फक्त भारतातच नाही तर लंडनमध्ये वकिली करणाऱ्या पहिल्या महिला कॉर्नेलिया सोराबजी
जन्म. १५ नोव्हेंबर १८६६ साली नाशिकमधील देवळाली येथे.
कॉर्नेलिया सोराबजी यांचा नाशिकमधील देवळाली येथे एका पारशी कुटुंबात जन्म झाला. रेव्हरंड सोराबजी आणि पत्नी फ्रान्सिना फोर्ड यांच्या नऊ मुलांपैकी कॉर्नेलिया एक होत्या. त्यांचे वडील धर्मप्रचारक होते. कॉर्नेलिया यांच्या आईने पुणे येथे मुलींच्या शिक्षणासाठी शाळा स्थापन केली. महिलांचा वारसा आणि मालमत्ता अधिकारांशी संबंधित प्रकरणांमध्ये स्थानिक महिला या कॉर्नेलिया यांच्या आईचा सल्ला घेत असत. यामुळे सोराबजी यांच्या शैक्षणिक निर्णयांवर आईच्या विचारांचा खूप प्रभाव होता. यामुळे कॉर्नेलिया यांचे शिक्षण डेक्कन कॉलेजमध्ये झाले. पुढील शिक्षणासाठी इंग्लंडमध्ये जाण्यासाठी त्यांना सरकारी शिष्यवृत्ती मिळेल, अशी आशा होती. मात्र, त्यांना शिष्यवृत्ती नाकारण्यात आली. त्याऐवजी गुजरातमधील एका बॉईज कॉलेजमध्ये इंग्रजी प्राध्यापक म्हणून त्यांची तात्पुरती नियुक्ती केली गेली. यानंतर त्यांनी मुंबई विद्यापीठातून पदवी घेतली. मुंबई विद्यापीठातून पदवीधर होणाऱ्या त्या पहिला महिल्या होत्या. तसेच ऑक्सफर्ड विद्यापीठात जाऊन कायद्याचे शिक्षण घेणाऱ्यादेखील त्या पहिल्या महिला भारतीय होत्या. वकिलीबरोबरच कॉर्नेलिया सामाजिक कार्यातही सक्रीय होत्या. महिलांना शिक्षण मिळावे म्हणून त्यांनी बराच संघर्ष केला. त्यांनी या विषयावर अनेक पुस्तकेही लिहिली आहेत. कॉर्नेलिया सोराबजी यांचं संपूर्ण जीवन संघर्षाने भरलेले होते.
ऑक्सफर्ड विद्यापीठात शिक्षण घेण्यासाठी शिष्यवृत्ती मिळवतानाही त्यांना संघर्ष करावा लागला. भारतात परतल्यानंतर त्यांनी पदराआड राहणाऱ्या महिलांना अधिकार मिळवून देण्यासाठी लढा दिला. त्याकाळात महिलांना त्यांच्या पतीशिवाय कुणाशीही बोलण्याची परवानगी नव्हती. ही प्रथा बंद व्हावी म्हणून त्यांनी सातत्याने प्रयत्न केले. १८९२ मध्ये कायद्याचा अभ्यास करण्यासाठी कॉर्नेलिया लंडनमध्ये गेल्या. १८९४ मध्ये वकिलीचे शिक्षणपूर्ण करत त्या पुन्हा भारतात परतल्या होत्या. त्याकाळात महिलांना वकिली करण्याचा अधिकार नव्हता. यामुळे विदेशातून कायद्याचे शिक्षण घेऊन आलेल्या सोराबजींनी या विरोधात आवाज उठवला. सोराबजींनी महिलांना कायदेशीर सल्ला देण्यास सुरुवात केली. कालांतराने महिलांना वकिली व्यवसायाची दारे खुली करुन देण्यात आली.
१९०७ साली कॉर्नेलिया यांची बंगाल, बिहार, ओडिशा व आसाममधील न्यायालयात सहाय्यक वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली. महिलांना वकिली करण्यापासून रोखणारा कायदा बदलण्यासाठी त्यांनी मोठा संघर्ष केला. अखेर १९२४ मध्ये तो अन्यायी कायदा रद्द करण्यात आला. १९२९ साली सोराबजी उच्च न्यायालयातून निवृत्त झाल्या. यानंतर त्या लंडनमध्ये जाऊन स्थायिक झाल्या. कॉर्नेलिया सोराबजी यांचे ६ जुलै १९५४ रोजी लंडन येथे निधन झाले. गुगलने कॉर्नेलिया यांचे त्यांच्या जयंतीला डुडल साकारले होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा