समाजकारण /राजकारण

मी विजय भुजबळ ग्रेट इंडियन या ब्लॉगवर सहर्ष स्वागत करत आहे WELCOME TO MY BLOG GREAT INDIAN THANKS FOR VISIT MY BLOG AND FOLLOW MY BLOG
FOLLOW MY BLOG


 

Translate /ब्लॉग वाचा जगातील कोणत्याही भाषेत

विशेष प्रश्नमंजुषा टेस्ट सोडवा सर्टिफिकेट मिळवा

रमाबाई रानडे



रमाबाई रानडे यांचा जन्म - २५ जानेवारी १८६२ रोजी झाला तर त्यांचा

स्मृतीदिन आहे २६ एप्रिल १९२४ (पुणे) .


एकोणिसाव्या शतकात झाशीची राणी लक्ष्मीबाई, सावित्रीबाई फुले, आनंदीबाई जोशी, लक्ष्मीबाई टिळक, मादाम कामा, भगिनी निवेदिता अशा कर्तृत्ववान स्त्रिया जन्माला आल्या.  रमाबाई रानडे यांचे कामाचा उल्लेख करणे आवश्यक आहे. 


एक मध्यमवर्ग ब्राह्मण कुटुंबात जन्म घेतलेली मुलगी आपल्या कर्तृत्वाने सर्व भारतभर प्रसिद्ध पावली. सातारा जिल्ह्य़ातील देवराष्ट्रे गावाचे जहागीरदार माधवराव कुर्लेकर हे रमाबाईंचे वडील. रमाबाईंचे माहेरचे नाव यमुना. मुलगी मोठी म्हणजे साधारण १० वर्षांची झाल्यानंतर कुर्लेकर यमुनेला पुण्यास घेऊन आले. 


एखाद्या सुप्रसिद्ध घराण्यातील बुद्धिमान व इंग्रजी विद्येत प्रवीण असलेला वर मिळवावयाचा अशी त्यांची महत्त्वाकांक्षा होती. अण्णासाहेब कुर्लेकर व गोविंदराव रानडे यांचा पूर्वीपासूनच परिचय होता. त्याच सुमारास माधवराव विधुर झालेले आहेत आणि गोविंदराव त्यांच्यासाठी मुली पाहात आहेत हे अण्णासाहेबांना समजले. वास्तविक माधवराव त्यावेळी ३१ वर्षांचे व यमुना ११ वर्षांची होती. 


अण्णासाहेबांनी गोविंदरावांची भेट घेतली व आपली मुलगी पाहण्याची विनंती केली. मुलगी पसंत पडली. पण माधवराव लग्नाला तयार नव्हते. ते विधवा विवाहाचे पुरस्कर्ते होते व एखाद्या विधवेशी लग्न करावयाचे त्यांच्या मनात होते. पण वडिलांनी हे लग्न झाले नाही तर तुमचा आमचा संबंध सुटला व मी करवीरास कायमचा निघून जाईन, असे निक्षून सांगितले. त्यामुळे माधवरावांना नाइलाजाने संमती द्यावी लागली व मार्गशीर्ष शुद्ध एकादशी (डिसेंबर १८७३) रोजी गोरज मुहूर्तावर लग्न झाले. 


माधवरावांनी कुठलाही समारंभ होऊ दिला नाही. ते आटोपल्यावर रात्री १०-३० वाजता माधवराव व रमाबाई दोघेही पायी चालत आपल्या घरी आले. घरी आल्यावर कोणाशी न बोलता माधवराव आपल्या खोलीत गेले व आत कडी लावून बसले. लग्नानंतर दोन-तीन दिवसांनी कोर्टातून आल्यावर माधवरावांनी रमाबाईंना गच्चीवर बोलावून घेतले व रमाबाईंना जाणून घेण्याकरिता विचारले. आपले लग्न झाले आहे, पण मी कोण आहे, माझे नाव काय हे तुला माहीत आहे का? रमाबाईंनी मानेनेच हो म्हणून सांगितले.


मग सांग बघू. रमाबाईंनी सांगितले ‘महादेव गोविंद रानडे सदर अमीन. हे ऐकल्यानंतर पहिल्या भेटीत रमाबाईंच्या मनाची अकृत्रिमता, धीटपणा व तरतरीतपणा माधवरावांच्या लक्षात आला. त्यानंतर माहेरची चौकशी केली व लिहिण्याविषयी चौकशी केली. रमाबाईंना अक्षरओळखही नव्हती. त्याच रात्री त्यांनी एक पाटी पेन्सिल आणली व रमाबाईंना ‘श्रीगणेशाय नम:’ लिहिण्यास शिकवले. रमाबाईंनी अक्षरे गिरवून दोन तासांत पक्की केली. दुसऱ्या दिवसापासून ते रोज रात्री दोन तास शिकवत असत. 


पंधराव्या दिवशी त्यांनी क्रमिक पुस्तकातील धडा वाचून दाखवला. त्यानंतर माधवरावांनी त्यांना व्याकरण, गणित, मोडी लेखन शिकवले. मध्यंतरी एक शिकवणी ठेवली होती. पण त्यात प्रगती दिसली नाही. म्हणून त्यांनी फीमेल ट्रेनिंग कॉलेजच्या शाळेतील पोक्त अनुभवी सगुणाबाई देव यांना शिकवण्यास ठेवले. १८७५ पर्यंत पाचवीपर्यंतच्या अभ्यासाची तयारी झाली. १८८१ मध्ये माधवरावांची असिस्टंट स्पेशल जज्ज या जागेवर बदली झाली व त्या निमित्ताने त्यांना फिरतीवर जावे लागणार होते म्हणून त्यांनी रमाबाईंना शिकवण्यास वानवडीच्या झनाना मिशनमधील मिस हरफर्ड यांची शिकवणी ठेवली. त्या रोज दोन ते साडेतीन त्यांना इंग्रजी शिकवीत. त्या शिकवून गेल्यानंतर रमाबाई वस्त्रांतर करून घरात काम करावयास गेल्या तेव्हा अक्कांनी ताकीद दिली, ‘मडमेला शिवल्यानंतर अंग धुवायचे नसले तर माडीवरच बसून राहा.’ त्यानंतर रमाबाई शिकवणीनंतर विहिरीवर जाऊन स्नान करत. पण काही दिवसांनी त्यांना ताप येऊ लागला. ही हकीकत माधवरावांना कळविण्यात आली. 


माधवरावांनी रमाबाईंना हरफर्डबाई शिकवून गेल्यावर स्नान करण्याचे कारण नाही असे कळवले. आक्कांनी निरोप पाठवला. आडावर अंग धुऊन आमच्याभोवती दुखणी आणू नको. तुम्ही हव्या तशा नाचा. रमाबाई जात्याच हुशार असल्यामुळे आठ-नऊ वर्षांत शिक्षण संपादन करून सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रांत एवढी प्रतिष्ठा मिळविली की १८८२-८३ मध्ये म्हणजे वयाच्या २०व्या वर्षी फीमेल ट्रेनिंग कॉलेज मध्ये शिकून मास्तरीण होण्याकरिता स्त्रियांची निवड करण्याकरिता लेडी सुपरिंटेंडंटना सहाय्य करण्याकरिता शिक्षण खात्याने जी कमिटी नेमली होती तीमध्ये सरकारने रमाबाईंना सभासद म्हणून घेतले. या कमिटीचे इतर सभासद महादेवराव रानडे, प्रो. भांडारकर, प्रा. केरुनाना छत्रे, आ. मोडक व कृ. ल. नुलकर होते. व मा.रमाबाई एकट्याच स्त्री सभासद होत्या. 


विल्यम वेडरबर्न हे सिव्हिल सव्‍‌र्हिस मध्ये सनदी नोकर. त्यांना १०,००० रुपये शिक्षणाच्या कामासाठी देणगी द्यायची होती. ही रक्कम सरकारी नॉर्मल फीमेल क्लासला देण्याचा त्यांचा विचार होता. त्यांनी माधवरावांना यासंबंधी विचारले. पण माधवरावांनी त्या रकमेत आणखी काही हजारो रुपयांची रक्कम जमा करून मुलींसाठी पुण्यात हायस्कूल सुरू करण्याचे ठरविले आणि समाजाच्या सर्वधर्मीयांची सभा घेतली. त्यात वेडरबर्न देखील होते. तसेच इतर ब्रिटिश अधिकारी, पाच सहा संस्थानिक मिळून २ ते ३ हजार समुदाय उपस्थित होता. 


सभेस त्यावेळचे गव्हर्नर सर जेम्स फग्र्युसन यांच्यापुढे मुलींसाठी हायस्कूलची मागणी करण्याचे ठरले होते. त्याकरिता त्यांनी एक छोटेसे निवेदन इंग्लिशमध्ये लिहिले व ते सभेत वाचण्यासाठी रमाबाईंना देऊन त्यांची तयारी करून घेतली. रमाबाईंनी धैर्याने ते निवेदन इंग्लिशमधून वाचले. ही बातमी घरच्या बायकांच्या कानावर गेली. त्यांचा जळफळाट झाला. पण माधवरावांनी रमाबाईंना धीर देऊन त्यांना शांत राहण्यास सांगितले. कोणी कितीही बोलले तरी उलट उत्तर द्यावयाचे नाही. ‘मी तुला आहे ना’ असे म्हणून धीर दिला. 


पंडित नेहरूंची आई स्वरूपराणी नेहरू यांनी त्यांच्या अध्यक्षतेखालील अलाहाबाद येथील स्त्रियांच्या सभेत ही सभा सक्तीचे शिक्षण फक्त मुलांपुरते मर्यादित ठेवते व त्यांत मुलींना वगळण्यात येते, या योजनेचा निषेध करते असा ठराव पास करून तारेने रमाबाईंना कळवला. त्याअगोदर माधवराव यांची बदली नाशिक येथे झाली असताना तेथे वेळ भरपूर असल्याने जवळ असलेली एक बाग विकत घेऊन रमाबाईंनी भाज्या, फुलझाडे व फळझाडे लावली. जरुरीपुरत्या लागणाऱ्या भाज्या व फुले, फळे ठेवून उरलेल्या भाज्या, फळे, फुले गडय़ांबरोबर विकण्यास पाठवत. येणारी रक्कम बागेच्या खात्यात जमा करीत. याच वेळेस तेथे गोपाळ हरी देशमुख ऊर्फ लोकहितवादी हे जॉईंट जज्ज होते. एक म्हणजे या दोघांनी नाशिक येथे प्रार्थना समाजाची स्थापना केली. 


रमाबाई व लोकहितवादी यांच्या पत्नी गोपिकाबाई गावातील बायकांना तेथे हळदी-कुंकवासाठी बोलवत व त्यांना प्राचीन साध्वी स्त्रियांची चरित्रे वाचून दाखवत व त्यांचे शिक्षणाकडे मन वळवण्याचा प्रयत्न करीत. नाशिक येथे शाळांच्या परीक्षा संपल्यानंतर बक्षीस समारंभ व्हावयाचा होता तेथे ठाण्याचे मिस्टर कांगलन व मिसेस कांगलन आले होते व त्यांच्या हस्ते बक्षीस समारंभ होणार होता. 


रमाबाईंनी गावातल्या बायकांना आमंत्रणे दिली. ५०-६० बायका उपस्थित होत्या. मुलींना थोडासा उपदेशपर मजकूर रमाबाईंनी वाचून दाखवला. त्यानंतर डेप्युटीने हारतुऱ्यांचे तबक रमाबाईंकडे दिले. एक हार रमाबाईंनी कांगलन यांना घातला नंतर त्यांच्या बहिणीला व आईलासुद्धा एकेक हार घातला. उरलेला हार तसाच तबकांत ठेवला व कांगलन यांना घालण्याचे नाकारले. शेवटी तो हार रा. व. देशमुखांनी कांगलनसाहेबांना घातला. माधवरावांनी त्यांना रात्री विचारले असता त्यांनी उत्तर दिले, ‘‘मी हिंदू नसते तर त्यांना हार घातला असता.’’ 


१८८१ मध्ये माधवरावांची बदली मुंबई प्रेसिडेन्सी मॅजिस्ट्रेट म्हणून झाली. मुंबईत आल्यानंतर रमाबाई प्रार्थना समाजात भरणाऱ्या स्त्रियांच्या सभेला नियमितपणे जात. पुढील तीन महिन्यांत त्यांनी सभेपुढे दोन निबंध वाचले. पहिला- ‘स्त्रियांना अवश्य विद्या कोणती?’ आणि दुसरा- ‘स्त्रियांचे संसारातील कर्तव्य.’ विद्या म्हणजे ज्ञान. आईस जर ज्ञान नसेल तर किंवा चांगले शिक्षण नसेल तर मुलास कोठून येईल? 


मूल चांगले किंवा वाईट निपजणे हे आईच्या शिक्षणावर अवलंबून असते, हे त्यांनी आवर्जून सांगितले. एप्रिल १८८१ मध्ये पुण्यास सदर अमीन नेमणूक झाली. तेथे फीमेल ट्रेनिंगच्या कॉलेजच्या दिवाणख्यान्यात दर शनिवारी स्त्रियांची सभा भरू लागली. दहा-बारा बायका येत. या सभेत प्रा. छत्रे भूगोल, खगोलासंबंधी माहिती, आकृती फळ्यावर काढून चंद्र-सूर्य ग्रहणे वगैरेची माहिती देत. 


माधवरावांच्या निधनानंतर रमाबाई पुण्यास आल्या व १९०२ मध्ये आपल्या वाडय़ात ‘हिंदू लेडीज सोशल क्लब’ ही हिंदू स्त्रियांची संस्था आनंदीबाई भट यांच्या साहाय्याने चालू केली. संस्थेचा उद्देश स्त्रियांमध्ये ज्ञानप्रसार करून सामाजिक कर्तव्याची जाणीव उत्पन्न करणे हा होता. साप्ताहिक व्याख्यानांना पाऊणशे स्त्रिया येऊ लागल्या. क्लबने दुपारी तीन ते पाच व दोन-पाच असे मराठी व इंग्रजीचे वर्ग चालू केले. त्याचबरोबर धार्मिक ग्रंथ वाचण्याचे, शिवण कामाचे व फर्स्ट एडचे वर्ग चालू केले. 


१९०३ मध्ये लेडी नॉर्थकोट यांचा क्लबमधील स्त्रियांशी परिचय करून दिला. त्यानंतर १९०४ मध्ये मुंबईत ‘आद्य भारत महिला परिषद’ भरवली. त्यावेळेस भारतातील सर्व प्रांतातून स्त्रिया आल्या होत्या. पाश्चात्त्य देशातील सेवा वृत्तीने, आयुष्य काढणाऱ्या सेविकांचा-मिस्टर्सचा आदर्श आपण भारतीय स्त्रियांनी आपल्यापुढे ठेवावा, असे प्रतिपादन रमाबाईंनी केले. सेवासदनाची स्थापना मुंबईत १२ जुलै १९०८ मध्ये व पुण्याची शाखा १९०९ मध्ये २ ऑक्टोबर रोजी केली. सेवासदन संस्थेचे उपनाव ‘सिस्टर्स ऑफ इंडिया सोसायटी’ असे होते. पुण्याच्या शाखेचे कार्य खूप विस्तृत व विविध प्रकारचे होते. 


१९१२ साली सेवासदनने न्या. रानडे यांच्या स्मरणाप्रीत्यर्थ ४००० रु. जमवले. त्यापैकी १००० रु.च्या व्याजातून अलेक्झांड्रा गर्ल्स स्कूल व १५०० रु. व्याजातून स्टुडन्ट्स लिटररी सोसायटीच्या मुलींच्या शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थिनीस न्या. रानडे यांच्या नावाने दरसाल बक्षिसे देण्याची सोय केली. शिवाय पंढरपूरच्या बालकाश्रमास ५०० रु. व हिंगण्याच्या अनाथ बालिकाश्रमातील विद्यार्थिनींसाठी एक लहानसा दिवाणखाना बांधून दिला. 


१९०९ मध्ये फेब्रुवारी ते जून दरम्यान २४ व्याख्याने आयोजित केली. त्यात प्रामुख्याने गो. कृ. देवधर, न. चिं. केळकर, महर्षि कर्वे अशी मातब्बर मंडळी होती. याशिवाय स्वामी विवेकानंदाच्या दोन शिष्यांना (इंग्लिश व अमेरिकन) क्लब मध्ये बोलावून त्यांची वेदान्तावर व हिंदू धर्मावर भाषणे झाली. रमाबाईंनी पहिली पाच वर्षे आपल्या वाडय़ातील जागा सेवासदनसाठी मोफत दिल्याचा शिवाय स्वत:चे ५००० रु. इमारत फंडाला देणगी दिल्याचा उल्लेख आहे. लेडी वेलिंग्डन तेथे आल्या असताना देवधर यांनी ‘मिसेस रमाबाई हॅज बीन द गायडिंग स्पिरिट अँड गार्डियन एंजल ऑफ सेवासदन’ असे त्यांना सांगितले.


१९०४ मध्ये मुंबई इलाख्याच्या सरकारकडून येरवडा येथील तुरुंगाच्या बिनसरकारी मानद अधीक्षक होण्याचे आपण मान्य कराल का? असे रमाबाईंना पत्राने विचारण्यात आले. रमाबाईंनी ते मान्य केले. रमाबाई स्त्री कैद्यांना वारंवार भेटत. त्यांची आस्थेने चौकशी करीत. एका भेटीत त्यांनी संत तुकाराम व नामदेव यांच्या अभंगांपैकी एक-दोन सोपे अभंग म्हणून त्याचा अर्थ त्यांना समजावून सांगितला. त्यांच्या जवळ असलेल्या मुलाबाळांची चौकशी करत व त्यांच्या अडचणी सोडविण्यास मदत करीत असत. १९०७ मध्ये रमाबाईंनी येरवडय़ाच्या सुपरिंटेंडंटला पत्र लिहून स्त्री कैद्यांबरोबर राहू दिलेल्या बालकांना विशेषत: सणाच्या दिवशी फळे व पक्वान्ने आणून देण्याची इच्छा व्यक्त केली. तेव्हा सुपरिंटेंडंटने आमची हरकत नाही असे कळवले.


तेव्हापासून रमाबाई पाडवा, दसरा, दिवाळी वगैरे प्रमुख सणांच्या वेळी आपल्या घरी स्वत:च्या देखरेखीखाली लाडू, करंज्या वगैरे पक्वान्ने करवून घेऊन ती त्या कारागृहातील बालकांसाठी पाठवू लागल्या. हा त्यांचा नियम आयुष्याच्या अखेर पर्यंत चालू होता. १९१३-१४ मध्ये परवानगीने दर शुक्रवारी सकाळी ८।। ते ९।। स्त्री कैद्यांना शिकवण्यास जात. सुरुवात ३-४ स्त्रियांनी झाली. तीन-चार महिन्यांत रमाबाईंचा शिष्यवर्ग वाचू व लिहू लागला. 


मुंबई इलाख्यात मुलींसाठी पहिले हायस्कूल स्थापन करण्याचा मान मुंबई शहरास न मिळता पुण्यास १८८४ मध्ये हुजूरपागेच्या स्थापनेमुळे मिळाला. १८८४ मध्ये दसऱ्याच्या मुहूर्तावर पुण्यात ‘हायस्कूल फॉर नेटिव्ह गर्ल्स’ या नावाने मुलींचे हुजूरपागा हायस्कूल चालू झाले. मुंबईत यापूर्वी अलेक्झांड्रा गर्ल्स हायस्कूल सुरू झाले होते. पण त्यात मुख्यत: धनिक पारशी, ख्रिश्चन व हिंदू मुली शिकत. १८८५ नंतर स्त्री शिक्षणेच्छू लोकांच्या मनात देणगीचा रूपाने फंड जमवून हिंदू मुलींसाठी हायस्कूल स्थापन करण्याचा विचार मूळ धरू लागला. न्या. रानडे यांचे स्नेही सॉलिसिटर नानू कोठारे. यांचे पक्षकार चंदारामजी ठक्कर हे एक होते. 


चंदारामजींचे निधन १८९५ मध्ये झाले. त्यांच्या लोहानी ट्रस्टमधील साडेतीन लाख रुपये शिल्लक राहिले. त्यामधून नानू कोठारे यांनी पुढाकार घेऊन २ एप्रिल १९०८ हा पाडव्याचा दिवस हायस्कूलकरिता निश्चित करून रमाबाईंना ‘चंदारामजी फीमेल हायस्कूल’च्या उद्घाटन समारंभास अध्यक्षपद स्वीकारण्याची विनंती केली. उद्घाटनाला मुंबईत बरेच प्रतिष्ठित सुसंस्कृत हिंदू, पारशी, मुसलमान, ख्रिश्चन नागरिक उपस्थित होते. व्यवस्थापक मंडळींनी शाळेचा जो अभ्यासक्रम ठरवला त्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले व भाषणात स्त्री शिक्षणाचे महत्त्व समजावून सांगितले.


१९१८ मध्ये मुंबई कायदा कौन्सिलने मुंबई इलाख्यातील म्युनिसिपालिटय़ांना आपल्या हद्दीतील भागात पाच ते अकरा वर्षे वयाच्या मुलांना प्राथमिक शिक्षण मोफत व सक्तीचे करण्याचा अधिकार प्राप्त झाला व त्याकरिता नवीन कर बसवण्यास संमती दिली. पण मुलींच्या मोफत शिक्षणासंबंधी उल्लेख नव्हता. सक्तीचे शिक्षण मुला-मुलींना एकाच वेळी लागू करावे असे मत असणाऱ्या सुधारक पक्षाच्या पंधरा दिवसांत पन्नास सभा झाल्या. त्यामध्ये धों. के. कर्वे यांचा अनाथ बालिकाश्रम, ना. दा.ठा. महिला विद्यापीठ या संस्थांनी सेवासदनच्या बरोबर भाग घेतला व त्यांत मुलांबरोबर मुलींनाही प्राथमिक शिक्षण मोफत व सक्तीचे झाले पाहिजे, असा ठराव पास झाला. त्याप्रमाणे म्युनिसिपालिटीकडे स्त्रियांचे डेप्युटेशन नेण्याचे ठरले. म्युनिसिपल कौन्सिलमध्ये हा प्रश्न १२ फेब्रुवारी १९२० रोजी चर्चेसाठी घेणार होते. 


सेवासदन पासून एक मिरवणूक निघाली. त्याचे नेतृत्व रमाबाईंनी केले. सभा होण्यापूर्वी रमाबाई रानडे यांच्या नेतृत्वाखाली स्त्रियांचे एक डेप्युटेशन म्यु. कौन्सिलचे अध्यक्ष आपटे यांना भेटले व त्यांच्यापुढे आपली मागणी ठेवली. रमाबाईंच्या आंदोलनास दि सेंट कोलंबो हायस्कूल, मंगलोर येथील स्त्री वर्गानी, मद्रास येथील प्रमुख स्त्रियांनी पत्र पाठवून आपला पाठिंबा व्यक्त केला होता. एवढेच नव्हे तर पंडित नेहरूंची आई स्वरूपराणी नेहरू यांनी त्यांच्या अध्यक्षते खालील अलाहाबाद येथील स्त्रियांच्या सभेत ही सभा सक्तीचे शिक्षण फक्त मुलांपुरते मर्यादित ठेवते व त्यांत मुलींना वगळण्यात येते, या योजनेचा निषेध करते असा ठराव पास करून तारेने रमाबाईंना कळवला. शेवटी पुणे म्युनिसिपालिटीने पत्रक काढले. मुलांप्रमाणे मुलींनाही प्राथमिक शिक्षण सक्तीचे व्हावे यामध्ये आता मतभेद नाही, असे पत्रक काढले. 


यानंतर मुंबई इलाख्यातील स्त्री-मताधिकाराच्या चळवळीच्या कामासाठी २० प्रमुख स्त्रियांची कमिटी नेमण्यात आली. त्यामध्ये रमाबाई रानडे या प्रमुख अधिकार पदावर होत्या. तिच्यातर्फे इंग्लंडमध्ये काम करणाऱ्या कमिटीपुढे साक्ष देण्यासाठी मिसेस एच. ए. टाटा आणि मिस टाटा यांना मुंबईहून २ ऑगस्ट १९१९ रोजी पाठवण्यात आले. मद्रास कायदे कौन्सिलात मिसेस कझिन्स यांनी पुढाकार घेऊन हा ठराव पास करून घेतला. तसेच बंगाल इलाख्यातदेखील स्त्री मताधिकाराचा ठराव पास झाला. मुंबई कायदे कौन्सिलात मात्र मताधिकाराची ही लढाई १९२१च्या मार्चपासून जुलै अखेपर्यंत उत्कट वृत्तीने लढली गेली. २५ जुलै १९२१ रोजी हरिलाल देसाई यांनी हे कौन्सिल सरकारला अशी शिफारस करते की विशिष्ट नियमामुळे मतदार यादीत नाव नोंदण्याविषयी स्त्रियांवर जी स्त्रीत्वमूलक अपात्रता (sex disqualification) ती स्त्रियांच्या बाबतीत रद्द करण्यात यावी.


मुंबई इलाख्यात जे आंदोलन झाले त्याचा आधारस्तंभ रमाबाई रानडे आहेत असे मिसेस कजिन्सनी नि:संदिग्धपणाने लिहिले आहे. रँग्लर परांजपे, जहांगीर पेटीट वगैरे निवडक पुढाऱ्यांना स्त्रियांना मताधिकार असावा असे वाटत होते. पण सर्वसाधारण विरोध होता. तीन दिवसांनंतर शेवटी ठरावाच्या बाजूने ५२ विरुद्ध २५ अशा मोठय़ा बहुमताने ठराव संमत झाला. कौन्सिलचे काम संपल्यानंतर प्रमुख सभासद रमाबाई रानडे यांना भेटून त्यांचे अभिनंदन करण्यासाठी गर्दीने त्यांच्या समोर आले.


१९१३ च्या जानेवारीमध्ये रमाबाईंना त्यांनी केलेल्या समाजसेवेबद्दल सरकारने कैसर-इ-हिंद हे पदक बहाल केले. परंतु ते घेण्यासाठी रमाबाई त्या समारंभास गेल्या नाहीत. मृत्यूच्या अगोदर काही दिवस त्या म्हणाल्या होत्या, जोपर्यंत काम करण्याची शक्ती आहे, तोपर्यंत जगण्यात अर्थ आहे. नाहीतर काय? जगात असून नसल्यासारखे घरात पडून राहावयाचे. 


रमाबाईंच्या सन्मानाप्रीत्यर्थ भारतीय टपाल खात्याने १५ ऑगस्ट १९६२ ला मा.रमाबाईंच्या जन्मशताब्दी वर्षात त्यांचे छायाचित्र असलेले पोस्टाचे तिकीट प्रकाशित केले. रमाबाई रानडे यांचा जीवनपट चित्रमय रूपात प्रदर्शित करणारी "उंच माझा झोका" ही मालिका २०१२ मध्ये झी मराठी ने प्रदर्शित केली होती.


रमाबाई रानडे यांचे २६ एप्रिल १९२४ रोजी निधन झाले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा