ग. प्र. प्रधान *
समाजवादी विचारवंत, साहित्यिक आणि विधानपरिषदेचे माजी विरोधी पक्षनेते गणेश प्रभाकर प्रधान यांचा जन्म २६ ऑगस्ट १९२२ रोजी झाला.
ग. प्र. प्रधान यांचे वडील संस्कृतचे पदवीधर होते. एक वर्ष नोकरी करायची, एक वर्ष शिकायचे असे करत त्यांनी शिक्षण पुरे केले. प्रधान मास्तरांचे डोळे लहानपणापासून थोडे अधू असल्याने त्यांना लहानपणी खेळ खेळता येत नव्हते, म्हणून ते एकलकोंडे झाले, परंतु ते वाचनवेडे होते. त्यांच्या वडलांची बदली झाली आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या शाळेत ते जाऊ लागले आणि त्यांच्या पांढरपेशीपणाला पहिला धक्का लागला.
वयाच्या अकराव्या वर्षी विद्यार्थी स्वतः स्वयंपाक करतात हे पाहिल्या बरोबर त्यांना आश्चर्य वाटले. तेथे जातपात, धर्म मानले जात नव्हते. कष्ट आणि स्वावलंबन हा एकमेव धर्म तेथे होता त्याचा प्रभाव प्रधान मास्तरांवर लहानपणीच पडला. या शाळेतला 'संस्कृत डे' त्यांच्या मनावर कोरला गेला कारण पु.म. लाड यांचे संस्कृत भाषण ऐकायला मिळाले त्याचा प्रभाव त्यांच्यावर खूप पडला. त्यावेळी त्यांनी शाळेत कवी यशवंत, माधव ज्युलियन या कवींचे काव्यगायन ऐकले.
सातारच्या वाचनालयातील पुस्तके झपाटल्या सारखी वाचून काढली. पुढे त्यांच्या वडलांची बदली 'पारनेर' यथे झाली. तिथे हायस्कूल नसल्यामुळे त्यांना पुण्यास यावे लागले. आधी शनिवार पेठेत आणि मग पूढे सदाशिव पेठ. प्रधान मास्तरांचे मामा जळगाव हायस्कूल मध्ये शिक्षक होते. ते साने गुरुजींचे मित्र होते. मामांच्या प्रभावामुळे त्यांना खादी वापरताना पाहून त्यांनी खादीचे कपडे वापरायला सुरवात केली.
इंग्रजी घेऊन ते बीए झाले. ते साल १९४२ होते. स्वातंत्र्यवादी चळवळीसाठी समाजवादी पक्षात त्यांनी प्रवेश केला. स्वातंत्र्य चळवळीचे ते दिवस होते. प्रत्येक तरुण स्वतःला त्यात झोकून देत असताना त्यानी एमए ला नाव घेतले, पण मनात ध्यास चळवळीचा होता.
'चले जाव' आंदोलन सुरु झाले. प्रधान मास्तर त्या लढ्यात सामील झाले. ते स्कॉलर असल्यामुळे त्यांनी बुलेटिनचे काम स्वीकारले. त्यावेळी महादेवभाई आगाखान पॅलेस मध्ये असताना वारले. त्या दिवशीचे बुलेटिन स्वतः साने गुरुजींनी त्यांना डिक्टेट केले होते. पुढे ते पकडले गेले. अनेकांना मार, लाठ्या खाव्या लागल्या. प्रधान मास्तरांनाही लाठ्या खाव्या लागल्या.
साने गुरुजी आणि ते सहा महिने एकाच बराकीत होते. त्यांना आणि काही जणांना साने गुरुजी बंगाली शिकवयाचे. घराची जबाबदारी आल्यावर ते एमए झाले. फर्ग्युसन कॉलेज मध्ये अर्धवेळ लेक्चरर आणि मुख्यतः तेथे पर्यवेक्षकाची जागा होती. माटे सरानी सांगितले इथे रहायचे असेल तर राजकारण करायचे नाही. तेव्हा प्रधान मास्तरांनी विचारले, सेवादलाचे काम केले तर चालेल का? तेव्हा माटे सर म्हणाले शैक्षणिक असेल तर कर.
प्रधान मास्तरांनी १९४५ ते १९६५ साल पर्यंत फर्ग्युसन कॉलेज मध्ये शिकवले. १९६५ साली त्यांच्या पत्नी
बीए एमएस पास होऊन डॉक्टरी व्यवसाय करू लागल्या. तो पर्यंत कौटुंबिक जबाबदाऱ्या कमी झाल्या होत्या. त्यांनी आपल्या पत्नीला विचारले, तू घराची जबाबदारी घेशील का? मला नोकरी सोडून सोशलिस्ट पार्टीचे काम करायचे आहे. पत्नीने ते मान्य केले. आणि ते पूर्णवेळ राजकारणात आले.
१९६५ मध्ये पीबीआय चे वार्ताहर म्ह्णून ते शिरुभाऊ बरोबर हाजिपीर खिडी पर्यंत गेले. त्यावर पुढे 'हाजिपीर' हे पुस्तक लिहिले. ना.ग. गोरे प्रधान मास्तरांना म्हणाले, तू निवडणुकीला उभा राहा. पत्नीचे दोन दागिने मोडले. निवडणूकीसाठी असे पैसे त्यानी जमा केले. कॉलेज मध्ये शिकवल्यामुळे अनेक विद्यार्थी मतदार होते, अनेक प्राध्यापक मित्र होते, ओळखीचे होते त्यामुळे ते निवडून आले. पुढे दोनदा निवडून आले. १९८० ते १९८२ विधान परिषेदेत विरोधी पक्षनेता म्हणून काम केले.
ग. प्र. प्रधान यांनी अनेक वृत्तपत्रातून लिखाण केले. तसेच ते निस्पृह कार्यकर्ता, विचारवंत म्हणून ते समाजात वावरले. प्रधान यांना 'लोकमान्यांची राजकीय दूरदृष्टी आणि ज्ञानाचे उपासक' या पुस्तकासाठी राज्य शासनाचा पुरस्कार मिळाला होता.
मराठी मध्ये लोकमान्यांची राजकीय दूरदृष्टी आणि ज्ञानाचे उपासक, आगरकर लेख संग्रह, महाराष्ट्राचे शिल्पकार ना.ग. गोरे, साता उत्तरांची कहाणी, सत्याग्रही गांधीजी, माझी वाटचाल, डॉ. बाबासाहेब आंबेडकर त्यांच्याच शब्दांत, भाकरी आणि स्वातंत्र्य, काजरकोट, सोनार बांगला ही त्यांची पुस्तके प्रकाशित झाली. तर इंग्रजीत लोकमान्य टिळक अ बायोग्राफी, इंडियाज फ़्रीडम स्ट्रगल, ऍन एपिक ऑफ सॅक्रिफाइस अँड सफरिंग, लेटर टु टॉलस्टॉय, परस्यूट ऑफ आयडियल्स ही त्यांची पुस्तके प्रकाशित झाली.
ग. प्र. प्रधान यांचे २९ मे २०१० रोजी निधन झाले...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा