*क्रांतिकारक चंद्रशेखर आझाद*
********************************
स्वातंत्र्याचे महानवीर चंद्रशेखर आझाद यांचा
जन्म २३ जुलै १९०६ रोजीचा (मध्यप्रदेश)
२७ फेब्रुवारी १९३१ (अलाहाबाद) हा त्यांचा स्मृतीदिन आहे .
ते जन्मतःच आझाद होते आणि संपूर्ण जीवन सुद्धा आझाद म्हणून जगले आणि मृत्यूलाही भेटले ते आझाद म्हणूनच. देश तर आझाद झाला परंतु असे असंख्य आझाद मृत्यूच्या पारतंत्र्यात मात्र विलीन झाले.
आपल्या भारतावर सुमारे १५० वर्षे इंग्रजांचे राज्य होते. स्वराज्य मिळावे यासाठी अनेकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली आणि अनेकांनी अनेक विविध मार्ग अवलंबिले. अनेक स्वातंत्र्यवीर आपल्या भारतासाठी कसे लढले याचे धडे आपल्याला लहानपणापासूनच दिले जातात. त्यांच्याशी निगडित अनेक किस्से, गोष्टी आपण ऐकत असतो.
असाच एक स्वातंत्र्यवीर आपल्या भारतासाठी स्वतःचे प्राण त्यागून अजरामर झाला. व्यवस्थित भांग पाडलेले काळेभोर केस, हातावर घड्याळ, पिळदार आणि टोकेरी मिश्या आणि एका हाताने त्या मिश्याना पीळ देणारा फोटो आपण पाहिला कि आपल्या ओठांवर लगेच नाव येते आझाद ! चंद्रशेखर आझाद ! जहाल मतवादी आझाद हे आजही सर्वांना प्रेरणा देऊन जातात. आज याच आझादांच्या आझाद अशा आयुष्यावर हा लेख.
*कसे झाले तिवारी ते आझाद ?*
२३ जुलै १९०६ मध्ये, मध्य प्रदेश मधील भाबरा या गावात सीताराम तिवारी आणि जागरानी देवी तिवारी यांच्या पोटी मुलगा जन्माला आला, मुलाचे नाव ठेवले चंद्रशेखर. लहानपणापासूनच ते अभ्यासात हुशार आणि मल्लखांब सारख्या खेळांत प्रवीण होते. या छोट्याश्या गावात चंद्रशेखर यांना स्वतःचे अस्तित्व सापडत नव्हते. वयाच्या १३/१४ व्या वर्षी आपल्या गावात येणाऱ्या एका व्यापाऱ्यासोबत चंद्रशेखर आपला रस्ता बनवत निघाले मुंबई कडे. मुंबई मध्ये आले, काही काळ जहाजावर काम देखील केले, मग संस्कृत शिक्षणासाठी ते गेले बनारस येथे.
मुंबई, बनारस यांसारखी मोठी शहरे त्या काळी स्वातंत्र्य आंदोलनाची केंद्रे होती. याच काळात जालियनवाला बाग हत्याकांड झाल्यामुळे संपूर्ण देश दुःखाच्या गर्तेत होता. या आंदोलनांची माहिती सर्वांसारखीच चंद्रशेखर या १५ वर्षाच्या मुलापर्यंत सुद्धा येऊन पोहोचली. त्याने मात्र फक्त या बातम्या ऐकल्या नाहीत, त्याने या बातम्यांचा एक भाग होण्याचे ठरविले आणि या १५ वर्षाच्या मुलाने महात्मा गांधीजी यांनी सुरु केलेल्या असहकार चळवळीत स्वतःला झोकून दिले. त्यांच्या सोबत अनेक विद्यार्थ्यांनी या आंदोलनात भाग घेतला होता, पोलिसांनी अनेक मुलांना अटक केली आणि यात चंद्रशेखर यांना सुद्धा अटक केली गेली.
त्यांच्यावर कोर्टात खटला चालू झाला, याच खटल्यात त्यांना पेश करताच त्यांना नाव विचारण्यात आले, यावर ते म्हणाले, "मी चंद्रशेखर आझाद" आणि बस्स त्या दिवसापासून चंद्रशेखर तिवारी यांना सगळे चंद्रशेखर आझाद म्हणून ओळखू लागले.
*जहाल मतवादी प्रवास*
असहकार आंदोलनातील खटल्यामध्ये शिक्षा भोगून आझाद बाहेर पडले परंतु देशासाठी आता आक्रमक वृत्तीने आपल्याला पेटून उठले पाहिजे आणि इंग्रजांना जश्यास तसे उत्तर दिले पाहिजे या विचाराने आझाद स्वस्थ बसू शकत नव्हते. गांधीजींनी लोकांच्या हिंसक पद्धतींमुळे असहकार आंदोलन स्थगित केले आणि मग आझाद यांना आपला मार्ग बदलावासा वाटला. फक्त अहिंसेने क्रांती येणार नाही तर त्याला हिंसेची सुद्धा जोड हवी म्हणून चंद्रशेखर आझाद यांनी जहाल मतवाद्यांचा मार्ग स्वीकारला आणि आझाद यांनी खऱ्या अर्थाने भारताच्या आझादीकडे पाऊले टाकली.
या प्रवासात ते अनेकांना भेटले आणि यातूनच ते जोडले गेले हिंदुस्थान रिपब्लिकन असोसिएशन या क्रांतिकारी संघटनेसोबत. ते मनापासून या संघटनेचा भाग झाले आणि संघटनेसाठी प्रचार करीत असत. या संघटना चालवायच्या म्हणजे पैसे हवेत आणि पैसे मिळवण्यासाठी आझाद या संघटनेसोबत मिळून अनेक सरकारी मालमत्तेवर दरोडा टाकायचे. या इंग्रज सरकारने भारताला बरेच लुटले, आता वेळ होती आपण त्यांना लुटण्याची. या छोट्या मोठ्या चोऱ्या आणि लूटमार करून आझाद स्वस्थ नव्हते, त्यांच्या भक्कम शरीरयष्टी, बुद्धिमत्ता, पडेल ते काम करायची हिम्मत आणि निर्णयक्षमता या गुणांमुळे ते लवकरच संघटनेचा एक उत्तम, विश्वासू चेहरा आणि पुढारी बनले.
*काकोरी आणि बरंच काही :*
नियमित अभ्यास, कसरत, बंदुकीसारख्या शस्त्रांचा सराव यामुळे आझाद आता अतिशय तरबेज झाले होते. अशा छोट्या मोठ्या चोऱ्या करण्यापेक्षा आता एक मोठा झटका देणे त्यांच्या मनात आले. यातूनच त्यांना युक्ती सुचली काकोरी लूटमारीची. ९ ऑगस्ट १९२५ मध्ये काकोरी येथे इंग्रजांच्या खजिन्याची मालगाडी जात असताना अचानक त्या मालगाडीवर हल्ला करून मोठी धनसंपत्ती या क्रांतिकारकांनी गोळा केली.
या घटनेने इंग्रजांना चांगलेच हादरवून सोडले. त्यांनी आरोपींवर ताबडतोब खटले चालविले आणि या काळात आझाद आपला वेष बदलून अज्ञातवासात आपले कार्य करीत होते. या आरोपींमध्ये हिंदुस्थान रिपब्लिकन असोसिएशनचे अध्यक्ष बिस्मिल आणि त्यांच्यासोबत संघटनेचे अनेक महत्त्वाचे क्रांतिकारी सामील होते आणि या सर्वाना फाशीची शिक्षा सुनावली गेली.
संघटनेचा मुख्य आधार गेल्यावर संघटना विखुरली गेली. आझाद यांच्या खूप प्रयत्नांनंतरही काही झाले नाही. परंतु त्यांनी आपले प्रयत्न सोडले नाहीत. कालांतराने त्यांची ओळख भगत सिंग, सुखदेव आणि राजगुरू अशा क्रांतिकारकांशी झाली आणि मग आझाद यांना बळ आले. त्यांनी भगत सिंग, सुखदेव आणि अजून काही साथीदारांसोबत मिळून पुन्हा हिंदुस्थान रिपब्लिकन असोसिएशनची स्थापना करायचे ठरविले आणि अखेर सप्टेंबर १९२८ मध्ये त्यांनी हिंदुस्थान सोसिएलिस्ट रिपब्लिकन असोसिएशनची स्थापना केली. आता या संघटनेचे आझाद हे प्रमुख होते आणि या संघटनेमध्ये भगत सिंग आणि त्यांचे साथीदार अतिशय उल्लेखनीय कामगिरी बजावत होते.
या नंतर या संघटनेमार्फत बॉम्ब बनविणे, शस्त्रसाठा जमा करणे आणि अशी अनेक क्रांतिकारी कामे केली जात होती. अशातच भगत सिंग, सुखदेव आणि राजगुरू या तिघांना फाशीची शिक्षा सुनावली गेली. आता आझाद पुन्हा एकटे, तरीही हार न मानता त्यांनी या तिघांना सोडविण्याचे सर्व प्रयत्न केले परंतु ते निष्फळ ठरले. तरीही आपल्या क्रांतिकारी कामांमध्ये आझाद यांनी खंड पडू दिला नाही. आता तर ते अजून आक्रमक झाले आणि १९२९ मध्ये त्यांनी चक्क दिल्ली जवळील व्हाइसरॉयची अक्खी रेल्वे गाडी बॉम्ब लावून नेस्तनाबूत केली. आता मात्र इंग्रज अजूनच दचकले आणि आझाद यांना पकडण्याचे त्यांचे प्रयत्न अजून जोरात चालू झाले. अनेक प्रयत्नांनंतरही इंग्रज आझाद यांना पकडू शकत नव्हते.
*आहे आझाद नि राहीन आझाद :*
आपल्या संघटनेची सुटत चाललेली एकता, अनेक क्रांतीकारकांना खटल्यातून बाहेर काढण्याचे प्रयत्न, संघटनेसाठी धन गोळा करण्याचे विविध मार्ग या साऱ्यांचा विचार आझाद यांच्या मनात घर करून होता. त्यांचे अनेक साथीदार त्यांच्या विरुद्ध झाले होते याची देखील त्यांना खबर लागली नव्हती. २७ फेब्रुवारी १९३१ रोजी अलाहाबाद येथील अल्फ्रेड उद्यानात आझाद आपला साथी सुखदेव (फाशी गेलेला सुखदेव नाही) याच्यासोबत महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करीत होते आणि अनेक समस्यांवर मार्ग काढण्याचा प्रयत्न करीत होते.
अशातच त्यांचा एक जुना साथीदार वीरभद्र तिवारी याने त्या भागातील पोलीसांना बातमी दिली कि तुम्ही ज्या आझादला शोधून दमला आहात तोच आझाद सध्या अल्फ्रेड उद्यानात तुम्हाला सापडेल. ताबडतोब इंग्रज अधिकारी आपल्यासोबत मोठी फौज घेऊन उद्यानाकडे रवाना झाले. या प्रकारची खबर आझाद यांना मुळीच नव्हती.
अनेक विषयांवर चर्चा करत ते सुखदेव सोबत एका झाडाच्या सावलीत बसलेले होते. अचानक एकाएकी अक्खे उद्यान इंग्रजांनी काबीज केले आणि आझाद यांना शरण येण्याची आज्ञा करण्यात आली, केलेली आज्ञा धुडकावून आझाद यांनी आपली पिस्तूल काढली आणि ते इंग्रजांवर गोळीबार करू लागले. यातच इंग्रजाची गोळी थेट आझाद यांच्या मांडीवर येऊन लागली. यातनांना कुरवाळत बसायला वेळ नव्हता, सगळं कठीण होऊन बसलं होतं.
पिस्तूल छोटी, त्यात गोळ्या सुद्धा मोजक्या आणि समोर अक्खी पोलीस फौज आणि मागे अनेक जबाबदाऱ्या आणि या साऱ्याच्या पलीकडे माझ्या भारत मातेचे स्वातंत्र्य. काय करावे काही सुचेना. त्यांनी सुखदेव याला सुखरूप पळण्यास वाट दिली आणि पुढील देशकार्य चालू ठेवण्यास सांगितले.
इंग्रजांच्या गोळीबाराला आझाद उत्तर तर देत होते परंतु हळूहळू परिस्थिती बदलून गेली. आझाद एकटे आणि मोजक्या बंदुकीच्या गोळ्या. याउलट इंग्रजांची फौज आणि अमाप गोळ्या. कसा मुकाबला व्हावा ?
लढता लढता शेवटची एक गोळी शिल्लक राहिली. काय करावे ? इतरांसारखे इंग्रजांना शरण जावे आणि मग त्यांनी आज्ञा दिल्यावर फाशी जावे ? त्यांचा विजय होऊ द्यावा कि आझाद हे नाव सार्थ करावे ?
आझाद यांनी पहिल्यांदा जेव्हा पोलिसांच्या तावडीतून स्वतःची सुटका केली होती तेव्हाच ठरविले होते कि आझादला या पुढे कोणताही पोलीस हात लावू शकणार नाही आणि कोणतेही कारागृह बंद करून ठेऊ शकणार नाही आणि इंग्रजांच्या बेड्या कधीही माझ्या हाताची कार्यक्षमता जखडु शकणार नाहीत. आपला हा निश्चय टिकविणे त्यांना जास्त योग्य वाटले. त्यांनी मन घट्ट केले, शेवटची एक गोळी पिस्तुलात टाकली. भारतमातेला आठवून तीच पिस्तूल आपल्या कपाळाला लावून त्यांनी स्वतःला संपविले.
इंग्रज आले पण आझाद नाही तर आझादांचा मृतदेह त्यांच्या हाती आला. आझाद यांनी आपले नाव सार्थ केले. ते जन्मतःच आझाद होते आणि संपूर्ण जीवन सुद्धा आझाद म्हणून जगले आणि मृत्यूलाही भेटले ते आझाद म्हणूनच. देश तर आझाद झाला परंतु असे असंख्य आझाद मृत्यूच्या पारतंत्र्यात विलीन झाले.
ते आझाद होते नि आझाद म्हणूनच राहिले !
प्रणाम या भारतमातेच्या थोर पुत्राला !
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा