील सायलंट व्हॅली राष्ट्रीय उद्यानात तत्कालिन होणारे पर्यावरणास हानीकारक प्रकल्पांना विरोध दर्शावला. त्यांनी केलेल्या शास्त्रीय वादावर सरकारने नमते घेऊन इंदिरा गांधी सरकारने हे प्रकल्प स्थगित केले. तसेच अंततः त्यांना राष्ट्रीय उद्यानांचा दर्जा देऊन कायमचे संरक्षित केले. तसेच अनेक दुर्मिळ प्राणी व पक्षी यांबाबत आपल्या पुस्तकांद्वारे, संस्थेद्वारे, शिष्यांमार्फत सरकार तसेच सामान्य नागरिकात केलेले प्रबोधन भारतातील पर्यावरण चळवळीचा पाया ठरले. त्यामुळेच भारतातील आद्य पर्यावरणवाद्यांमध्ये डॉ अली यांचा समावेश होतो. सलीम अली यांचा जन्मदिन हा 'पक्षीदिन' म्हणून साजरा केला जातो. डॉ. सलीम अली यांना भारत सरकारने पद्मभूषण देऊन सन्मान केला होता. तसेच ब्रिटीश पक्षीतज्ज्ञ संघाचे (British Ornithologists Union) राष्ट्रीय पदक ही मिळाले. *डॉ. सलीम अली* यांचे २० जून १९८७ रोजी निधन झाले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा