अनाथांची माय सिंधुताई सपकाळ
जन्म - १४ नोव्हेंबर, इ.स. १९४७
टोपणनाव - चिंधी
पती - श्रीहरी सपकाळ
वडील - अभिमन्यू साठे
पुरस्कार - डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार (२०१२), पद्मश्री पुरस्कार (२०२१)
सिंधुताई सपकाळ या भारतीय सामाजिक कार्यकर्त्या होत्या. त्या विशेषतः भारतातील अनाथ मुलांचे संगोपन करण्याच्या कार्यासाठी ओळखल्या जातात. त्यांना २०२१ मध्ये सामाजिक कार्य श्रेणीत पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सिंधुताईंचा जन्म १४ नोव्हेंबर १९४८, वर्धा जिल्ह्यातील पिंप्री मेघे गावात आणि ब्रिटीश भारतातील बेरार येथील अभिमन्यू साठे या गुराख्याच्या घरी झाला. एक अवांछित मूल असल्याने, त्यांचे नाव चिंधी ("फाटलेल्या कापडाचा तुकडा") ठेवले.पण हीच चिंधी अनेक फाटक्या ठिगळांना जोडते याचा त्यावेळी कोणी विचार ही केला नसेल. अत्यंत गरिबी, कौटुंबिक जबाबदाऱ्या आणि लवकर लग्न यामुळे त्यांना चौथी इयत्ता उत्तीर्ण झाल्यानंतर शाळा सोडावी लागली.
सिंधुताई यांचे वयाच्या १२व्या वर्षी श्रीहरी सपकाळ यांच्याशी लग्न झाले, जे त्यांच्यापेक्षा २० वर्षांनी मोठे होते. लग्नानंतर त्या वर्ध्यातील सेलू येथील नवरगाव गावात गेल्या. हे लग्न फार काळ टिकले नाही आणि वयाच्या २० व्या वर्षी, त्यांना त्यांच्या मुलीसोबत नवऱ्याने सोडून दिले.
विवाहा नंतर घरी प्रचंड सासुरवास होता. कुटुंबात शैक्षणिक वातावरण नाही. जंगलात लाकूडफाटा, शेण गोळा करताना सापडलेले कागदाचे तुकडे माई घरी आणायच्या आणि उंदराच्या बिळांत लपवून ठेवायच्या. क्वचित घरी एकट्या असल्या तर त्या अभ्यास करण्याचा प्रयत्न करीत.
अठराव्या वर्षापर्यंत माईंची तीन बाळंतपणे झाली. त्या चौथ्या वेळी गर्भवती असताना त्यांनी त्यांच्या आयुष्यातला पहिला संघर्ष केला. तेव्हा गुरे वळणे हाच व्यवसाय असायचा. गुरेही शेकड्यांनी असायची. त्यांचे शेण काढता काढता बायकांचे कंबरडे मोडायचे. शेण काढून बाया अर्धमेल्या व्हायच्या. पण त्याबद्दल कोणतीही मजुरी मिळायची नाही. रस्त्यावर मुरूम फोडणाऱ्यांना मजुरी, पण शेण काढणाऱ्यांना नाही. या शेणाचा लिलाव फॉरेस्टवाले करायचे. इथे सिंधुताईंनी बंड पुकारले आणि लढा सुरू केला. त्यामुळे या लिलावात ज्यांना हप्ता मिळायचा त्यांच्या हप्त्यावर गदा आली. हा लढा जिंकल्या पण त्यांना या लढ्याची जबर किंमत चुकवावी लागली. बाईंच्या या धैर्याने गावातील जमीनदार, दमडाजी असतकर दुखावला गेला होता. जंगलखात्याकडून येणारी मिळकत बंद झाली.
अनाथ मुलांना सांभाळून त्यांच्या जीवनाला दिशा देण्यासाठी सिंधुताई यांनी ममता बाल सदन संस्थेची स्थापना केली. १९९४ साली पुण्याजवळ पुरंदर तालुक्यात कुंभारवळण या गावात ही संस्था सुरू झाली. आपली कन्या ममता हिला दगडूशेठ हलवाई संस्थेच्या माध्यमातून शिक्षणासाठी सेवासदन येथे दाखल केले आणि त्यांनी इतर अनाथ आणि बेवारस मुलांना आधार दिला. येथे लहान मुलांना सर्व शिक्षण दिले जाते. त्यांच्या भोजन, कपडे अन्य सुविधा यांची उपलब्धता संस्थेकडून केली जाते. शिक्षण पूर्ण झाल्यावर येथील मुले आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होतील यासाठीही त्यांना मार्गदर्शन दिले जाते. आर्थिक दृष्ट्या स्वयंपूर्ण झाल्यावर या युवक युवतींना योग्य जोडीदार शोधून देणे आणि त्यांच्या विवाहाचे आयोजन करणे हे कार्यही संस्थेकडूनच केले जाते. अशी सुमारे १०५० मुले या संस्थेत राहिलेली आहेत.
सिंधुताई यांनी आपल्या संस्थेच्या प्रचारासाठी आणि कार्यासाठी निधी संकलन करण्याच्या हेतूने प्रदेश दौरे केले आहेत आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर त्यांनी आपल्या बोलण्याने आणि काव्याने समाजाला प्रभावित केले आहे. परदेशी अनुदान मिळणे सोपे जावे या हेतूने त्यांनी मदर ग्लोबल फाउंडेशन संस्थेची स्थापना केली आहे.
सिंधुताईंना सुमारे ७५० राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत. त्यांतले काही :-
पद्मश्री पुरस्कार (२०२१)
महाराष्ट्र शासनाचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार (२०१२)
पुण्याच्या अभियांत्रिकी कॉलेजचा 'कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुरस्कार' (२०१२)
महाराष्ट्र शासनाचा 'अहिल्याबाई होळकर पुरस्कार' (२०१०)
मूर्तिमंत आईसाठीचा राष्ट्रीय पुरस्कार (२०१३)
आयटी प्रॉफिट ऑर्गनायझेशनचा दत्तक माता पुरस्कार (१९९६)
सोलापूरचा डॉ. निर्मलकुमार फडकुले स्मृती पुरस्कार
राजाई पुरस्कार
शिवलीला महिला गौरव पुरस्कार.
श्रीरामपूर-अहमदगर जिल्हा येथील सुनीता कलानिकेतन न्यासातर्फे कै सुनीता त्र्यंबक कुलकर्णी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दिला जाणारा 'सामाजिक सहयोगी पुरस्कार' (१९९२)
सीएनएन-आयबीएन आणि रिलायन्स फाउंडेशनने दिलेला 'रिअल हीरो पुरस्कार' (२०१२).
२००८ - दैनिक लोकसत्ताचा 'सह्याद्रीची हिरकणी पुरस्कार'.
प्राचार्य शिवाजीराव भोसले स्मृती पुरस्कार (२०१५)
डॉ. राम मनोहर त्रिपाठी पुरस्कार (२०१७)
पुणे विद्यापीठाचा 'जीवन गौरव पुरस्कार सिंधुताईंच्या जीवनावर आधारलेला मी सिंधुताई सपकाळ हा मराठी चित्रपट प्रदर्शित झाला आहे. त्यात तेजस्विनी पंडित यांनी सिंधुताईंची भूमिका साकारली आहे.
दिनांक ४ जानेवारी २०२२ रोजी पुण्यातील गॅलक्झी हॉस्पिटलमध्ये ह्रदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले. मृत्यूच्या एक महिन्यापूर्वी त्यांचे हर्नियाचे ऑपरेशन झाले होते. त्यांना महानुभाव पंथाचा अनुग्रह होता. महानुभाव पंथाच्या नियमाप्रमाणे त्यांना भुमीडाग देण्यात आला.
मृत्यू - ४ जानेवारी, २०२२ ( पुणे, महाराष्ट्र
विनम्र अभिवादन 🙏🙏🙏
Very nice article
उत्तर द्याहटवा