समाजकारण /राजकारण

मी विजय भुजबळ ग्रेट इंडियन या ब्लॉगवर सहर्ष स्वागत करत आहे WELCOME TO MY BLOG GREAT INDIAN THANKS FOR VISIT MY BLOG AND FOLLOW MY BLOG
FOLLOW MY BLOG


 

Translate /ब्लॉग वाचा जगातील कोणत्याही भाषेत

विशेष प्रश्नमंजुषा टेस्ट सोडवा सर्टिफिकेट मिळवा

बहिणाबाई चौधरी

बहिणाबाई चौधरी 

जन्म. २४ ऑगस्ट १८८० 

बहिणाबाईंना लिहिता येत नव्हते, त्यामुळे त्यांनी केलेल्या अनेक कविता कुणी लिहून न ठेवल्यामुळे काळाच्या ओघात नष्ट झाल्या. त्या निरक्षर होत्या; तथापि त्यांच्यापाशी जिवंत काव्यरचनेची निसर्गदत्त प्रतिभा होती. ज्यात त्यांचे सारे आयुष्य गेले, ते शेतकाम आणि घरकाम करता करता उत्स्फूर्तपणे त्या ओव्या रचून गात असत. सोपानदेव चौधरी आणि त्यांचे एक आप्त ह्यांनी जमेल तेव्हा त्या वेळोवेळी तेथल्या तेथे उतरून घेतल्या आणि जपल्या. लिहिता न येणाऱ्या बहिणाबाई अहिराणीत आपल्या  कविता रचत व त्यांचे पुत्र सोपानदेव चौधरी त्या कागदावर लिहून ठेवत. 

महाराष्ट्रातील कवी सोपानदेव चौधरी हे बहिणाबाईंचे पुत्र. बहिणाबाईंच्या मृत्यूनंतर बहिणाबाईंचे सुपुत्र कविवर्य सोपानदेव व त्यांचे मावसबंधू श्री. पितांबर चौधरी यांनी लिहून घेतलेली बहिणाबाईंची गाणी हस्तलिखित स्वरूपात होती. आपल्या आईच्या मृत्यूनंतर तिच्या चीजवस्तू पाहताना हे हस्तलिखित सोपानदेवांच्या हाती लागले. ह्या कविता सोपानदेवांनी आचार्य अत्रे ह्यांना दाखविल्या. अत्रे उद्‌गारले, "अहो हे तर बावनकशी सोनं आहे! हे महाराष्ट्रापासून लपवून ठेवणं हा गुन्हा आहे!’,आणि अत्र्यांनी त्या कविता प्रकाशित करण्यात पुढाकार घेतला. अत्रे ह्यांच्या विस्तृत प्रस्तावनेसह बहिणाबाईंची गाणी १९५२ मध्ये प्रकाशित झाली आणि ‘धरत्रीच्या आरशामधी सरग’ (स्वर्ग) पाहणाऱ्या ह्या कवयित्रीचा महाराष्ट्रास परिचय झाला. ह्या काव्यसंग्रहात बहिणाबाईंच्या फक्त ३५ कविता आहेत; परंतु कवित्वाची कोणतीच जाणीव मनात न ठेवता, केवळ सहजधर्म म्हणून रचिलेली त्यांची बरीचशी कविता वेळीच लेखनिविष्ट न झाल्याने त्यांच्याबरोबरच नाहीशी झालेली आहे. बहिणाबाईंच्या कविता वऱ्हाडी-खानदेशीत, त्यांच्या मातृबोलीत, रचिलेल्या आहेत.त्यांच्या कवितांचे विषय माहेर, संसार; शेतीची साधने, कापणी, मळणी इ. कृषिजीवनातील विविध प्रसंग; अक्षय्य तृतीया, पोळा, पाडवा इ. सणसोहळे; काही परिचित व्यक्ती, असे आहेत. या साऱ्यांबद्दल त्यांच्या मनात विलक्षण आत्मीयता होती असे त्यांच्या काव्यातून दिसून येते. 

‘असा राजा शेतकरी, चालला रे आलवानी (अनवाणी) देखा त्याच्या पायाखाले, काटे गेले वाकीसनी.

तल्लख स्मरणशक्ती, सूक्ष्म निरीक्षण, उपजत विनोदबुद्धी, जीवनातील सुखदुःखांकडे समभावाने पाहू शकणारे शहाणपण आणि जगण्यातून कळलेले तत्त्वज्ञान ही त्यांच्या कवित्वाची वैशिष्ट्ये होत. ‘आला सास, गेला सास, जीवा तुझं रे तंतर, अरे जगनं-मरनं एका सासाचं अंतर!’ किंवा ‘लेकीच्या माहेरासाठी माय सासरी नांदते’ अशा किमान शब्दात अर्थाची कमाल गाठणारे शब्द, ‘अरे संसार संसार - जसा तवा चुल्यावर आधी हाताले चटके - तव्हा मीयते (मिळते) भाकर’ किंवा ‘देव कुठे देव कुठे - आभायाच्या आरपार देव कुठे देव कुठे - तुझ्या बुबुयामझार’. एखाद्या मोठ्या ग्रंथाचा विषय असणारे जीवनाचे तत्त्वज्ञान त्या साध्या, सोप्या, आणि कमी शब्दांत सहजपणे सांगून गेल्या आहेत.

बहिणाबाई चौधरी यांचे ३ डिसेंबर १९५१ रोजी निधन झाले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा