*प्रतिशिवाजी*
*नेताजी पालकर*
*मराठी साम्राज्याचे सरसेनापती*
*जन्म : 1620*
(खालापूर, रायगड जिल्हा, महाराष्ट्र)
*मृत्यू : अंदाजे 1681*
नेताजी पालकर हे दीर्घ काळ श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याचे सरनौबत होते. त्यांना 'प्रतिशिवाजी' म्हणजेच 'दुसरा शिवाजी' असेही म्हटले जायचे. नेताजी मुळचे पुणे जिल्ह्यातील शिरूर गावचे. त्यांनी अनेक युद्धे गाजवली.. अफजलखानाच्या वधाच्या वेळी अफजलखानाच्या सैन्याला हुसकावून लावण्यात नेताजींनी सिंहाचा वाटा उचलला होता. मात्र पुरंदरच्या तहानंतर श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांशी झालेल्या काही वादामुळे त्यांना स्वराज्यापासून दूर जावे लागले. तेव्हा त्यांनी मोगलांची चाकरी केली, पण पश्चाताप झाल्यामुले तब्बल नऊ वर्षांनी नेताजी पुन्हा स्वराज्यात आले. मोगलांनी त्यांना आणि त्यांच्या भावाला जिवाची धमकी देऊन मुसलमान होण्यास भाग पाडले. पण स्वराज्यात पुन्हा आल्यावर श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांनी पुन्हा योग्य विधी पार पाडून त्यांना परत हिंदू धर्मात प्रवेश दिला, व स्वतःच्या मुलीशी त्यांचा विवाह करून दिला. श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांनंतर त्यांनी श्रीमंत छत्रपती संभाजी महाराजांचीही चाकरी केली होती.
पुरंदर तहानंतर श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज, मिर्झा राजे, सरसेनापती नेताजी पालकर आणि दिलेरखान विजापूरवर चालून गेले. तेथे आदिलशाही सेनापती सर्जाखान याच्यासमोर ते चौघे अपयशी ठरत होते. आणि त्या अपयशाचे खापर दिलेरखान महाराजांवरच फोडू लागला. म्हणून विजापूरकरांचा पन्हाळगड जिंकण्यासाठी महाराज विजापुरहून परत आले, महाराजांनी रात्रीच गडावर छापा घातला. आदिलशाही किल्लेदार बेसावध असेल अशी महाराजांची खात्री होती पण किल्लेदार सावध होता. त्यात सरसेनापती नेताजी पालकर वेळेवर पोहोचून महाराजांना कुमक पोहोचवू शकले नाहीत. यात महाराजांचा पराभव झाला आणि सुमारे १००० माणसे मारली गेली. महाराज नेताजींवर चिडले आणि त्यांनी नेताजीला पत्राद्वारे "समयास कैसा पावला नाहीस" असे म्हणून बडतर्फ केले. मग नेताजी विजापूरकरांना जाऊन मिळाले. महाराज आग्र्याच्या भेटीस निघून गेल्यानंतर मिर्झाराजांनी नेताजी पालकरांना विजापूरकरांकडून मुघलांकडे वळवले.
श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा आग्ग्र्याहून औरंगजेबाच्या कैदेतून सुटण्यात यशस्वी झाले, तेव्हा शिवाजी सुटला, आत्ता प्रतिशिवाजी सुटू नये या विचाराने औरंगजेबाने नेताजी पालकरांच्या अटकेविषयीचे फर्मान दि.१९ ऑगस्ट १६६६ रोजी आग्रा येथून सोडले. नेताजी या वेळी मोगली छावणीत बीड नजीक धारूर येथे होते. दि.२४ ऑक्टोबर १६६६ रोजी मिर्झा राजे जयसिंह यांनी नेताजी आणि त्यांचे चुलते कोंडाजी यांना अटक केली. दिलेरखानाने त्यांना आग्र्याला पाठवायची व्यवस्था केली. ४ दिवसांच्या अतोनात हालानंतर नेताजींनी धर्मांतरास मान्यता दिली. दि.२७ मार्च १६६७ रोजी नेताजी मुस्लिम झाले व त्यांचे 'मुहम्मद कुलीखान' असे नामकरण करण्यात आले (जून १६६७). औरंगजेबाच्या हुकुमाप्रमाणे नेताजी काबूल कंदाहाराच्या मोहिमेवर रवाना झाले. लाहोरजवळ आल्यावर त्यांनी पळून जाण्याचा एक अपयशी प्रयत्न केला. पण पुढे ९ वर्षे नेताजी काबूल कंदाहार येथेच मोहिमेवर होते.
श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांच्या समोर औरंगजेबाचे सर्व सरदार अपयशी ठरत होते, त्यावेळी औरंगजेबाला 'प्रतिशिवाजीची' आठवण झाली. मग त्याने या 'मुहम्मद कुलीखानास', दिलेरखानासोबत महाराष्ट्रावर मोहिमेसाठी पाठवले.मे १६७६. रोजी पच्छाताप झालेले नेताजी मोगली छावणीतून पळून रायगडावर महाराजांकडे आले. १९ जून १६७६ रोजी श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांना पुन्हा विधिवत हिंदू धर्मामध्ये घेतले.
महाराज व नेताजी नातलग आहेत असे उल्लेख मोगली अखबारातून मिळतात. महाराजांची पत्नी पुतळाबाई राणीसाहेब यांचे माहेर पालकर घराण्यातले आहे. महाराजांची एक राजकन्या कमलाबाई हिचे लग्न जानोजी पालकरांशी झाले. पण जानोजी अन् पुतळाबाई यांचे नेताजींशी काय नाते होते हे फार मोठे प्रश्नचिन्ह अजूनही आहे. 'छावा' नुसार नेताजी पालकर शिवरायांच्या एक महाराणी सगुणाबाई यांचे सख्खे काका होते.
[स्रोत- वरील सर्व माहिती राजा शिवछत्रपति (लेखक- बाबासाहेब पुरंदरे) आणि छावा (लेखक- शिवाजी सावंत) या दोन ग्रंथांमधून घेतलेली आहे.
♻ *धर्मांतर ते धर्मांतर*
नेताजी पालकर म्हणून आपण ज्यांना ओळखतो, त्यांचं नाव मुळात नेतोजी. त्याचं नेताजी कसं झालं हे माहित नाही. पण त्यांच्या पत्रातून मात्र नेतोजी असंच नाव येत.
तर हे नेतोजी पालकर शिवाजी महाराजांचे सरनौबत. महाराजांनी त्यांना हाकलून दिल्यावर ते आधी आदिलशाहीला आणि नंतर मुगलांना सामिल झाले. महाराज आग्र्याहून निसटल्यानंतर औरंगजेबाने नेतोजी पालकरला कैद करण्याचा आदेश दिला. त्यानुसार नेतोजीला धारुर इथं दग्याने पकडण्यात आलं आणि आग्र्याला पाठविण्यात आलं. तिथं त्यांचं धर्मांतर करण्यात आलं. मुहम्मद कुलीखान असं नाव आणि तीन हजाराची मनसब त्यांना देण्यात आली. आणि मग त्यांना काबूल-कंदहारला पाठविण्यात आलं. तेथून पळून जाण्याचा त्यांनी दोनदा प्रयत्न केला. पण दोन्ही वेळेस त्यांना पकडण्यात आलं. 1676मध्ये दिलेरखानाच्या सैन्याबरोबर ते दक्षिणेत आले. आणि संधी मिळाली तसे ते मुगलांकडून शिवाजी महाराजांकडे परतले. नंतर त्यांची शुद्धी करण्यात आली आणि त्यांना पुन्हा हिंदू धर्मात घेण्यात आलं. "जेधे शकावली'नुसार ""शके 1598 नळ संवत्सर, आषाढ वद्य चतुर्दशी (11 जून 1676) नेताजी पालकर याने प्रायश्चित्त घेतले आणि ते शुद्ध झाले.''
शिवाजीने नेतोजीची शुद्धी केली ही कथा जाणीवपूर्वक उच्चरवाने सांगितली जाते. पण शुद्धी महाराजांनीच केली याला कसलाही कागदोपत्री पुरावा नाही! की नेतोजी मुगलांकडून परतल्यानंतर महाराजांनी त्यांना आपल्या नोकरीत ठेवल्याबद्दल कोणतीही कागदपत्रं उपलब्ध नाहीत! "शिवचरित्र साहित्य' खंड 3 मधील काही पत्रांनुसार इ.स. 1690च्या सुमारास, म्हणजे संभाजीराजांच्या मृत्युनंतर स्वराज्य संकटात सापडले असताना नेतोजी परत मुगलांना सामील झाल्यासारखा दिसतो. शिवाजीराजांनी इंदापूरच्या मशिदींची वतनं बंद केली होती. ती त्यांनी परत सुरू केली. यावेळी ते मुगल मनसबदार झालेले असावेत.
राजवाडे खंडात एका पत्रात नेतोजीबद्दल आणखी माहिती मिळते. शंकराजी नारायण सचिव यांनी बाजी सर्जाराव जेध्याला लिहिलेल्या या पत्रात असं म्हटलं आहे, की "औरंगजेब पातशहाने या देशीचे कित्येक मुसलमान करावे ऐसे केले आहे. त्याउपर नेतोजीराजे.... घाटगे, जानोजीराजे यासहित कित्येक ब्राह्मणांसही मुसलमान केले आहे.'' हे पत्र 1690 मधील आहे. यातील नेतोजीराजे म्हणजे नेतोजी पालकर आणि जानोजीराजे म्हणजे शिवाजी महाराजांचे जावई जानोजीराजे पालकर!
म्हणजे काय तर खुद्द शिवाजी महाराजांचे व्याही आणि जावई हे दोघे धर्मांतर करून मुसलमान झाले होते!!
नेतोजी पुढे नांदेडजवळ वारले. त्यांच्या वारसांकडे अनेक मुगल फर्मानं मिळाली आहेत.
संदर्भ -
- इतिहास - सत्य आणि आभास - निनाद बेडेकर, सत्याग्रही विचारधारा, दिवाळी 1998.
- छत्रपती शिवाजी - सेतुमाधवराव पगडी, एनबीटी, सहावी आवृत्ती 2004, पृ. 79.
नेताजी पालकर यांची समाधी तामसा (तालुका .हदगाव, जि.नांदेड) येथे आहे.
📽 *चित्रपट*
नेताजी पालकर (चित्रपट, १९७८, दिग्दर्शक कमलाकर तोरणे)
📚 *नेताजी पालकर यांच्याविषयी लिहिली गेलेली मराठी पुस्तके*
अग्निदिव्य (कल्याणीरमण बेन्नुरवार)
नेताजी पालकर (जगदीश खेबुडकर)
नेताजी पालकर : स्वराज्याच्या पहिल्या घनघोर संग्रामात, मिचेल मॅकमिलन यांनी पाहिलेले (लेखक - मायकेल मॅकमिलन, मराठी अनुवाद - पंढरीनाथ सावंत)
शिवबाचा शिलेदार (कादंबरी, ल.ना. जोशी)
*हर हर महादेव.....!*
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा