विशेष प्रश्नमंजुषा टेस्ट सोडवा सर्टिफिकेट मिळवा

समाजकारण /राजकारण

मी विजय भुजबळ ग्रेट इंडियन या ब्लॉगवर सहर्ष स्वागत करत आहे या ब्लॉग वरती आपणास भारत देशातील महान व्यक्तींची माहिती उपलब्ध होणार आहे. देशासाठी लढणारे क्रांतिकारक जवान, सैनिक, खेळाडू, समाजसेवक, शिक्षण तज्ञ, वैज्ञानिक , लेखक, राजकारण, अशा क्षेत्रांमध्ये महत्त्वपूर्ण महान व्यक्तींची ओळख कार्य , याची माहिती उपलब्ध होणार आहे.WELCOME TO MY BLOG GREAT INDIAN THANKS FOR VISIT MY BLOG AND FOLLOW MY BLOG
FOLLOW MY BLOG


 

Translate /ब्लॉग वाचा जगातील कोणत्याही भाषेत

Breaking

पितामह दादाभाई नौरोजी..

 


       *भारतीय राजकारणातील* 

             *भीष्माचार्य*

       *पितामह दादाभाई नौरोजी*        

                   


       *जन्म : ४ सप्टेंबर १८२५*

    (वर्सोवा, मुंबई, महाराष्ट्र, भारत)

       *मृत्यू : ३० जून १९१७*

        (महालक्ष्मी,मुंबई, भारत)

दादाभाई नौरोजी : ब्रिटनमधील 

                           खासदार

कार्यकाळ : १८९२ – १८९५

मागील : फ्रेडरिक थॉमस पेंटोन

पुढील : विल्यम फ्रेडरिक बार्टन 

             मस्से-मेंवरिंग


राजकीय पक्ष : भारतीय राष्ट्रीय 

                      काँग्रेस

आई : माणकबाई नौरोजी दोर्डी

वडील : नौरोजी पालनजी दोर्डी

पत्नी : गुलबाई

निवास : लंडन युनायटेड किंग्डम

व्यवसाय : बॅरिस्टर

धर्म : पारशी

                        दादाभाई  नौरोजी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे एक संस्थापक, थोर नेते व अर्थशास्त्रज्ञ.जन्म मुंबईत एका पारशी कुटुंबात. वडील नवरोजी पालनजी दोर्दी आणि आई माणेकबाई. दादाभाई चार वर्षांचे असतानाच त्यांच्या वडिलांचे निधन झाले प्रतिकूल परिस्थितीतही माणेकबाईंनी दादाभाईंचे संगोपन केले आणि शिक्षण पार पाडले. वयाच्या अकराव्या वर्षी दादाभाईंचे शोराबजी श्रॉफ यांच्या सात वर्षांच्या गुलाबीनामक कन्येबरोबर लग्न झाले. दादाभाईंना एक मुलगा आणि दोन मुली अशी तीन अपत्ये झाली.

           एल्‌फिन्स्टन इन्स्टिट्यूशन आणि एल्‌फिन्स्टन महाविद्यालय यांमधून शिक्षण घेऊन १८४५ मध्ये ते पदवीधर झाले. १८५० साली एल्‌फिन्स्टन महाविद्यालयात दादाभाईंची गणित व तत्त्वज्ञान या विषयांचे साहाय्यक प्राध्यापक म्हणून नेमणूक झाली. या महाविद्यालयात प्राध्यापकपदावर नेमलेले दादाभाई हे पहिले भारतीय होत.

            दादाभाई १८५५–५६ च्या सुमारास कामा यांच्या लंडनमधील व्यवसायातील एक भागीदार म्हणून लंडनला गेले तेथे त्यांचा ‘मँचेस्टर कॉटन सप्लाय असोसिएशन’, ‘कौन्सिल ऑफ लिव्हरपूल’, ‘अथेनियम’, ‘नॅशनल इंडियन असोसिएशन’ इ. संस्थांशी जवळचा संबंध आला. १८६५–६६ पर्यंत त्यांनी लंडनच्या युनिव्हर्सिटी कॉलेजमध्ये गुजरातीचे प्राध्यापक म्हणून काम केले. १८६५–७६ या काळात व्यवसायानिमित्त दादाभाईंच्या इंग्लंडला अनेकदा वाऱ्या झाल्या. १८६५ साली लंडनमध्ये डब्ल्यू. सी. बॅनर्जी यांच्यासमवेत दादाभाईंनी ‘लंडन इंडिया सोसायटी’ ही संस्था स्थापली. १९०७ पर्यंत ते तिचे अध्यक्ष होते. १८६२ मध्ये दादाभाई ‘कामा अँड कंपनी’ तून बाहेर पडले आणि त्यांनी ‘दादाभाई नवरोजी अँड कंपनी’ अशी स्वतःचीच कंपनी उभारली. १८६६ मध्ये त्यांनी लंडनमध्ये ‘ईस्ट इंडिया असोसिएशन’ या संस्थेची स्थापना केली ते तिचे सचिवही होते. १८७३ मध्ये भारतीय अर्थकारणाविषयी नेमलेल्या संसदीय समितीपुढे (फॉसेट कमिटी) दादाभाईंनी साक्ष दिली. ही समितीदेखील त्यांच्या परिश्रमांचेच फलित होते. या समितीपुढे दिलेल्या साक्षीत दादाभाईंनी भारतातील करभारप्रमाण सर्वाधिक असून भारतीयांचे सरासरी वार्षिक उत्पन्न केवळ २० रुपयेच असल्याची,  पुराव्यांनिशी सिद्ध करून दाखविले.

              दादाभाईंची १८७४ मध्ये बडोदे संस्थानचे दिवाण म्हणून नियुक्ती झाली तथापि एका वर्षातच महाराज आणि रेसिडेंट यांच्याशी उद्‌भवलेल्या मतभेदांमुळे त्यांनी दिवाणपदाचा राजीनामा दिला. जुलै १८७५ मध्ये ते मुंबई नगरपालिकेचे सभासद म्हणून व नगरपालिकेच्या शहरपरिषदेवरही निवडून आले. १८७६ मध्ये या दोन्ही पदांचा राजीनामा देऊन ते लंडनला गेले. १८८३ मध्ये ते ‘जस्टिस ऑफ द पीस’ झाले आणि दुसऱ्यांदा मुंबई नगरपालिकेवर निवडून आले. ऑगस्ट १८८५ मध्ये गव्हर्नर लॉर्ड रे यांच्या निमंत्रणावरून दादाभाईंनी मुंबई विधानपरिषदेचे सदस्यत्व पत्करले. त्या वर्षाच्या अखेरीस, दादाभाईंनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या संस्थापनेत महत्त्वाचा वाटा उचलला. काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा बहुमान त्यांना तीन वेळा (१८८६, १८९३, १९०६) लाभला. १९०२ साली दादाभाई लंडनच्या हाउस ऑफ कॉमन्समध्ये लिबरल पक्षातर्फे सदस्य म्हणून सेंट्रल फिन्झबरीमधून निवडून आले. ब्रिटिश संसदेचे सदस्यत्व मिळविणारे आणि भारताच्या स्वातंत्र्यास्तव संसदेमध्ये आवाज उठविणारे दादाभाई हे पहिले भारतीय होत.

               दादाभाईंची १८९७ मध्ये ‘रॉयल कमिशन ऑन इंडियन एक्स्पेंडिचर’ ह्या सेल्बी यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या आयोगावर एक सदस्य म्हणून नियुक्ती झाली. या आयोगापुढे त्यांनी साक्षही दिली. १८९८ मध्ये ‘इंडियन करन्सी कमिशन’ ला त्यांनी आपली दोन निवेदने सादर केली. ॲम्स्टरडॅम येथे १९०५ साली भरलेल्या आंतरराष्ट्रीय समाजवादी महासभेसाठी (इंटरनॅशनल सोशलिस्ट काँग्रेस) दादाभाईंनी भारताचे प्रतिनिधित्व केले. १९०६ च्या कलकत्ता काँग्रेसमध्ये भारताच्या समस्यांवर ‘स्वराज्य’ हा एकमेव उपाय असल्याचे त्यांनी घोषित केले.

                   इंग्लंडमधील कॉमर्स, इंडिया, कंटेंपररी रिव्ह्यू, द डेली न्यूज, द मँचेस्टर गार्डियन, पिअर्सन्स मॅगझीन  ह्यांसारख्या महत्त्वाच्या नियतकालिकांमधून दादाभाईंचे अनेक लेख व निबंध प्रसिद्ध झाले. १८४८ साली स्थापन झालेल्या ‘स्ट्यूडंट्स लिटररी अँड सायंटिफिक सोसायटी’ या संस्थेच्या स्ट्यूडंट्स लिटररी मिसेलनी या मासिकामधून (१८५०) त्यांचे नियमित लेख येत असत. ज्ञानप्रकाश नावाचे एक गुजराती नियतकालिक त्यांच्या संपादकत्वाखाली प्रसिद्ध होई. १८८९ मध्ये आपल्या काही सहकाऱ्यांच्या मदतीने दादाभाईंनी रास्त गोफ्तार (ट्रूथ टेलर) नावाचे एक गुजराती साप्ताहिक सुरू करून त्याचे दोन वर्षे संपादन केले. हे साप्ताहिक पुरोगामी विचारांसाठी प्रसिद्ध होते.

               दादाभाईंनी १८७८ मध्ये पॉव्हर्टी ऑफ इंडिया नावाची एक पत्रिका प्रसिद्ध केली तिचेच पुढे पुनर्मुद्रित व विस्तारित अशा एका ग्रंथात रूपांतर करण्यात येऊन तो ग्रंथ लंडनमध्ये पॉव्हर्टी अँड अनब्रिटिश रूल इन इंडिया ह्या शीर्षकाने प्रथम १९०१ व नंतर १९११ मध्ये प्रकाशित करण्यात आला. हा ग्रंथ अतिशय गाजला. पॉव्हर्टी इन इंडिया, द कंडिशन ऑफ इंडिया ह्यांसारखे निवडक निबंध, हाउस ऑफ कॉमन्समधील भाषणे, ‘रॉयल कमिशन ऑन द ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ एक्स्पेंडिचर इन इंडिया’ या आयोगाशी केलेला पत्रव्यवहार, इतर निवडक भाषणे इत्यादींचा उपर्युक्त ग्रंथात अंतर्भाव होतो. या ग्रंथातून दादाभाईंनी (१) भारताचे राष्ट्रीय उत्पन्न, (२) भारताचे दारिद्र्य, (३) करनीती, (४) भारताचे आर्थिक शोषण हा सिद्धांत (ड्रेन थिअरी) इ. मौलिक समस्यांचा ऊहापोह केलेला आहे.

                   भारतीय अर्थशास्त्रीय विचारधारे मधील दादाभाईंचे मौलिक कार्य म्हणजे त्यांनी केलेले भारताच्या राष्ट्रीय उत्पन्नाचे निर्धारण. निरनिराळी मंडळे, समित्या व संस्था ह्यांमधून त्यांनी दिलेली व्याख्याने दादाभाई नवरोजीज स्पीचेस अँड रायटिंग्ज ह्या शीर्षकाने ग्रंथनिविष्ट झाली आहेत. द राइट ऑफ लेबर या शीर्षकाने दादाभाईंनी औद्योगिक आयुक्तांची नेमणूक आणि कामगारांना संरक्षणाचा हक्क या दोहोंसंबंधी एक योजना प्रसिद्ध केली होती. जर या योजनेचे अधिनियमात रूपांतर झाले असते, तर सर्व वेतनधारकांना न्याय मिळाला असता आणि औद्योगिक शांतता प्रस्थापित होण्यास मदत झाली असती. ब्रिटिशांनी चालविलेल्या हिंदुस्थानच्या आर्थिक प्रशासनाबाबत दादाभाई कठोर टीकाकाराची भूमिका घेत असत. ह्या प्रशासनावर करण्यात यावयाच्या खर्चाचे सुयोग्य वितरण होत नसल्याची त्यांची तक्रार होती. प्लेग, दुष्काळ, यांसारख्या संकटांचे निवारण करण्याच्या अथवा त्यांबाबत प्रतिबंधक उपाय योजण्याच्या कामी सरकार फार कमी पैसे खर्च करते, असे दादाभाईंचे मत होते. दादाभाईंचा आर्थिक स्वयंपूर्णतेवर तसेच कुटिरोद्योगांच्या महत्त्वपूर्ण स्थानावर विश्वास होता. अनैसर्गिक आर्थिक गोंधळात रुतलेल्या भारताला स्वदेशी उद्योगधंद्यांवाचून पर्याय नाही, असे त्यांचे ठाम मत होते. असे असूनही देशातील महत्त्वाच्या आणि मूलभूत उद्योगांच्या उभारणीसाठी प्रगत यंत्रसामग्रीचा वापर करण्यास त्यांचा विरोध नव्हता. दादाभाईंनी जमशेटजी टाटांना लोखंड आणि पोलाद कारखाना उभारण्याच्या समयी भारतीय जनतेकडून भांडवल गोळा करण्याचे आवर्जून आवाहन केले होते.

     परदेशी प्रवासाचा दादाभाईंच्या व्यक्तीमत्त्वावर व चारित्र्यावर सखोल परिणाम झाला. स्वतः उदारमतवादी पश्चिमी शिक्षण घेतल्यामुळे, दादाभाईंना त्या शिक्षणपद्धतीबद्दल आदर होता. ब्रिटिशांनी पाश्चिमात्य शिक्षणपद्धती भारतात आणून तिचा प्रसार केल्याबद्दल भारताने नेहमीच इंग्लंडशी कृतज्ञ राहिले पाहिजे, अशी दादाभाईंची भावना होती आणि तिच्या पोटीच त्यांनी अनेक हिंदी तरुणांना उच्च शिक्षणार्थ परदेशी जाण्यास साहाय्य केले होते. दादाभाईंचे व्यक्तीमत्त्व विकसित करण्यामध्ये ग्रंथ व मित्र यांचा वाटा मोठा असल्याचे दिसून येते. फिर्दौसीचा शाहनामा, वॉटचे इंप्रूव्हमेंट ऑफ माइंड तसेच कार्लाइल, मिल व स्पेन्सर ह्यांच्या ग्रंथांनी दादाभाईंवर मोठा ठसा उमटविला. विशुद्ध विचार, आचार व उच्चार ह्यांचे महत्त्व विशद करणारा द ड्यूटीज ऑफ द झोरोस्ट्रिअन्स हा स्वतः लिहिलेला ग्रंथ ते नेहमी जवळ बाळगीत. दादाभाईंना अगणित देशी-परदेशी स्नेही होते. आपल्या खाजगी जीवनामध्ये दादाभाईंचे वर्तन साधे परंतु भारदस्त होते. त्यांच्या पत्रांमधून त्यांच्या सत्यप्रिय व कनवाळू स्वभावाची आणि चारित्र्याची ओळख पटते. त्यांना ग्रंथांचे अतिशय वेड होते. आपला मोठा ग्रंथसंग्रह त्यांनी ‘बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन’ या संस्थेस अर्पण केला. ‘फ्रामजी इन्स्टिट्यूट’, ‘इराणी फंड’, ‘पारसी जिम्नॅशियम’, ‘विडो रीमॅरेज असोसिएशन’, ‘व्हिक्टोरिया अँड ॲल्बर्ट म्यूझीयम’, ‘रॉयल एशियाटिक सोसायटी’ यांसारख्या अनेक संस्थासंघटनांची त्यांनी स्थापना केली.

           एक समाजसुधारक म्हणून दादाभाईंचा लौकिक होता. जातिनिष्ठ मर्यादा पाळणे त्यांना मान्य नव्हते. स्त्रीपुरुष-समानता, स्त्रीशिक्षण यांचा त्यांनी सतत पुरस्कार केला. ‘द स्ट्यूडंट्स लिटररी अँड सायंटिफिक सोसायटी’ ह्या संस्थेच्या वतीने त्यांनी मुलींसाठी तीन मराठी व चार गुजराती शाळा उघडल्या. दादाभाईंच्या ह्या समाजकार्याला जगन्नाथ शंकरशेट यांसारख्यांनी मोठा हातभार लावला.

                        दादाभाई हे प्रखर राष्ट्रवादी वृत्तीचे होते. कलकत्ता काँग्रेसमधील केलेल्या आपल्या भाषणास त्यांनी सर हेन्‍री कँपबेल बॅनरमनच्या पुढील वाक्याने प्रारंभ केला होता : “चांगले सरकार हे काही जनताप्रणीत सरकारला पर्याय ठरू शकत नाही”. याच भाषणात त्यांनी असे घोषित केले, की “आम्ही कोणत्याही कृपेची याचना करीत नाही, आम्हाला फक्त न्याय हवा. सर्व गोष्टी सारांशरूपाने ‘स्वराज्य’ या एकाच शब्दाने सांगता येतील. ते स्वराज्य कसे, तर युनायटेड किंग्डमचे किंवा वसाहतींचे”. दादाभाई हे मवाळ पक्षाचे असून घटनात्मक राज्यपद्धतीवर त्यांचा दृढ विश्वास होता. दादाभाई हे प्रभावी वक्ते होते. इंग्रजी व गुजराती या दोन्ही भाषांवर त्यांचे प्रभुत्व होते.

              सर दिनशा वाच्छा यांनी म्हटल्याप्रमाणे दादाभाई नवरोजी हे भारतीय राज्याशास्त्र आणि अर्थशास्त्र यांचे जनकच मानले जातात. परकीयांच्या वर्चस्वाखालील भारतातील आर्थिक घटनांच्या विशदीकरणाची किती नितांत आवश्यकता आहे, ते दादाभाईंनी आपल्यानंतरच्या अर्थशास्त्रज्ञांना दाखवून दिले. आर्थिक प्रक्रियेचे वास्तव व परिपूर्ण चित्र त्यांनी उभे केले. न्यायमूर्ती रानडे व नामदार गोपाळ कृष्ण गोखले ह्या आर्थिक विचारवंतांनी दादाभाईंच्या परिपूर्ण चित्रातील काही भाग जरी सुधारले, तरीही त्या चित्राचा मूळचा आकृतिबंध अढळच राहिला. ‘भारताचे श्रेष्ठ पितामह’ हे सार्थ बिरुद त्यांना लावण्यात येते. भारताच्या राष्ट्रीय आंदोलनाच्या इतिहासात त्यांचे नाव आणि कार्य चिरंजीव स्वरूपाचे आहे. दादाभाईंचे मुंबई येथे निधन झाले.


💎 *बाह्य दुवे*


"डॉ. दादाभाई नौरोजी, 'द ग्रँड ओल्ड मॅन ऑफ इंडिया', वोहुमन.ऑर्ग - दादाभाई नौरोजींचा समग्र जीवनपट" (इंग्रजी मजकूर).


📚 *दादाभाई नौरोजींवरील पुस्तके*


दादाभाई नौरोजी (चरित्र, गंगाधर गाडगीळ)

दादाभाई नौरोजी : भारतीय राजकारणातील भीष्माचार्य (व्यक्तिचित्रण, निंबाजीराव पवार)

नवरोजी ते नेहरू (गोविंद तळवलकर)

भारताचा स्वातंत्र्य संघर्ष (बिपीनचंद्र)


             

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा