विशेष प्रश्नमंजुषा टेस्ट सोडवा सर्टिफिकेट मिळवा

मी विजय भुजबळ ग्रेट इंडियन या ब्लॉगवर सहर्ष स्वागत करत आहे या ब्लॉग वरती आपणास भारत देशातील महान व्यक्तींची माहिती उपलब्ध होणार आहे. देशासाठी लढणारे क्रांतिकारक जवान, सैनिक, खेळाडू, समाजसेवक, शिक्षण तज्ञ, वैज्ञानिक , लेखक, राजकारण, अशा क्षेत्रांमध्ये महत्त्वपूर्ण महान व्यक्तींची ओळख कार्य , याची माहिती उपलब्ध होणार आहे.WELCOME TO MY BLOG GREAT INDIAN THANKS FOR VISIT MY BLOG AND FOLLOW MY BLOG
FOLLOW MY BLOG


 

Translate /ब्लॉग वाचा जगातील कोणत्याही भाषेत

समाजकारण /राजकारण

Popular Posts

शिवराम हरी राजगुरु

 


             *शिवराम हरी राजगुरु* 


        *जन्म : 24 आॕगष्ट 1908*   

*(खेड, पूणे, बाॕम्बे प्रेसिडेन्सी, ब्रिटिश भारत)*

        *फाशी : 23 मार्च 1931*

 *(लाहोर, ब्रिटिश भारत - सध्या पंजाब, पाकिस्तान)*


               *वय : 22 वर्षे*


              भारतीय स्वातंत्र्य लढा म्हणजे जगातील सर्वोत्तम क्रांतिपर्वापैकी एक होय. कित्येक क्रांतिकारकांनी जीवाची पर्वा न करता या धगधगत्या अग्निकुंडात उडी घेतली आणि बलिदान स्विकारले. त्या क्रांतिकारकांची आठवण होताच तीन चेहरे आपसुकच डोळ्यांसमोर येतात. ते म्हणजे - भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव.  राजगुरू हे भारतीय स्वातंत्र्य लढयातील एक प्रमुख क्रांतिकारक होते. अचूक नेमबाजी आणि दांडगी स्मरणशक्ती या दोन गुणांचे त्यांना जणू वरदानच लाभले होते. 

             राजगुरू यांचा जन्म 24 ऑगष्ट 1908 ला पुणे जिल्हयातील, खेड येथे झाला होता. ते अवघे 6 वर्षांचे असतांनाच त्यांच्या वडिलांचे निधन झाल्यामुळे अल्प वयातच ज्ञानार्जन व संस्कृत शिकण्यासाठी काशी येथे गेले होते. तेथे त्यांनी हिंदु धर्मग्रंथांसोबतच वेदांचाही अभ्यास केला होता, परंतु 'लघु सिध्दान्त कौमुदी' सारखा क्लिष्ट ग्रंथसुध्दा अल्प वयातच मुखपाठ केलेला होता. त्यांना व्यायामाची आवड होती तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या गनिमी काव्याचे प्रशसंक होते.

           वयाच्या 14 व्या वर्षी त्यांनी घर सोडले. घर सोडण्यामागे त्यांचे कारण देखील वेगळे होते. इंग्रजी विषयात नापास झाल्याने मोठ्या भावाने त्यांना आपल्या नववधूसमोर इंग्रजी धडा वाचायची शिक्षा सुनावली. अर्थातच राजगुरूंना ते काही जमले नाही आणि झाला अपमान त्यांच्या जिव्हारी लागला. शेवटी संधी साधून जसे होते तसे, आईने तेल आणायला दिलेले 9 पैसे आणि बहिणीने अंजीर आणायला दिलेले 2 पैसे असे एकूण 11 पैसे घेऊन त्यांनी घरातून धूम ठोकली ती कायमचीच.

             सर्वप्रथम त्यांनी नाशिकला काही काळ वास्तव्य केले आणि नंतर शिक्षणाच्या उद्देशाने ते काशीला पोहोचले. तेथे पुस्तकांत, राजकीय आणि व्यायामशाळेत लाठीकाठी, दांडपट्टा यांसारख्या खेळात ते रमून गेले. काशी येथील पं. मदनमोहन मालवीयांचे हिंदू विद्यापीठ हे सा-या क्रांतिकारकांचे आश्रयस्थान म्हणून ओळखले जायचे. तेथे अनेक गुप्त खलबतेही होत असत. याच काळात काशीमध्येच राजगुरूंची भेट चंद्रशेखर आझाद यांच्यासोबत झाली. राजगुरूचे निडर व्यक्तीमत्व पाहून आझादांनी राजगुरूंना क्रांतिकारकांच्या गटात सामिल करुन घेतले. त्या क्रांतिमय वातावरणात वावरतांना राजगुरूंमधील क्रांतिकारक घडत गेला. कोणत्याही मोहिमेसाठी ते एका पायावर तयार असत. वेळ पडली तर या क्रांती संग्रामात बलिदान देण्याची देखील त्यांची तयारी होती.

             याचवेळेस शिव शर्मा नावाच्या एका सहका-यासोबत दिल्लीमधील एका फितुराला ठार करण्याची कामगिरी त्यांच्यावर सोपविण्यात आली. पण पिस्तुल एकच असल्याने पंचाईत होती.

कारण तो फितुर क्वचितच घराबाहेर पडत असे. त्यामुळे तेव्हा तो बाहेर पडेल तेव्हाच त्याला मारणे सोयीचे होते. त्यासाठी दोघाकडे पिस्तुल असणे आवश्यक होते. अन्यथा जोखीम पत्करावी लागली असती. राजगुरूंना थांबायला सांगून शिव शर्मा पिस्तुल आणण्यासाठी लाहोरला गेले. पण त्यांना पिस्तुल काही मिळाली नाही. जवळपास तीन दिवसांनी ते दिल्लीहून परतले आणि फितुराच्या घराजवळ पाहतात तो काय भलामोठा पोलीस पहारा आणि सर्चलाईट्स होत्या. शिव शर्मा काय समजायचे ते समजले. तो फितुर संध्याकाळच्या वेळेस 7 ते 8 च्या दरम्यान बाहेर पडत असे. त्याच संधीचा फायदा घेऊन राजगुरूंनी एकटयाने मोहिम फत्ते केली होती ! ,  पाठी लागलेल्या पोलिसांचा ससेमिरा चुकवीत राजगुरू पळत मथुरेच्या दिशेने निघाले आणि तुम्हाला विश्वास बसणार नाही पण त्यांनी दिल्लीच्या पुढील दोन स्थानके  काळयाकुट्ट अंधारात रेल्वे पटरींतून पळत पार केली.

          सायमन कमिशनविरूध्द 30 ऑक्टोबर 1928 रोजी झालेल्या निदर्शनादरम्यान ब्रिटिशांनी केलेल्या लाठीहल्ल्यात लाला लजपतराय गंभीर जखमी झाले होते. "गंभीर जखमेमुळे 17 नोव्हेंबर 1928 ला त्यांचे निधन झाले. 

            पंजाबकेसरी लाला लजपतराय यांच्यावर निर्दयीपणे लाठीहल्ला करून त्यांना ठार मारणा-या पोलीस अधिकारी स्कॉटला जगण्याचा अधिकार नाही अशी गर्जना करीत भगतसिंगांनी त्याचा वध करण्याचा विडा उचलला. राजगुरूंनी हट्ट केल्यामुळे भगतसिंगांनी त्यांना देखील आपल्या बरोबर सामील करून घेतले. त्यांचा अजून एक साथीदार जय गोपाळ पोलीस स्टेशनवर स्कॉटच्या हालचालींवर पाळत ठेवून होता. पण 4 - 5 दिवस स्कॉट त्या भागात आलाच नाही. 

            अखेर दुस-या दिवशी एक गोरा अधिकारी पोलीस स्टेशनमधून बाहेर पडला. जय गोपाळला वाटले की हाच स्कॉट आहे, म्हणून दबा धरून बसलेल्या भगतसिंग आणि राजगुरुंना खूण केली. पण भगतसिंगांनी हा स्कॉट नसावा अशी प्रतिक्रिया दिली. परंतु राजगुरूचे त्यांच्याकडे लक्ष नव्हते. भगतसिंगांनी नकार देण्यापूर्वीच राजगुरुंनी त्या गो-या अधिका-यावर गोळी झाडली. परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये म्हणून भगतसिंगांनी सलग आठ गोळ्या झाडत त्या गो-या अधिका-याला यमसदनी धाडले. त्या सगळ्या गोंधळातून बाहेर पडण्यात मात्र ते यशस्वी झाले . नंतर दोघांनाही कळले की तो स्कॉट नसून साँडर्स होता. 

            माणूस चुकला पण मोहीम अयशस्वी राहिली नाही यातच भगतसिंग आणि राजगुरू या दोघांनीही समाधान मानले. इकडे मारेक-यांच्या मागावर पोलीस हात धुवून लागले होते. पण शेवटी वेषांतर करून भगतसिंग आणि राजगुरू दोघेही दिवसाढवळया एकाच गाडीतून लाहोरहून राजकोटला निसटले. लोकांना संशय येऊ नये म्हणून त्यांच्यात मिसळू लागले. परंतु फार काळ ते पोलिसांना गुंगारा देऊ शकले नाहीत, आणि 1929 सालच्या सप्टेंबर महिन्यात ते पोलिसांच्या हाती लागले.


            त्यांनी साथीदारांची नावे सांगावीत म्हणून कारागृहात त्यांचा अमानवी छळ करण्यात आला. शेवटी छळ करणारे थकले पण राजगुरुंनी त्यांना आपल्या साथीदारांच्या नावाची साधी पुसटशी कल्पनाही येऊ दिली नाही. यावरून त्यांची निष्ठा दिसून येते., 

             पुढे कारावासात शिक्षा भोगत असतांना भगतसिंग आणि सुखदेव या आपल्या सहाकाच्या सोबत त्यांची पुन्हा भेट झाली. तेथेही त्यांनी आपला क्रांतिकारी बाणा ढळू दिला नाही. अखेर लाहोर खटल्याचा निकाल आला आणि भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू या तिघांनाही लाहोर जेलमध्ये 23 मार्च 1931 ला संध्याकाळी 7.33 ला फासावर चढवण्यात आले आणि तीन पेटत्या  निखान्यांची धग विझली. त्यांच्या बलिदानाचा 23 मार्च हा दिवस आपल्याकडे शहीद दिन म्हणून साजरा केला जातो.

             स्वातंत्र्यप्राप्ती वगळता कोणतीही अभिलाषा मनात न धरता केवळ आणि केवळ देशासाठी प्राणाची आहुती देणा-या आणि महाराष्ट्राचे नाव क्रांतिपर्वात अढळ करणा-या राजगुरु नामक प्रेरणादायी व्यक्तिमत्वाला मानाचा मुजरा !!

         

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा