विशेष प्रश्नमंजुषा टेस्ट सोडवा सर्टिफिकेट मिळवा

समाजकारण /राजकारण

मी विजय भुजबळ ग्रेट इंडियन या ब्लॉगवर सहर्ष स्वागत करत आहे या ब्लॉग वरती आपणास भारत देशातील महान व्यक्तींची माहिती उपलब्ध होणार आहे. देशासाठी लढणारे क्रांतिकारक जवान, सैनिक, खेळाडू, समाजसेवक, शिक्षण तज्ञ, वैज्ञानिक , लेखक, राजकारण, अशा क्षेत्रांमध्ये महत्त्वपूर्ण महान व्यक्तींची ओळख कार्य , याची माहिती उपलब्ध होणार आहे.WELCOME TO MY BLOG GREAT INDIAN THANKS FOR VISIT MY BLOG AND FOLLOW MY BLOG
FOLLOW MY BLOG


 

Translate /ब्लॉग वाचा जगातील कोणत्याही भाषेत

Breaking

भारतीय खगोलशास्त्रज्ञ आणि गणितज्ञ आर्यभट्ट


 थोर भारतीय खगोलशास्त्रज्ञ आणि गणितज्ञ आर्यभट्ट 
जन्म.१२ जून ४७६  
हे भारताचे एक महान खगोलशास्त्रज्ञ, गणितज्ञ व भारतीय खगोलशास्त्राचे प्रणेते होते. त्यांनी वयाच्या अवघ्या २१व्या वर्षीच आर्यभट्टीय हा ग्रंथ लिहिला. आर्यभट्ट यांचे बालपण व उर्वरित आयुष्यकाळ पाटलीपुत्र ह्याच नगरीत गेले. खगोलशास्त्रज्ञ म्हणून आर्यभटाचे कर्तृत्व असामान्य आहे. आज उपलब्ध असलेल्या भारतीय खगोलशास्त्रीयग्रंथांत पहिल्या आर्यभटाच्या 'आर्यभटीय' किंवा 'आर्यसिद्धान्त' ह्या ग्रंथाहून दुसरा प्राचीन ग्रंथ नाही. 'आर्यभटीय' हे नाव त्याला आर्यभटानेच दिले आहे. आर्यभटाचे शिष्य वराहमिहीर, लल्ल वगैरे त्यास 'आर्यसिद्धांत' म्हणून संबोधायचे.
'आर्यभटीय' ग्रंथात 'दशगीतिका' व 'आर्याष्टशत' असे दोन भाग आहेत. हे दोन भाग निरनिराळे ग्रंथ आहेत असे काही तज्ज्ञांचे मत आहे. परंतु हे दोन्ही भाग एकमेकांवर अवलंबून असल्यामुळे दोन्ही मिळून एकच सिद्धान्त मानणे सयुक्तिक होय. त्याचे चार पाद असून त्यात अवघे एकशे एकवीस श्लोक आहेत.
दशगीतिका भागात तेरा श्लोक असून त्यातील तीन प्रार्थनापर आहेत. उर्वरित दहा श्लोकांत ग्रहभगणासंबंधीचे विवेचन आहे. (भगण म्हणजे ग्रहांची नक्षत्रमंडळातून एक पूर्ण प्रदक्षिणा) ह्या ग्रंथाचे चार पाद असे : १) गीतिका पाद, २) गणितपाद, ३) कालक्रियापाद, ४) गोलपाद.
गीतिकापादात अक्षरांच्या आधारे संक्षेपात संख्या लिहिण्याची स्वनिर्मित पद्धती अवलंबलेली आहे. खगोलशास्त्र किंवा गणित श्लोकबद्ध लिहावयाचे असेल तर ही गोष्ट आवश्यक असते. गणितपादात अंकगणित, बीजगणित, रेखागणित ह्यांचे सूत्ररूप नियम अवघ्या तेहतीस श्लोकात समाविष्ट केलेले आहेत. संख्यालेखन, बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, वर्ग, घन, वर्गमूळ, घनमूळ, त्रिकोण, चौकोन, वर्तुळ ह्याचे विवेचन त्यात असून त्रिभुज, वृत्त व अन्य क्षेत्रे ह्यांचे क्षेत्रफळ, घनफळ, भुज ज्या साधन व त्या संबंधीचा विचार, गणितश्रेणी, वर्गश्रेणी, त्रैराशिक पद्धती, बीजगणित पद्धती, विविध कुट्टके असे अनेक विषय आहेत. कालक्रियापादात कालगणना, युगे, कालविभाजन, ग्रहांची मध्यम व स्पष्ट गती वगैरेंचा समावेश आहे.
आर्यभटाने 'आर्यभटीय' ग्रंथाची रचना वयाच्या अवघ्या तेविसाव्या वर्षी केली. यावरून त्याच्या कुशल बुद्धिमत्तेची व प्रतिभेची कल्पना येऊ शकेल. आर्यभटीय ग्रंथ संक्षिप्त असला तरी त्याची रचनापद्धती अत्यंत सुसंबद्ध व शास्त्रीय असून त्याची भाषा अत्यंत सुस्पष्ट व अचूक आहे. आर्यभटाचे सिद्धांत प्रत्यक्षात अनुभवास येतात काय? ह्या प्रश्नाचे उत्तर होय असेच द्यावे लागते. दृक्‌प्रत्ययावरून देखील आर्यभटाची योग्यता फार मोठी आहे, हे पटते. आर्यभटानंतरच्या खगोलविदांनी त्यांच्या ग्रंथरचनेतील भाग आपल्या विवेचनासाठी घेतला. अल्बेरुणीने अरबी भाषेत हे ज्ञान या ग्रंथावरूनच नेले. डॉ. केर्न ह्यांनी १८७५ मध्ये हॉलंड देशात लेडेन येथे ह्या सिद्धातावर टीकाग्रंथ लिहिला. भारतात सूर्ययज्वनाने लिहिलेली टीका विशेष प्रसिद्ध आहे. बृहत्संहिता टीकेत उत्पलाने 'आर्यभटीय' ग्रंथातील अवतरणे घेतलेली आहेत.🙏🙏🙏

पु.ल.देशपांडे

महाराष्ट्राचे लाडके व्यक्तीमत्त्व पु.ल.देशपांडे 
जन्म. ८ नोव्हेंबर १९१९ गावदेवी मुंबई येथे.
महाराष्ट्रातल्या प्रत्येक मराठी मनाजवळचं व्यक्तिमत्त्व म्हणजे पु.ल.देशपांडे. सर्वसामान्य मराठी माणसाचं प्रेम, आपुलकी, आदर, त्यांच्याबद्दलचा अभिमान. त्यांच्याबद्दल लिहायला शब्द अपुरे पडतील. केवळ लेखक नव्हे तर बहुआयामी असणारं असं व्यक्तिमत्त्व. निबंध, समीक्षण, नाटक, प्रहसन, एकांकिका, अनुवाद, पटकथा, व्यक्तिचित्रण, चिंतनात्मक लेखन अशा अनेक लेखनप्रकारात त्यांच्या लेखणीने हुकूमत गाजवली. साहित्य, संगीत, नाटक, वक्तृत्व, अभिनय. कलेच्या ज्या ज्या प्रांतात पु.ल. वावरले त्या त्या प्रांताचे ते अनभिषिक्त सम्राट झाले. अभिनय, एकपात्री अभिनय, हार्मोनियम (संवादिनी) वादन, कथाकथन, स्वत:च्या लेखनाचे सादरीकरण, अभिवाचन, नाट्य व पटकथा लेखन, दिग्दर्शन, काव्यवाचन. या प्रत्येक क्षेत्रात पुलंनी अतिशय उच्च दर्जाचे यश प्राप्त केले, अफाट लोकप्रियता मिळवली, आपला श्रेष्ठ दर्जा सिद्ध केला. चार्ली चॅप्लीन आणि रवींद्रनाथ टागोर या दोन व्यक्तिमत्त्वांचा प्रभाव पु. ल. देशपांडे यांच्यावर होता. त्यांना ‘महाराष्ट्राचे वुडहाऊस’ म्हणत असत. 'पु लं'चे शालेय शिक्षण पार्लेच्या टिळक विद्यालयात झाले. व पुढील शिक्षण फर्ग्युसन महाविद्यालयात आणि विलिंग्डन महाविद्यालयात झाले. भास्कर संगीतालय येथील दत्तोपंत राजोपाध्याय यांच्याकडून त्यांनी हार्मोनियमचे (पेटी) धडे घेतले. ४० च्या दशकात साहित्यक्षेत्रात पदार्पण करण्यापूर्वी त्यांनी शाळेमध्ये शिक्षक या नात्यानेही काही काळ काम केले. वयाच्या १६ व्या वर्षी ‘आजोबा हरले’ या प्रहसनापासून पु. लं ची लेखनयात्रा चालू झाली. पुढे पूर्वरंग, अपूर्वाईतून त्यांनी प्रवास घडवला, कधी व्यक्ती आणि वल्लीतून अनेकांची भेट घालून दिली, कधी मर्ढेकर-आरती प्रभू-बोरकरांच्या कविता प्रभावी काव्यवाचनातून रसिकांपर्यंत समर्थपणे पोहोचवल्या, बटाट्याच्या चाळीचा फेंरफटका घडवला. असे हे  पु.ल. रसिकांच्या मनात घर करून राहिले. पु. ल. नी एकूण १४ एकांकिका लिहिल्या. ती फुलराणी, तुज आहे तुजपाशी, सुंदर मी होणार अशी उत्तमोत्तम नाटकं लिहिली. नाट्यदिग्दर्शन, अभिनय या क्षेत्रांतही आपला ठसा उमटवला. ‘अंमलदार’ हे  पु. लं. नी रूपांतरित केलेलं पहिलं नाटक. अनुवाद किंवा रूपांतर हा पु. लं. च्या विविध पैलूंमधला आणखी एक पैलू. इतर भाषिक नाटकांचं रूपांतर करताना त्याचं भारतीयीकरण, मराठीकरण मोठ्या कौशल्यानं पु. लं. नी केलं. १९४७ साली ‘कुबेर’ या चित्रपटातून पु. लं. चं पहिलं दर्शन झालं. संवादलेखक, दिग्दर्शक, पटकथाकार, गायक, नायक, गीतकार, संगीतकार अशा अनेक भूमिकांमधून चित्रपटक्षेत्रात पु. लं. वावरले. त्यांचा गुळाचा गणपती हा चित्रपट ‘सबकुछ पु.ल.’  म्हणूनच गाजला. ही त्यांची कारकीर्द १९९३ च्या ‘एक होता विदूषक’ इथवर बहरली. त्यातले त्यांचे संवाद प्रत्येकाला भावले, अभिजाततेचा अनुभव देऊन गेले. सादरीकरणाचं विलक्षण व हमखास यशस्वी ठरणारं कर्तृत्व पु. लं. कडे होतं. त्यांचे हावभाव, शब्दफेक, देहबोली, आवाजावरचं नियंत्रण सगळंच विलक्षण आणि लक्ष वेधून घेणारं. बटाट्याची चाळ, वाऱ्यावरची वरात, असा मी असा मी या प्रयोगांतून पु. लं. मधले ‘परफॉर्मर’ भेटतात. लेखन असो, वादन असो, गायन असो, नाटक किंवा वक्तृत्व सगळीकडे पु. लं. चं सादरीकरण थक्क करतं. राजकारण हा पु. लं. चा प्रांत कधीच नव्हता. पण १९७५ च्या आणीबाणीच्या काळात त्यांच्या वक्तृत्वाला व विनोदाला उपहासाची धार आली. त्या काळात जयप्रकाश नारायणांच्या ‘प्रीझन डायरी’ चा त्यांनी मराठी अनुवाद करून लोकांपुढे साकार केला. आणीबाणीनंतरच्या निवडणुकीत जनता पक्षासाठी पु. लं. नी अनेक भाषणं केली. राजकारणात त्या काळापुरता पु. लं. मधला कार्यकर्ता आणीबाणीविरुद्ध लढला. १९४७ ते १९५४ या काळात ते चित्रपटात रमले. ’वंदे मातरम्‌‘, ’दूधभात‘ आणि ’गुळाच्या गणपती‘त ते त्यांच्या अष्टपैलू कामगिरीने प्रसिद्धीस आले. म्हणजे चित्रपटाचे कथा, पटकथा, काव्य, संगीत, भूमिका आणि दिग्दर्शन सर्वच पुलंचे असे. १९४७ सालच्या मो.ग.रांगणेकरांच्या ’कुबेर‘ या चित्रपटाला संगीत देऊन पु.ल.देशपांडे संगीत दिग्दर्शक झाले. चित्रपटातील गाणी त्यांनी म्हटली होती. आता ते पार्श्वगायकही झाले होते. वंदे मातरम्‌ मध्ये पुल व त्यांच्या पत्नी सुनीताबाई यांच्या प्रमुख भूमिका होत्या. पु.ल. गायक असलेले नायक होते. त्या भूमिकेमुळे पु.ल. चित्रपट‌ अभिनेते झाले. पु.ल.देशपांडे यांचा ’देवबाप्पा’ चित्रपटसृष्टीत अविस्मरणीय ठरला. ’नाच रे मोरा’ हे अवीट गोडीचे गाणे अजूनही मुलांचे आवडते गाणे आहे. ’पुढचं पाऊल‘ या चित्रपटात त्यांनी ’कृष्णा महारा‘ची भूमिका केली, आणि ते अभिनयसंपन्न  नट म्हणून प्रसिद्धीस आले. पु. लं. च्या साहित्यातून त्यांची अचाट निरीक्षणशक्ती, अनलंकृत प्रवाही संवादात्मक भाषाशैली, मराठी व संस्कृतवरील प्रभुत्व, संदर्भ श्रीमंती, भाषेतली लवचीकता, नावीन्य, भावस्पर्शी लिखाण आणि सर्वांत महत्त्वाचं म्हणजे निखळ, निर्व्याज विनोद, कोणालाही न बोचणारा, दुखणारा विनोद या सगळ्या गोष्टी प्रामुख्यानं असत. मराठी साहित्य व संगीतातील उत्तुंग योगदानाव्यतिरिक्त पु.लं.चे आकाशवाणी, दूरदर्शन, नाट्य व चित्रपट क्षेत्रातील कार्य लक्षणीय होते. दूरदर्शनच्या पहिल्यावाहिल्या प्रसारणासाठी पंडित नेहरूंची दूरदर्शनसाठी मुलाखत घेणारे पुलं हे भारतीय दूरदर्शनचे पहिले मुलाखतकार होते. ते उत्तम संवादिनी वादक होते. सामाजिक बांधिलकी कृतीशीलतेने मानणाऱ्या पु. ल. व सुनीताबाई यांनी बाबा आमटे, अनिल अवचट, बाबा आढाव, हमीद दलवाई आदी अनेक कार्यकर्त्यांना, सामाजिक संस्थांना, त्यांच्या विविध उपक्रमांना कोणताही गाजावाजा न करता, सहजपणे व सढळतेने सहकार्य केले. पु.लं. ना पुण्यभूषण, पद्मश्री, पद्मभूषण या पुरस्कारांसह संगीत नाटक अकादमी पुरस्कार व साहित्य अकादमीचा पुरस्कार असे अनेक पुरस्कार मिळाले. पु.ल. देशपांडे यांचे १२ जून २००० रोजी निधन झाले.
🙏🙏

डॉ. रामचंद्र लक्ष्मण भालचंद्र


जागतिक दृष्टीदान दिवस.
अनेक अंध व्यक्तींचे जीवन प्रकाशमय करणारे डॉ. रामचंद्र लक्ष्मण भालचंद्र यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ साजरा होणारा दृष्टिदान दिवस आज साजरा होत आहे. डोळ्यात दाटलेल्या काळ्याकुट्ट अंधारातून उद्याच्या उज्ज्वल भविष्याची स्वप्ने पाहणाऱ्या व्यक्तींना नेत्रदानाच्या माध्यमातून हे जग सुंदर आहे़ याची प्रचिती देण्याची प्रेरणा देणारा हा दिवस आहे. शासकीय सेवेत नेत्रचिकिस्तक म्हणून अहोरात्र झटणाऱ्या डॉ. रामचंद्र यांचे नाव महाराष्ट्राच्या इतिहासात अजरामर आहे. त्यांचा जन्म उस्मानाबाद जिल्ह्यात दहा जून १९२४ रोजी झाला.कौटुंबिक परिस्थिती खडतर असतानाही जिद्द व चिकाटीच्या बळावर त्यांनी ऐंशी हजारांहून अधिक नेत्र शस्त्रक्रिया केल्या. अंधाचे आयुष्य प्रकाशमय करणाऱ्या या दीपस्तंभाची ज्योत दहा जूनला १९७९ रोजी मावळली. म्हणूनच या दिवसाचे औचित्य साधत हा दिवस नेत्रदान दिवस म्हणून साजरा होतो. राष्ट्रीय अंधत्व नियंत्रण कार्यक्रमांतर्गत नेत्रसंकलनासाठी सुमारे २५० हून अधिक नेत्रपेढ्या कार्यरत आहेत. राज्यातील मृत्यूचे प्रमाण व या पच्छात होणारे नेत्रदान यामध्ये मोठी तफावत आहे. नेत्रदान जनजागृती बाबत विविध शासकीय व अशासकीय संस्था कार्यरत आहेत. यांच्या मार्फत जनजागृती केली जाते. मात्र, याबाबतीत अजूनही म्हणावी तेवढी प्रगती झाली नसल्याचे मत या क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या तज्ज्ञांकडून व्यक्त होत आहे. अंधत्व निवारणासाठी अनेक जण पुढे येत आहेत़ यातील तांत्रिक अडचणी दूर करणे महत्त्वाचे आहे. ग्रामीण भागात नेत्रदानाविषयी प्रचार आणि प्रसार होणे महत्त्वाचे आहे. शहरातील खासगी व शासकीय रुग्णालयातून याबाबत योग्य प्रकारे जनजागृती झाल्यास ही चळवळ अधिक जोमात होऊ शकते.
आज जागतिक दृष्टीदानाच्या दिवशी नेत्रादानाचा संकल्प करुया, मृत्यूनंतरही हे सुंदर विश्वत पाहूया.

शाहीर निवृत्ती पवार


‘काठी न् घोंगडं घेऊद्या की रं…’ या गाण्यामधून जाती व्यवस्थेवर आघात करून ‘तुमच्यात सामील होऊ द्या’, अशी सामाजिक समतेची हाळी देणाऱ्या शाहीर  निवृत्ती पवार 
जन्म. ३० जून १९२३
सातारी झटका असलेला खणखणीत आवाज ही शाहीर निवृत्ती पवार यांची ओळख. ‘काठी न घोंगडं..., शिवाय ‘मैना गं मैना, तुझी हौस पुरवीन’, ‘या शेजारणीनं बरं नाय केलं’, ‘सूर्य उगवला.’..या गाण्यांनी मराठी रसिकांना भुरळ घातली. निवृत्ती पवार यांचा जन्म सातारा जिल्ह्यातील देगावचा. बालपण चिंचनेर निंब या ठिकाणी गेले. आई हौसाबाईच्या जात्यावरच्या ओव्या ऐकत शाहिरीचे बीज पवारांमध्ये रुजले. वयाच्या आठव्या वर्षांपासून ते पोवाडे सादर करू लागले. क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या सभेत ते गात. शाहिरांचे वडील, बाबुराव मुंबईत मिठाचा व्यवसाय करायचे. त्यांना मदत करायला शाहीर चौदाव्या वर्षी मुंबईत आले. सोळाव्या वर्षी बिर्ला हाऊसमध्ये त्यांनी गायलेल्या अभंगाला म. गांधींची कौतुकाची थाप मिळाली होती. १९४६ मध्ये गिरगावच्या ब्राह्मण सभेत बालगंधर्व, राम मराठे, अप्पा पेंडसे यांच्या उपस्थितीत ‘लोक सारे चला रे... राष्ट्रास हाक द्या रे’ हे समरगीत त्यांनी गायले आणि खुद्द बालगंधर्वांकडून वाहव्वा मिळवली. १९४२ ची चळवळ, संयुक्त महाराष्ट्राचा लढा, मराठी भाषेची चळवळ, गिरणी कामगारांचा लढा अशा अनेक विषयांवर त्यांनी वेळोवेळी कवने केली आणि गायली. शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर,  मल्हारराव होळकर यांच्यावरील त्यांचे वीररसपूर्ण पोवाडे अंगावर रोमांच उभे करत असत. ‘परतिसर परसन, लावली चरण’ हे वासुदेवगीत त्यांनी मुंबई दूरदर्शनच्या उद्घाटन प्रसंगी गायले होते. या गीतात बारकावे आणण्यासाठी ते माहुलीत जाऊन प्रत्यक्ष वासुदेवांबरोबर काही दिवस राहिले होते. ‘काठी न् घोंगडं’च हे गाणं शाहीरांनी गायले १९७५ मध्ये. पण त्याचे रेकॉर्डिंग एचएमव्हीने १९७७ साली केले. रेकॉर्डिंग दरम्यान काही केल्या गाण्यात मजा येईना. त्यावेळी एच.एम.व्ही.मध्ये असलेल्या श्रीनिवास खळे यांनी गाण्याच्या सुरुवातीला ‘ओ राम्या राम्या....हं’, अशी हाळी सुचवली. प्रत्येक कडव्याच्या अखेरीस ती वापरली आणि गाणे जिवंत झाले. सुमारे १२५ ते १५० लोकप्रिय गाणी त्यांच्या नावावर आहेत.अखिल भारतीय मराठी शाहिरी परिषदेचे उपाध्यक्षपदही त्यांनी भूषवले होते. शाहीर म्हणून कौतुक, महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जगतात जेवढे व्हायला हवे होते, तेवढे झाले नाही. मराठी मातीतील या अस्सल शाहिराची शासन दरबारी तसेच लोकदरबारी फार मोठी उपेक्षा झाली.१० जून २००२ मध्ये पसरणीत झालेल्या शाहिरीच्या शिबिरातच हृदयविकाराच्या झटक्याने निवृत्ती पवार यांचे निधन झाले. 
शाहीर निवृत्ती पवार यांची गाजलेली गाणी. 
पहाटच्या पाऱ्यामंदी माझा कोंबडा घाली साद., अगं मैना गं, मैना तुझी हौस पुरविन, तुला जोडीनं सातारा फिरवीन..., दादा टपोरं कणसा वरं, बघ आल्याती पाखरं.., मोटकरी दादा तुझी खिल्लारी बैलं बिगिनं मोटला जोडरं, तुझ्या हिरीचे गारगार पाणी पाटा पाटानं झुळझुळ सोडरं., काठी न्‌ घोंगडी घेऊन द्या की रं.

भारतीय स्वा्तंत्र्यलढयातील आदिवासी जननायक बिरसा मुंडा

भारतीय स्वा्तंत्र्यलढयातील आदिवासी जननायक बिरसा मुंडा 
जन्म. १५ नोव्हेंबर १८७५ रांची जवळील लिहतू या खेडेगावात.
बिरसा मुंडा यांनी लढवय्या न्याय हक्का साठी मोठा लढा उभारुन जे महान कार्य केले त्याचला तोड नाही. त्यामुळेच बिरसा मुंडा यांना आदिवासी जननायक हा किताब जनतेनेच बहाल केला.
बिरसा मुंडा यांचा जन्म सुगमा मुंडा आणि करमी हातू या दाम्पात्याच्या पोटी झाला.
त्यां चे वडील शेतमजूर होते. घरच्याम गरीबीमुळे त्यांना इंग्रजी माध्यपमाच्यार चाईबासा इंग्लिश मिशनरी स्कूंलमध्येी शिक्षणाची संधी मिळाली. इंग्रजी शिक्षणामुळे त्यां च्यापवर आधुनिक विचारांचा प्रभाव पडला. परंतु त्यांजना भारतीय संस्कृीतीचा मनस्वीज अभिमान होता व तो त्यांयनी निरंतर जपला. नैतिक आचरणाची शुद्धता व एकेश्वयरवादाचा त्यांनी पुरस्कार केला. ब्रिटिशांनी १८७८-७९ मध्ये प्रथमच वनाबद्दलचा कायदा केला व जंगल सरकारच्या मालकीचे झाले. ब्रिटिशांच्या राजवटीमध्ये आदिवासींच्या वनसंपत्तीवर असलेल्या अधिकारावर बाधा येण्यास सुरुवात झाली. आदिवासींना यामुळे बेघर व्हावे लागले. आदिवासींनी उदरनिर्वाहासाठी काही फळ, कंदमूळ, लाकुड्फाटे अथवा जनावरांसाठी चारा तोडल्यास त्यांना शिक्षा होऊ लागली आणि आदिवासीयांच्या अस्तित्वाचाच प्रश्न निर्माण झाला. हे रोखण्याकरीता आदिवासींनी न्या्यालयात याचिका दाखल केली व आदिवासींचे वनाधिकार पुनर्स्थापित करण्यायची मागणी केली. परंतु सरकारने ती फेटाळल्यामुळे आदिवासी समाजात प्रचंड रोष निर्माण झाला. १८९४ मध्येत बिहार राज्यात भीषण दुष्काकळ पडला होता. या दुष्काळामध्ये उपासमारी व महामारीने अनेक लोक मृत पावले. त्यावेळी त्यांनी गरीब आदिवासी समाजाची निःस्वार्थी अंतःकरणाने सेवा केली.
ब्रिटीश सरकारने आकारलेला अवाजवी शेतसारा माफ करुन दुष्काळावर मात करण्याकरिता त्यां नी जनआंदोलन केले. हे आंदोलन जहागीरदार व जमीनदार यांच्या शोषणाविरुद्ध होते. त्यायमुळे सामाजिक संतुलन बिघडून अशांतता निर्माण होत असल्यामुळे ब्रिटिशांनी जहागिरदार व जमीनदारांच्यान माध्यामातून बिरसा मुंडा यांना रोखण्याचा प्रयत्न केला. १८९५ मध्येा बिरसा मुंडा यांना दोन वर्षाचा करावास झाला त्यांना हजारीबाग तुरुंगात पाठविले. त्यामुळे सरकारविरुद्ध असंतोष वाढत गेला व ब्रि‍टिश सत्ता उखडून टाकण्यातचा संकल्पं त्यांनी केला. दोन वर्षाचा सश्रम कारावास उपभोगून परत आल्यानंतर आदिवासींच्या सामाजिक व आर्थिक प्रगतीसाठी राजकीय स्वातंत्र्याची आवश्यकता त्यांनी ओळखली. त्यासाठी संपूर्ण आदिवासी समाजाला संघटित करण्याससाठी प्रयत्नव करुन त्यां नी ब्रिटिश सरकारविरुद्ध स्वातंत्र्यलढा पुकारला. १८९७ नंतर बिरसा मुंडा यांच्या नेतृत्वाखाली आदिवासी समाजाने ब्रिटिश सरकारविरुद्ध अनेक लढाया करुन त्यांजना जेरीस आणले. त्यांवनी पारंपारिक शस्त्रां द्वारे म्हरणजे धनुष्यनबाण, भाले इत्या दींच्याय साहाय्याने डोंगराळ भागातून ब्रिटिशांवर हल्ले चढवले. ब्रिटिश सरकारकडे अत्याधुनिक शस्त्रास्त्रे होती. तरीदेखील १८९८ मध्ये तांगा नदीच्या काठावर बिरसा मुंडा यांनी ब्रिटिश सैन्याला नामोहरम केले. नंतर अतिरिक्त कुमक आल्यायमुळे ब्रिटिशांनी आदिवासी नेत्यांना रोखण्यात यश मिळवले. त्या प्रसंगी सुमारे ४०० आदिवासी शहीद झाले. यात बिरसा मुंडा यांचे योगदान मोठे होते. सन १९०० मध्येा बिरसा मुंडा डोमबाडी पहाडांमध्ये आदिवासी जनतेस मार्गदर्शन करीत असताना, ब्रिटिश सैन्यापने हल्ला चढविला व त्या ठिकाणी भीषण लढाई झाली. त्यांरना चक्रधरपूर येथे बंदी करुन रांची कारागृहात त्यांलची रवानगी करण्यांत आली. २० मे १९०० रोजी बिरसा मुंडाला एकांत कोठडीत एकटे ठेवले होते. बिरसा यांनी जेवण करणे नाकारले. त्याच दिवशी ते न्यायालयात बेशुध्द पडले. न्यायालयातून कारागृहात आणले. औषधोपचार सुरु केला. जेल अधिक्षक एंडरसनच्या औषधोपचाराने बिरसाच्या प्रकृतीत सुधारणा दिसत होती. ७ जून पर्यंत बिरसा ठिक होते. मात्र ९ जून १९०० रोजी बिरसा यांना रक्ताची उलटी झाली ते बेशुध्द पडले. त्यातच त्यांचे निधन झाले. मृत्युचे कारण ‘एशियाटिक कॉलरा’ हे शासनाने दिले परंतु एकही लक्षण एशियाटिक कॉलराशी जुळत नव्हते. नेपोलियनला आर्सेनिक देवून जसे ठार मारण्यात आले तिच लक्षणे बिरसा मुंडाच्या शरीरावर दिसत होती. मुंडाच्या प्रथेनुसार त्यांना दफन करावयास पाहिजे होते परंतु कारागृहातच दफन करून मृत्युचा पुरावा नष्ट केला.

ज्येष्ठ इतिहासकार ग.ह.खरे

 ज्येष्ठ इतिहासकार ग.ह.खरे 

जन्म. १० जानेवारी १९०१ पनवेल येथे.

इतिहासकार ग ह खरे हे वि का राजवाड़े ह्यांचे शिष्य, ज्यांनी अविवाहित राहून इतिहास संशोधनाला वाहून घेतले होते. ग ह खरे ह्यांचे माध्यमिक शिक्षण द्रविड हायस्कूल, वाई येथे झाले. महाविद्यालयात शिक्षण घेत असताना पहिल्याच वर्षी महात्मा गांधी ह्यांच्या असहकारितेच्या चळवळीत सहभागी होऊन त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण सोडले.कोयना धरणामुळे विस्थापित होणाऱ्यांचे पुनर्वसन व्हावे आणि त्यांना योग्य ती भरपाई मिळावी ह्यासाठी खरे ह्यांनी प्रचाराची मोहीम राबवली. परिणामी ह्यांच्यावर अशांतता माजवत असल्याचा आरोप ठेवण्यात आला आणि त्यांना १२ ऑगस्ट १९२२ पासून १ वर्ष बंदीवासाची शिक्षा देण्यात आली. सुटके नंतर इतिहास अभ्यास सुरु केला त्यांनी ब्राह्मी आणि उर्दू ह्या लिप्यांचेही अध्ययन करून त्या आत्मसात केले. शिलालेखांचे ठसे घेण्याचे काम ते स्वतःच अभ्यास करून शिकले. १९२९ पासून भारत इतिहास संशोधक मंडळ येथे नोकरी, पण नंतर निधना पर्यंत, चिटणीस, कार्याध्यक्ष, या नात्यानी संस्थेची भरीव सेवा त्यांनी केली. संस्कृत, हिंदी, फ़ारसी, कन्नड़, कोकणी भाषा त्यांना अवगत होत्या, नाणकशास्त्र, पुरतत्वविद्या, मूर्तिविज्ञान, पुरालेखविद्या ह्या विषयात त्यांचा व्यासंग होता, भारतात त्यांनी सर्वत्र संचार केला होता, लहानमोठी ५३ पुस्तक, ४०० पेक्षा अधिक संशोधनपर लेख प्रकाशित झालेत, ह्यांनी शिवचरित्रसाहित्य काही खंड व ऐतिहासिक फार्सी साहित्याचे ६ खंड संपादित केले. ग ह खरे सुमारे २०,००० पोथ्या, ५००० नाणी, १५० चित्रे आणि ३० ताम्रपट व शिलालेख संग्रह करून भारत इतिहास संशोधक मंडळाला दिले, हे सर्व करत असताना त्यांनी काही विद्यार्थ्यांना उत्तम मार्गदर्शन केले त्यात अग्रक्रमांक शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, श्री गजानन भास्कर मेहेंदळे, श्रीमती शोभना गोखले ह्यांचा आहे ज्यांनी पुढे स्वकर्तुत्व स्वतः चा वेगळा ठसा स्वतः च्या कामातुन दाखवला. संशोधकाचा मित्र, श्रीविठ्ठल आणि पंढरपूर, मूर्तिविज्ञान, महाराष्ट्राची चार दैवते, हे त्यांच्या ग्रंथ संपदेतील विशेष व महत्वाचे ग्रंथ. त्यांचा अनन्यसाधारण कामाकर्ता त्यांना मानसन्मान म्हणून त्यांना इंडियन हिस्टॉरिक कमिशनवर भारत इतिहास संशोधक मंडळाचे प्रतिनिधी म्हणून ३० वर्षे सहभाग होता, तसेच इंडियन हिस्टरी काँग्रेसच्या १९५१च्या अधिवेशनात मध्ययुगीन शाखेचे अध्यक्षपद त्यांनी भूषावले होते. न्युमिस्मॅटिक सोसायटी ऑफ इंडिया ह्या संस्थेच्या १९७४च्या अधिवेशनाचे अध्यक्षपदही त्यांच्या कड़े होते, पुणे विद्यापीठानी १९८४ साली सन्माननीय डी लिट् पदवी प्रदान केली. डॉ ग ह खरे यांचे ५ जून १९८५ रोजी निधन झाले.

दिग्दर्शक व रंगकर्मी योगेश सोमण

 रंगभूमीवरील आघाडीचे नाटककार- दिग्दर्शक व रंगकर्मी  योगेश सोमण 
जन्म. ४ जून १९६६ पुणे.
योगेश सोमण हे नाव महाराष्ट्रातील कला रसिकांना माहिती नसेल, असे विरळाच. हरहुन्नरी, प्रथितयश नाट्यदिग्दर्शक, लेखक आणि अभिनेते असलेले सोमण हे मागील २५ हून अधिक वर्षांपासून रंगभूमीची अविरत सेवा करत आहेत. यासोबतच एक प्रभावी वक्ता, नाट्यशिक्षक आणि विचारवंत म्हणूनही ते प्रसिद्ध आहेत. त्यांच्या रोखठोक भूमिका नेहमीच चर्चेचा विषय ठरतात. त्यामुळे राज्याच्याच नव्हे, तर देशाच्या कानाकोपऱ्यात या व्यक्तिमत्त्वाचं नाव गाजतंय. योगेश सोमण हे मागील २५ वर्षांपासून मराठी रंगभूमीवर कार्यरत आहेत. मराठी, हिंदी चित्रपट तसेच नाटकात त्यांनी अनेक महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. योगेश सोमण पुण्याचे. पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयातुन त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले. आज त्यांची प्रथितयश रंगकर्मी म्हणून ओळख असली तरी, नाटक हा त्यांचा लहानपणापासूनच पिंड नव्हता. लहानपणी त्यांना हॉकी आणि बॅडमिंटनची आवड होती. त्यात त्यांनी नैपुण्यही मिळवले होते आणि याच जोरावर त्यांनी राष्ट्रीय स्तरावरही बॅडमिंटन मध्ये आपल्या खेळाचा ठसा उमटवला. दहावीचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी प्रिंटिंग टेक्नॉलॉजीमध्ये डिप्लोमा पूर्ण केला. १९८७ साली डिप्लोमा झाल्यानंतर सुट्टीचा सदुपयोग व्हावा या उद्देशाने पुण्यात ‘व्यक्तिमत्त्व विकास आणि नाटक’ या कार्यशाळेत सहभाग घेतला. ही कार्यशाळा अवघ्या पंधरा दिवसांची होती. मात्र, या कार्यशाळेने त्यांचे अवघे जीवनच बदलून टाकले. या कार्यशाळेत त्यांची ओळख प्रशिक्षक प्रकाश पारखी यांच्याशी झाली. योगेश सोमणसारखा चुणचुणीत आणि प्रतिभावंत मुलगा त्यांच्या नजरेतून सुटला नाही. प्रकाश पारखी यांच्या मार्गदर्शनानंतर आपण नाटक लिहू शकतो, सर्वांना पटतील असे विषय आपल्याला सुचतात, ते बसवू शकतो याची जाणीव त्यांना झाली. या पंधरा दिवसांत त्यांची नाटकाशी तोंडओळख झाली. बॅडमिंटन आणि हॉकी खेळापेक्षा माझ्या भावभावनांना जास्त महत्त्व आहे, मला जे करायचंय, मांडायचंय, बोलायचंय ते मी इतर कोणत्याही क्षेत्रात मांडू शकत नाही. यासाठी एकमेव क्षेत्र म्हणजे, नाटक! याच ठिकाणी मी व्यक्त होऊ शकतो, याची जाणीव त्यांना झाली आणि यानंतर तन-मन-धनाने आयुष्यभर रंगभूमीच्या सेवेचा त्यांनी निश्चय केला. कार्यशाळा संपल्यानंतर यातील काही मित्रांसोबत त्यांनी ‘स्नेह’ ही संस्था सुरू केली. ‘स्नेह’मार्फत त्यांच्या ग्रुपने वेगवेगळ्या एकांकिका सादर करायला सुरुवात केली. या एकांकिका लिहिण्याची जबाबदारी त्यांच्यावरच असायची. या एकांकिका सादर केल्यानंतर जसजशी त्यांना बक्षिसे मिळत गेली, तसतसे आपण अधिक चांगलं लिहू शकतो, याची जाणीव त्यांना होत गेली आणि एक एक टप्पा पार करत त्यांच्या लेखणीला अनुभवाची धार मिळाली. प्रत्येक रंगकर्मीच्या कारकिर्दीत ‘पुरुषोत्तम करंडक’चा टप्पा येतोच आणि असाच टप्पा त्यांच्याही आयुष्यात आला. आता या स्पर्धेत उतरायचे तर महाविद्यालयीन विद्यार्थी असणं ही एक अट होतीच. म्हणून मग सोमण यांनी फर्ग्युसन महाविद्यालयात पदवीसाठी प्रवेश घेतला. नाट्य कार्यशाळेनंतरचा ‘पुरुषोत्तम’ हा त्यांच्या आयुष्यातील महत्त्वाचा टप्पा होता. या स्पर्धेत त्यांना लेखन, दिग्दर्शन, अभिनय या तीनही विभागात सर्वोत्कृष्ट पारितोषिकं मिळाली. ‘पुरुषोत्तम करंडक’ची १९९१ व १९९२ अशी लागोपाठ दोन वर्षं त्यांनी गाजवली. यानंतर नाट्यक्षेत्रात त्यांची एक वेगळी ओळख निर्माण झाली. ‘पुरुषोत्तम’च्या यशानंतर पंडित सत्यदेव दुबेंशी सोमण यांचा परिचय झाला. नाटक करण्याची ऊर्जा, अस्वस्थता दुबेंकडूनच मिळाल्याचे सोमण सांगतात. त्यांना ‘गुरू’ मानून त्यांनी नाटक, लेखन, नाटकाचे प्रयोग, एकपात्री प्रयोग करायला सुरुवात केली आणि त्यांच्या व्यावसायिक नाटकांना सुरुवात झाली ते ‘केस नंबर ९९,’ ‘रंग्या रंगिला रे,’ ‘आता कसं वाटतंय’ या नाटकांनी. यानंतर त्यांच्या ‘चाणक्य विश्वगुप्ता’ या व्यावसायिक नाटकाला राज्य नाट्य पुरस्कार मिळाला. या दरम्यानच्या काळात मराठी रंगभूमीवर स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या व्यक्तित्वाचा वेध घेणारा त्यांचा ‘मी विनायक दामोदर सावरकर’ हा एकपात्री प्रयोग खूप गाजला. यासोबतच ‘अनादि मी अवध्य मी,’ ‘एकदा पाहावं न करून’ या नाटकांनीदेखील मोठे यश मिळविले. त्यांनी लिहिलेला ‘माझा भिरभिरा’ हा चित्रपट ४८ व्या आय.एफ.एफ.आय व २० व्या आंतराष्ट्रीय बालचित्रपट महोत्सवात दाखविण्यात आला. सहजच नाटकाशी ओळख झालेल्या या रंगकर्मीने आजतागायत मागे वळून पाहिले नाही. आपल्या २७ वर्षांच्या कारकिर्दीत नाटक, मालिका, एकपात्री प्रयोग आणि चित्रपटक्षेत्रात त्यांनी भरीव योगदान दिले आहे. अलीकडच्या काळात त्यांनी, ‘उरी : द सर्जिकल स्ट्राईक,’ ‘आनंदी गोपाळ,’ ‘आसूड,’ ‘माणुसकी,’ ‘दृश्यम,’ ‘फास्टर फेणे’ अशा अनेक मराठी-हिंदी चित्रपटांतून महत्त्वाच्या भूमिका साकारल्या. एवढंच नाही तर शिक्षक आणि मार्गदर्शक म्हणून ते आजही अनेक ठिकाणी महत्त्वाच्या भूमिका पार पाडत आहेत. नुकतीच त्यांची मुंबई विद्यापीठाच्या ‘अकॅडमी ऑफ थिएटर आर्ट्स’ या नाट्यशास्त्र विभागाच्या संचालकपदी नेमणूक करण्यात आली. यासोबतच ते ‘हेमचंद्राचार्य नॉर्थ गुजराथ विद्यापीठा’च्याही नाट्यशास्त्र विभागाचे परीक्षक आणि पेपर सेटर म्हणून कार्यरत आहेत. शिक्षक व मार्गदर्शक म्हणून त्यांनी आतापर्यंत तब्बल पाच हजार विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले आहे. नव्याने नाट्यक्षेत्रात प्रवेश करु इच्छिणाऱ्या उमद्या कलाकारांसाठी त्यांची ‘स्नेह अकादमी’ नेहमीच खुली असते. त्यांच्या याच कामाची दखल घेऊन त्यांना अनेक राज्य व राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. भारतीय सांस्कृतिक संबंध परिषद, पु.ल.देशपांडे कला अकॅडमीच्या सल्लागार मंडळ आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे ते गव्हर्निंग कौन्सिल सदस्य आहेत. महाराष्ट्र सांस्कृतिक संचालनालयासाठी त्यांनी २००६ व २०१७ साली खानापूर व २०१८ साली कुडाळ या ठिकाणी निवासी कार्यशाळा घेतल्या होत्या. नुकतीच त्यांची मुंबई विद्यापीठाच्या ‘अकॅडमी ऑफ थिएटर आर्ट्स’ या नाट्यशास्त्र विभागाच्या संचालकपदी नेमणूक करण्यात आली. योगेश सोमण यांच्या पत्नी माधवी यांनी अनेक मराठी चित्रपट तसेच मालिकाही साकारल्या आहेत. पुण्यातील अभिनव विद्यालय तसेच गरवारे कॉलेज मधून माधवी यांनी आपले शिक्षण घेतले. राधा ही बावरी या झी वाहिनीच्या मालिकेत त्या झळकल्या. सिद्धांत, शाळा, पितृऋण, स्लॅमबुक सारख्या चित्रपटात त्यांनी काम केले आहे. पुण्यात गणेश फेस्टिवल मध्ये त्या दरवर्षी ढोलपथकात सहभागी होताना दिसतात. अस्सल मराठमोळ्या पोशाखात पुण्यात बरेच मराठी कलाकार ह्यात सहभागी होतात. योगेश आणि माधवी सोमण यांना ऋग्वेद नावाचा मुलगा आहे. ऋग्वेदला देखील अभिनयाची आवड आहे. अनेक नाटकांच्या स्पर्धेत तो नेहमीच सक्रिय सहभाग दर्शवतो. 
योगेश सोमण यांची आजपर्यंतची कारकीर्द.
नाटक : ‘जन्मठेप,’ ‘आता कसा वाटतंय?’ ‘केस नंबर ९९,’ ‘रंग्या रंगिला रे,’ ‘गणपती बाप्पा मोरया,’ ‘श्री गोपाळ कृष्ण,’ ‘चाणक्य विष्णुगुप्ता,’ ‘सोंगटी,’ ‘राजा शिवबा,’ ‘आम्ही निमित्तमात्र,’ ‘अचानक,’ ‘दिली सुपारी बायकोची,’ ‘सुपारी,’ ‘आनंदडोह,’ ‘स्त्रीसूक्त,’ ‘एकदा पाहावा न करून,’ ‘नकळत दिसले सारे,’ ‘मी विनायक दामोदर सावरकर,’ ‘श्यामपात’.
मालिका : ‘स्पेशल ५,’ ‘अंजली,’ ‘क्राईम पेट्रोल,’ ‘नांदा सौख्यभरे,’ ‘मेहंदीच्या पानावर,’ ‘अनोळखी दिशा,’ ‘फू बाई फू,’ ‘दिल्या घरी तू सुखी राहा,’ ‘कथाकथी,’ ‘चेकमेट,’ ‘काळा वजीर पांढरा राजा,’ ‘पेशवाई,’ ‘रेशीमगाठी,’ ‘घरकुल,’ ‘ग्राहकांशी हितगुज,’ ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’
चित्रपट : ‘उरी : द सर्जिकल स्ट्राईक,’ ‘माझा भिरभिरा,’ ‘मांजा,’ ‘ये रे ये रे पैसा,’ ‘रमा माधव,’ ‘आता गं बया,’ ‘आनंदी गोपाळ,’ ‘आसूड,’ ‘माणुसकी,’ ‘दृश्यम,’ ‘फास्टर फेणे,’ ‘दांडगी मुले,’ ‘बेलगाम,’ ‘अचानक,’ ‘वीर सावरकर’
लघुपट व माहितीपट : ‘ज्योती,’ ‘अपनी’ व अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचा ‘इतिहास रंगभूमीचा’ या कार्यक्रमांतर्गत 3० माहितीपट निर्मिती व दिग्दर्शन.
पुस्तके : ‘६३ एक अंकी नाटके,’ ‘७ दोन अंकी नाटके,’ ‘२० एकपात्री नाटके’ (गुजराती आणि हिंदी भाषेत भाषांतरे), ‘आनंदडोह,’ ‘स्त्रीसूक्त आणि परशुराम,’ ‘नकळत दिसले सारे,’ ‘एकदा काय झालं सांगू?’

विमामहर्षी अण्णासाहेब चिरमुले

विमामहर्षी अण्णासाहेब चिरमुले 
 जन्म. ४ जून १८६४ रोजी सातारा येथे.
अण्णासाहेब चिरमुले हे युनायटेड वेस्टर्न बॅँकेचे संस्थापक म्हणून सर्वानाच परिचित आहेत. पण अत्यंत निरलस आणि नि:स्वार्थी वृत्तीने त्यांनी पाच संस्था नावारूपाला आणल्या. कालौघात दुर्दैवाने बॅँकेसह त्यांच्या सर्व संस्थांचे अस्तित्व संपुष्टात आले
या द्रष्टय़ा विमामहर्षीच्या कल्पकतेने सातारा शहर देशाच्या आर्थिक नकाशावर आले. 
अण्णासाहेब चिरमुले यांचे शालेय शिक्षण साताऱ्यात झाले. सुरवातीपासून हुशार स्वभाव. घरची परिस्थिती हलाखीची असल्यामुळे नादारी मागून शिक्षण कसबसं चाललं होतं. कोल्हापूरच्या राजाराम कॉलेजमध्ये प्रवेश केला.त्याकाळी बैलगाडीने मुंबईला जाऊन परीक्षा दिली आणि आपल्या हुशारीने सर आल्फ्रेड शिष्यवृत्ती मिळवली.
पुढे मुंबईच्या सुप्रसिद्ध एलफिन्स्टन कॉलेजमधून इतिहास व अर्थशास्त्र हे विषय घेऊन अण्णासाहेब बी ए केले. त्यांना पुढे एलएलबीच शिक्षण घ्यायचं होत पण घरची परिस्थिती आणि नुकतंच झालेलं लग्न यामुळे तात्पुरती शिक्षकाची नोकरी सुरु केली. याच काळात  मुंबईत काही सहकाऱ्यांबरोबर ‘दि मराठा स्कूल’ या नावाची एक शाळाही काढली. काही काळ जमखंडी येथे देखील एका शाळेत शिकवलं. अण्णासाहेब जेव्हा एल एल बी झाले तेव्हा त्यांना मुधोळ संस्थानात न्यायाधीश मिळाली. तिथे न्यायदानाचे काम निस्पृहपणे केले. एका खटल्यात मात्र वरून दबाव येत असल्याचे लक्षात येताच अडथळ्यास न जुमानता कायदा पाळूनच निकाल दिला आणि  त्या नोकरीचा राजीनामाही दिला. १८९४ साली अण्णासाहेब चिरमुले साताऱ्याला आले. येथे वकिलीस प्रारंभ केला, सोबत लॉ चे क्लास घेण्यास सुरुवात केली. त्या वेळी नव्यानेच स्थापन झालेल्या सातारा नगरपालिकेच्या अनेक कमिट्यांवर काम केले.
सातारा शहरात अनेक सामाजिक उपक्रमात ते भाग घेत होते, वकिली उत्तम सुरु होती मात्र त्यांचा खरा पिंड उद्योजगतेचा होता. याच काळात स्वातंत्र्यलढ्याच्या चळवळीने जोर धरला होता. लोकमान्य टिळकांनी स्वदेशीचा विचार देशाच्या कानाकोपऱ्यात पोहचवण्यास सुरवात केली होती. तेव्हा अण्णासाहेब चिरमुले व त्यांचे काही सहकारी यांनी मिळून चार हजार रुपयांच्या भांडवलावर १९०६ साली स्वदेशी कापड विकणारे दुकान सुरु केले. पुढे मद्रास येथून साखर मागवून ती साताऱ्यात विकण्यास सुरवात केली. त्यांची प्रसिद्धी एवढी झाली कि हीच साखर ते पुण्या मुंबईला विकू लागले.
अण्णासाहेबांचं अर्थशास्त्राचा ज्ञान वाखाणण्याजोगं होतं. दुकानास भांडवलाची कमतरता पडू नये म्हणून त्या दुकानात ठेवी ठेवून घेण्यास सुरुवात प्रथमपासूनच केली होती. ठेवींवर व्याजही दिले जाई. ठेवलेले पैसे जरुरीप्रमाणे परत मिळत. त्याची सुरुवात तेथून झाली. विशेष म्हणजे, त्या दुकानांतून विधवा, विद्यार्थी आणि अनाथ यांपैकी लायक व्यक्तींना खरेदीवर सवलत दिली जात असे. यातूनच सातारा स्वदेशी कमर्शियल बँकेची स्थापना १९०७ साली करण्यात आली.
त्याकाळी साताऱ्यामध्ये काकाराव जोशी आणि वासुदेव जोशी हे दोन इन्शुरन्स एजंट होते. त्यांच्या इन्शुरन्स कंपन्या परदेशी होत्या. त्याकाळी भारतात बहुतांश इन्शुरन्स कंपन्या ब्रिटिश मालकीच्या होत्या. अशात आपली स्वदेशी इन्शुरन्स कंपनी अशी कल्पना या जोशींच्या मनात आली. हे करू शकणारा एकमेव हुशार व्यक्ती त्यांच्या माहितीत होता तो म्हणजे अण्णासाहेब चिरमुले.
अण्णासाहेब हि कंपनी सुरु करण्यासाठी तयार झाले मात्र त्यापूर्वी त्यांनी १९१० ते १९१२ पर्यंत या इन्शुरन्स व्यवसायांवरील पुस्तके अमेरिकेतून मागवून त्यांचा सांगोपांग अभ्यास केला. त्यांचे मित्र वामनराव गोवईकर यांनी त्या काळी पंचवीस हजार रुपयांचे रोखे कंपनीस दिले. त्या बळावर कंपनी मुंबईस रजिस्टर झाली आणि मगच १९१३ सातारा शहरात ‘वेस्टर्न इंडिया लाइफ इन्श्युरन्स कंपनी’ची (विलिको) अस्तित्वात आली.
असं म्हणतात कि याच कंपनीचे पहिले नाव वेस्टर्न इंडिया म्युच्युअल अश्युरन्स असं होतं ज्याच्या इनिशियल्स एकत्र केले तर उच्चार WIMA म्हणजेच विमा असा होतो. कित्येक जणांचे म्हणणे आहे की लाईफ इन्श्युरन्सला आयुर्विमा हे नाव चिरमुले यांच्या विमा कंपनीमुळे मिळाले आणि याच विमाला हिंदीत बिमा असं म्हटलं जाऊ लागलं. ही गोष्ट खरी आहे का हे नक्की माहित नाही पण विमा महाराष्ट्रात रुजवली ती अण्णासाहेब चिरमुले या दूरदृष्टीच्या उद्योजकानेच.
पुण्या मुंबईच्या बाहेर सातारा सारख्या तेव्हाच्या छोट्याशा शहरात एक मराठी माणूस विमा कंपनी सुरु करून ती यशस्वी पणे चालऊन दाखवतो हे अनेकांसाठी सुखद आश्चर्याचा धक्का होता. अंगभूत सचोटी, चिकाटी आणि चातुर्य हे भांडवल तर होतंच शिवाय अण्णासाहेब चिरमुले नवीन शिकण्यासाठी कायम उत्सुक असायचे. या विलीको कंपनीमार्फत विमा एजंटांना कमिशनखेरीज प्रॉव्हिडंट फंड व विम्याची व्यवस्था करण्यात आली होती. फक्त महाराष्ट्रातच नाही तर सिंध पासून मद्रासपर्यंत या कंपनीच्या शाखा उघडण्यात आल्या.
त्यांचा विमा क्षेत्रातील अभ्यास संपूर्ण भारतात एक आदर्श म्हणून मानला जाऊ लागला. १९३६ साली त्यांनी पुण्यात पुण्यास भरलेल्या विमा परिषदेचे अध्यक्ष म्हणून त्यांची निवड करण्यात आली. अण्णासाहेबांची विमाक्षेत्रातील भरीव कामगिरी व तपश्चर्या यामुळे त्यांना विमामहर्षी हि पदवी देण्यात आली.
विलिकोकडे विमाहप्त्यांच्या रूपाने जसा अधिकाधिक पैसा येऊ लागला तसतशा गुंतवणूक संधी अण्णासाहेबांना अपुऱ्या वाटू लागल्या. कंपनीच्या विमेदारांनी ठिकठिकाणी भरलेल्या हप्त्यांच्या रकमांची वसुली विविध बँका करत होत्या. तसेच, गुंतवलेल्या  रकमांचे रोखे अगर शेअर सर्टिफिकिटे सुरक्षित ठेवून त्यांच्या व्याजाची वसुली दरसाल करण्याचे कामही काही बँका करत होत्या. त्या कामांसाठी कंपनीला बरेच कमिशन बँकांना द्यावे लागे.
त्यामुळे स्वत:चीच एखादी बँक असल्यास तो पैसा त्याच बँकेस मिळेल असा विचार करून अण्णासाहेबांनी १९३६ साली सातारा येथे ‘दि युनायटेड वेस्टर्न बँक लि.’ची स्थापना केली.
युनायटेड वेस्टर्न बँक, विलिको, सातारा स्वदेशी अर्बन बँक, विमा छापखाना आणि पुढे १९४६ साली स्थापन केलेली ‘वेस्टर्न इंडिया ट्रस्टी अ‍ॅण्ड एक्झिक्युटर कंपनी’ या पाचही संस्थांना अण्णासाहेब आपुलकीने स्वत:च्या ‘पंचकन्या’ म्हणून संबोधत असत.
चिरमुले यांनी आपल्या संस्थांना पाश्चिमात्य (वेस्टर्न इंडिया लाइफ इन्श्युरन्स, युनायटेड वेस्टर्न बँक, वेस्टर्न इंडिया ट्रस्टी अ‍ॅण्ड एक्झिक्युटर कंपनी) नावे दिली होती. या पाचही कंपन्या त्यांनी सचोटीने आणि काटकसरीने चालवल्या, त्यांची प्रसिद्धी देशभरात झाली. 
आजसुद्धा युनायटेड वेस्टर्न बँकेचे नाव निघाल्यावर लोकांचा ऊर भरून येतो. महाराष्ट्रालाच नव्हे, तर चेन्नई, मध्य प्रदेश, दिल्ली येथील ग्राहकसुद्धा आपुलकीची बँक म्हणून सातारा शहराने दिलेल्या आíथक क्षेत्रातील या ब्रँडचा आवर्जून उल्लेख करतात. साताऱ्यातील ही छोटी, पण गुणी बँक तिच्या विशिष्ट सेवावृत्तीमुळे ग्राहकांना हुरहुर लावून गेली. अनंत काळापर्यंत त्या ब्रँडची आठवण तळपत राहील.
१९५१ साली त्यांच्या मृत्यूनंतर संचालकांनी या कंपन्या तितक्याच तत्परतेने चालवल्या.
कालौघात या कंपन्या आता उरल्या नाहीत, स्वातंत्र्यानंतर विमा कंपन्यांचे राष्ट्रीयीकरण करण्यात आले आणि विलिको एल आय सी मध्ये विलीन करण्यात आली. मात्र तरीही त्यांनी घालून दिलेला वारसा आज महाराष्ट्रात कायम आहे.
१०० वर्षांपूर्वी विमा कंपनी स्थापन करून साताऱ्याला देशभरात नवी ओळख मिळवून देणाऱ्या अण्णासाहेब चिरमुले यांच्या आठवणी सातारा सांगली जिल्ह्यांमध्ये जपलेल्या आहेत. राष्ट्रीय पातळीवर अर्थक्षेत्रात भरावी कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना विमामहर्षी अण्णासाहेब चिरमुले स्मृती पुरस्काराने सन्मानित केले जाते. यात डॉ.मनमोहन सिंग, नारायण मूर्ती अशा अनेक दिग्गजांना हा पुरस्कार देण्यात आला आहे.
अण्णासाहेब चिरमुले यांचे २९ऑगस्ट १९५१ रोजी निधन झाले.

राम पटवर्धन

  राम पटवर्धन

सत्यकथा’ आणि ‘मौज’ या दोन वाङमयीन नियतकालिकांद्वारे मराठी साहित्य क्षेत्रात साक्षेपी संपादनाचा मापदंड निर्माण करतानाच अनेक साहित्यिक ‘घडविणारे’ ज्येष्ठ संपादक राम पटवर्धन
जन्म. २१ मार्च १९२८
राम पटवर्धन ऊर्फ आप्पांनी शालेय शिक्षण रत्नागिरीत संपवून मुंबईत येऊन त्यांनी बीए, एमए केले. शिक्षणासोबत सरकारी नोकरीही केली. सिडनेहॅम, रुइया, पोद्दार, सिद्धार्थ व एमडी या महाविद्यालयांमध्ये मराठीचे अध्यापनही केले. एमए करतानाच मौजच्या श्री. पु. भागवतांनी त्यांना मौजेत येण्याचा आग्रह केला व ते मौजेच्या गिरगावातील कार्यालयात रुजू झाले. १९९४ पर्यंत त्यांनी मौजमध्ये संपादकपद भूषवले. परंतु त्यांच्या काळात प्रसिद्ध झालेल्या मौजच्या पुस्तकांवर पटवर्धनांचा शिक्का असे. एका कथेचे सहा, सात वेळा पुनर्लेखन करून घेतल्यानंतरच तिला ते सत्यकथेत स्थान देत. नवोदितांप्रमाणेच प्रस्थापितांनाही सत्यकथेत कथा प्रसिद्ध झाल्याचे अप्रूप वाटे, ते याचमुळे. खादीचा कुडता, पांढरा लेंगा व खांद्याला झोळी अशा पेहरावात कायम असणार्या. पटवर्धनांशी गप्पा मारायला, चर्चा करायला अनेक लेखक मौजच्या कार्यालयात नेहमी येत. ‘कथेला टोक नाही’ वा ‘बरी वाटावी,’ अशा शब्दांत ते लेखकापर्यंत आपला अभिप्राय पोहोचवत, अशी त्यांची ख्याती होती. पटवर्धनांनी मार्जोरी किनन रॉलिंग्ज यांच्या ‘द यिअरलिंग’ या कादंबरीचा ‘पाडस’ या नावाने केलेला अनुवाद प्रचंड गाजला. अनुवाद कसा असावा, याचे उत्तम उदाहरण म्हणून आजही पाडसचे नाव सन्मानाने घेतले जाते. त्यांनी अचला जोशी यांच्या श्रद्धानंद महिला श्रमाविषयी लिहिलेल्या ‘आश्रम नावाचं घर’ या भल्यामोठ्या पुस्तकाचे संपादन केले. ‘नाइन फिफ्टी टू फ्रीडम’ या पुस्तकाचा ‘अखेरचा रामराम’ या नावाने मराठी अनुवाद केला. तसेच बी. के. अय्यंगार यांचे योगविद्येवरील पुस्तक ‘योगदीपिका’ या नावाने मराठीत आणले. राम पटवर्धन ३ जून २०१४ रोजी निधन झाले.

गोपाळ नीलकंठ दांडेकर


  गोनीदां ऊर्फ गोपाळ नीलकंठ दांडेकर 
जन्म. ८ जुलै १९१६ 
वयाच्या अवघ्या तेराव्या वर्षी गोनीदांनी घर सोडले. तेव्हापासून त्यांच्या पायाला भिंगरी लागली ती कायमचीच. संत गाडगेबाबांजवळ ते राहिले, त्यांच्याबरोबर हिंडले. 'सोपे लिहिणे व बोलणे ही गाडगेबाबांची देणगी;' असे गोनीदां म्हणत, नर्मदेची पायी परिक्रमा हा गोनीदांच्या जीवनातला एक रोमहर्षक भाग होता. या परिक्रमेत त्यांनी जीवन पाहिले. माणसे पाहिली. त्यांचे वागणे-बोलणे सारे पाहिले. या अनुभवाचा त्यांना पुढे लेखनात फार उपयोग झाला.
'आमचे राष्ट्रगुरू' ही लहान मुलांसाठी पुस्तिका हे त्यांचे पहिले लेखन. 'साभार परत' हा शब्द माहीत नसलेला मी लेखक आहे, असे गोनीदा म्हणत. 'बिंदूची कथा' ही त्यांची पहिली कादंबरी. मग त्यांनी 'माचीवरला बुधा', 'पूर्णामायेची लेकरं' (ही वऱ्हाडी बोलीतील पहिली कादंबरी),'आम्ही भगीरथाचे पुत्र', 'मोगरा फुलला', 'पडघवली', 'शितू', 'पवनाकाठचा धोंडी', 'जैत रे जैत', 'मृण्मयी' अशा अनेक कादंबऱ्या लिहिल्या.
'मृण्मयी' गोनीदांची सर्वात आवडती कादंबरी. 'पडघवली'पासून आपल्याला लेखनशैली सापडली, असे ते म्हणत. 'पवनाकाठचा धोंडी', 'जैत रे जैत' या कादंबऱ्यांवर चित्रपटही निघाले. त्यांना अनेक पुरस्कारही लाभले. 'पवनाकाठचा धोंडी'ला केंद्र सरकारचा पुरस्कार मिळाला. 'शितू', 'कुणा एकाची भ्रमणगाथा', 'पवनाकाठचा धोंडी', 'पडघवली' या कादंबऱ्यांना राज्य सरकारचे पुरस्कार मिळाले.
गोनीदां अनेक गड हिंडले. राजगड हा त्यांचा सर्वात आवडता गङ व्याख्यानांनिमित्त ते अमेरिकेला गेले होते, तेंव्हा त्यांना राजगडाची स्वप्ने पडायची. ते बेचैन व्हायचे. तिथून आल्या आल्या त्यांनी आधी राजगडावर धाव घेतली होती. या भटकंतीवर त्यांनी दुर्गभ्रमणगाथा, किल्ले, दुर्गदर्शन, महाराष्ट्र दर्शन, गगनात घुमविली जयगाथा, शिवतीर्थ रायगड अशी अनेक पुस्तके लिहिली. ती वाचून, या माणसाचे दुर्गप्रेम पाहून थक्क व्हायला होते. बाबासाहेब पुरंदरे यांच्यासह त्यांनी शिवछत्रपती राज्याभिषेक त्रिशताब्दीनिमित्त विशाळगड ते पन्हाळगड हा प्रवास पायी केला होता.
गोनीदांना संतसाहित्याचे खूप आकर्षण. लहानपणापासूनच गाडगेबाबा, अकोल्याचे जगन्नाथ जोशी, ह.भ.प. सोनोपंत दांडेकर, धुळयाचे महामहोपाध्याय श्रीधरशास्त्री पाठक, गोळवलकर गुरूजी यांच्या सहवासात राहिल्याने अप्पांवर धार्मिक संस्कार झाले. आळंदीचे मारूतीबुवा गुरव यांचेही ज्ञानेश्वरीचे संस्कार झालेले. अप्पांनी मग मुलांना समजेल अशी 'सुलभ भावार्थ ज्ञानेश्वरी', तसेच 'श्री रामायण', 'भक्तिमार्गदीप', 'कर्णायन', 'कृष्णायन', 'दास डोंगरी राहतो', 'तुका आकाशाएवढा' ही पुस्तके लिहिली.
साहित्यातही सर्व प्रांती या मुशाफिराने संचार केला. 'जगन्नाथाचा रथ', 'काका माणसात येतो', 'वनराज सावध होतात', 'कुऱ्हाडीचा दांडा', 'संगीत राधामाई', ही नाटके त्यांनी लिहिली. 'छंद माझा वेगळा' हे आपल्या छंदाविषयीचे पुस्तक त्यांनी लिहिले; एवढेच नाही तर, 'पाच संगीतिका' हे त्यांचे काव्यही प्रसिध्द झाले आहे.
वयाची साठी पूर्ण झाली, तेंव्हा गोनीदा पुणे ते लोणावळा हे अंतर पायी चालून गेले. दर वाढदिवस एखादया गडावर साजरा करायचा असा त्यांचा उपक्रम असायचा. नंतर प्रकृती अस्वास्थ्यामुळे ते शक्य होईना तेंव्हा ते विलक्षण बेचैन होत. 'जोपर्यंत मी राजगडावर जाऊ शकतो, तोपर्यंत दिवा विझलेला बरा. मी विनाकारण भारभूत होऊन जगू इच्छित नाही. माझ्याभोवती भरपूर माणसे आहेत; पण त्यांना भार होऊन बसणे बरे नव्हे.', अशी भावना गोनीदांनी त्यांची ७१ वर्षे पूर्ण झाल्याच्या वेळी 'सकाळ'ला मुलाखत देताना व्यक्त केली होती.
गड-किल्ले, आपली मराठी संस्कृती, मराठी भाषा याविषयी त्यांना खूप वाटे. त्यांच्याच अविरत परिश्रमाने रायगडावर मेघडंबरी बसविली गेली. गड-किल्ल्यांच्या आजच्या अवस्थेमुळे ते अस्वस्थ होत. 'सरकारवर विसंबून न राहता एकेका गिर्यारोहक मंडळाने एकेक किल्ला दत्तक घेऊन तो जतन करावा,' असे त्यांचे सांगणे होते.
मराठी भाषेविषयी गोनीदांचे प्रेम वेळोवळी दिसून येई. ते स्वत: सर्व प्रांत हिंडलेले असल्यामुळे त्यांच्या कादंबऱ्यात ती बोलीभाषा उमटे. प्रादेशिक कादंबरीचे दालन गोनीदांनी समृध्द केले, ते त्यांच्या या अंगामुळे. मराठीच्या कोकणी, वऱ्हाडी, खानदेशी, मावळ, अहिराणी, ठाकरीअशा बोलीभाषांतील लेखन वाचकाला थेट भिडायचे. 
मृत्यूविषयी त्यांच्या स्वत:च्या कल्पना होत्या. ''माचीवरला बुधा' हे एक माझ्या मरणाचे मी पाहिलेले स्वप्न आहे. जीवन संपायचे असेल तर ते बुधासारखे संपावे,' असे ते म्हणाले होते. आपल्या मृत्युपत्रात त्यांनी लिहिले आहे, 'मी मेल्यावर माझी रक्षा सहयाद्रीतील शिवछत्रपतींच्या रायगडावर, बाजीप्रभूंच्या पावनखिंडीत, आणि सिंहगडाच्या तानाजी कडयावर, उधळून टाकावी. हे काम श्री. बाबासाहेब पुरंदरे यांनी करावे.' या माणसाची शेवटची इच्छाही शिवरायांच्या गड-किल्ल्यात माती बनून कायमचे मिसळून जावे, अशीच होती. यापेक्षा अधिक कोणता पुरावाहवा त्यांच्या उत्कट शिवभक्तीचा?  यांचे ८ जुलै १९८४ निधन झाले.
🙏🙏