*धन्य धन्य महात्मा फुले*
--------------------------------
*महात्मा जोतिराव फुले यांच्या २०० व्या जयंती वर्षाला (११ एप्रिल) सुरुवात झाली आहे. त्या निमित्ताने विशेष लेख.*
-----------------------------------
✍️ *ज्ञानेश महाराव*
(ज्येष्ठ पत्रकार- संपादक)
-------------------------------------
महात्मा जोतिराव फुले माणूस एक, पण त्यांची कार्य रूपे अनेक! आणि त्यांच्या विविधांगी कार्यातून प्रेरणा घेऊन समाज परिवर्तनाच्या कार्यासाठी आपलं जीवन समर्पित केलं, अशा महामानवांची संख्या तर कित्येक! त्यातील, राजर्षी शाहू महाराज, "विश्वरत्न" डॉ. बाबासाहेब आंबेडकर, पहिले "शिवचरित्र"कार कृष्णाजी अर्जुन केळुस्कर, पहिले कामगार नेते नारायण मेघाजी लोखंडे, देशातील पहिल्या विद्यार्थीनी आणि शिक्षिका सावित्रीबाई फुले, लेखिका ताराबाई शिंदे, पंडिता रमाबाई, भारताचे पहिले कृषीमंत्री डॉ. पंजाबराव देशमुख, संत गाडगे महाराज, "प्रबोधन"कार ठाकरे, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे, कर्मवीर भाऊराव पाटील, क्रांतिसिंह नाना पाटील, रामास्वामी पेरियार, कांशीराम, डॉ. बाबा आढाव, डॉ. एन. डी.पाटील अशांचा उल्लेख आवर्जून केला पाहिजे. आचार्य अत्रे यांनी "महात्मा जोतिराव फुले" हा चित्रपट (१९५२) काढून त्यात स्वतः भूमिका केली आणि प्रबोधनकार ठाकरे, ग. दि. माडगूळकर, शाहीर अमर शेख यांच्याकडूनही भूमिका करवून घेतल्या. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी ह्या चित्रपटाचे प्रास्ताविक केलं आहे. असंख्यांना प्रेरणा देणाऱ्या जोतीरावांचा "महात्मा" होण्यापर्यंत प्रवास एका पुस्तकामुळे झाला आहे.
जोतिराव फुले ह्यांचा जन्म ११ एप्रिल १८२७ रोजी सातारा जिल्ह्यातील कटगुण गावात; शेतकरी कुटुंबात झाला. शिक्षणानिमित्ताने ते पुण्यात आले. तरुण वयात त्यांनी लेखन थॉमस पेन यांनी लिहिलेलं "राईटस् ऑफ मॅन" हे पुस्तक वाचलं. थॉमस पेन यांचा हा ग्रंथ युरोप आणि अमेरिकेतही अत्यंत विचारप्रवर्तक ठरला होता. त्यातील स्वातंत्र्य व समतेचे विचार आणि लोकशाहीचा आग्रह जोतिरावांना भावला. यामुळेच त्यांना वर्णव्यवस्थेने जातीनिशी ठेवलेल्या शूद्र-अतिशूद्रांच्या गुलामगिरीची जाणीव झाली; आणि त्यांनी समाज परिवर्तनासाठी धर्मचिकित्सा आणि जातीभेदावर टीका करण्यास सुरुवात केली. ते कर्ते समाज सुधारक असल्याने त्यांनी आपल्या वयाच्या २१ व्या वर्षी पुण्यात देशातील मुलींची पहिली शाळा (१८४८) केली आणि भारतातील सार्वत्रिक स्त्री स्वातंत्र्याचा पाया रचला.
धर्म व्यवस्थेने आपल्या स्वार्थासाठी अस्पृश्य ठेवलेला समाज, महिला, शेतकरी, कामगार यांच्या शिक्षणावर विशेष भर दिल्याचे "फुलेपर्व" साक्ष देतं. जोपर्यंत हे चार समाज घटक शिक्षित होत नाहीत, तोपर्यंत त्यांच्या प्रगतीचा मार्ग मोकळा होणार नाही आणि सामाजिक विषमता नष्ट होणार नाही, हे जोतिराव फुले यांना पक्के ठाऊक होते. म्हणून त्यांनी ह्या चारही घटकांच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षणाबरोबरच बुद्धिप्रामाण्यवाद आणि विज्ञाननिष्ठा रुजविण्याचे आणि वाढवण्याचे कार्यही सुरू केले. त्यासाठी कष्टकऱ्यांसाठी १८५५ मध्ये "रात्र शाळा" सुरू केली. अस्पृश्य ठरवलेल्यांसाठी आपल्या घरापुढील मालकीचा हौद पिण्याच्या पाण्यासाठी खुला केला. देव, दैव आणि धर्मग्रंथ ह्यांच्या माध्यमातून ब्राह्मणेतरांच्या जीवनाला "भटीपाश" कसा आवळला जातो, ते त्यांनी "ब्राह्मणाचे कसब" (१८६९) आणि "गुलामगिरी" (१८७३) ह्या ग्रंथांतून उघडं केलंय. "गुलामगिरी"तील जोतिबा - धोंडिबा या पात्रांच्या संवादातून त्यांनी पुराणातल्या "दशावतार"च्या बनावाचा शास्त्रशुद्ध "दुर्दशावतार" केला आहे. "गुलामगिरी"च्या नवव्या भागात मनुस्मृती, वेदमंत्र, मूठ मारणे, देव्हारे घुमवणे आदि ब्रह्मघोटाळ्यांचे खंडण आहे. त्यातला हा संवाद पहा.
*धोंडिबा :* ब्रह्म्याच्या तोंडातून चार वेद निर्माण झाले, असे ब्राह्मण म्हणतात!
*जोतिबा:* तसे असेल तर, ब्रह्म्या मेल्यावर ब्रह्मऋषी आणि देवऋषी यांनी रचलेली सूक्ते वेदात कशी आली?
अशा नेमक्या शब्दांत सनातनी थापेबाजीचा चेंदामेंदा करण्याचा सपाटा जोतिरावांनी सर्वच लेखनातून लावला आहे. "शेतकऱ्याचा असूड" (१८८५) आणि "इशारा"(१८८५) ह्या ग्रंथात जोतिबाची लेखणी अधिक तिखट झाली आहे. शतकानुशतकांची गुलामगिरी अमानुष असल्याने, ती व्यक्त होतानाच "गंगोत्री" नाही, तर ती "लाव्हा" बनूनच उसळणार! तशी ती झालीय. पण त्यात विध्वंसक विद्वेष नाही; वेदनेचा विद्रोह मात्र निश्चित आहे. तो "सत्सार-भाग १ व २" (१८८५) आणि महात्मा फुले यांच्या मृत्यू (२९ नोव्हेंबर १८८८) नंतर प्रकाशित झालेल्या "सार्वजनिक सत्यधर्म" ह्या ग्रंथातूनही दिसतो.
ह्या ग्रंथात फुले म्हणतात, "मनुष्य हा देखील प्राणीच आहे. मग पशु- पक्ष्यात नसलेल्या जाती मनुष्यप्राण्यात कशा? प्राण्यात ब्राह्मण कसे शोधायचे?" म्हणूनच फुले अभंगांसारखेच असलेल्या "अखंड"मधून लिहितात -
*पिढीजात बुद्धी, नाही कुणामध्ये*
*शोध करा आधी, पूर्तेपणी*
महात्मा फुले यांनी "सत्यशोधक समाज"ची स्थापना (१८७३) केली होती. "सत्य हा धर्म" अशी त्यांची आग्रही भूमिका होती. यासाठीच ते म्हणत -
*धर्मराज्य भेद, मानवा नसावे*
*सत्याने वर्तावे, इशासाठी ।*
*निर्मिकाचा धर्म, सत्य आहे एक*
*भांडणे अनेक, कशासाठी?*
*मानवांनो तुम्ही, निर्मिकास व्हावे*
*सर्वसुखी व्हावे, ज्योती म्हणे॥*
महात्मा फुले यांनी ग्रंथलेखन केलं; अखंड काव्यलेखन केलं; तसाच पेशवाईत कालबाह्य करण्यात आलेल्या छत्रपतींच्या पराक्रमाचा आणि त्यांच्या रायगडावरील समाधीचा शोध घेऊन ; त्यावर पोवाडा (१८६९) रचला. जोतिराव शाहीरही झाले. त्याआधी "तृतीयरत्न" नाटक (१८५५) लिहून नाटककारही झाले होते. २१ वेळा पृथ्वी नि:क्षत्रिय करणाऱ्या "चिरंजीवी आदिनारायण परशुराम"ला वकिली थाटाची नोटीस लिहून निबंध-लेखनाचा अभिनव नमुना त्यांनी सादर केला होता. त्यात ते म्हणतात, "... तुझ्या वेदमंत्रांचे चमत्कार फ्रेंच, इंग्लिश लोकांस करून दाखीव. ( चिरंजीवी आहेस ना? मग) तू असा तोंड चकवून फिरू नकोस. (सहा महिन्यांची मुदत देतो.) अन्यथा, तुझ्या विविध ज्ञानी ब्राह्मण बच्च्यांची फटफजिती होईल!"
जोतिराव फुलेंनी सामाजिक विषमता निर्माण आणि जतन करणाऱ्यांवर "तुमची बुक्की, तर आमची लाथ" ह्या हिकमतीने लेखणी - वाणीतून प्रहार केले. हे एकतर्फी नाही. त्यांनी भिक्षुकशाहीला रूढी-परंपरेच्या नावाखाली आपसूक बळी जाणाऱ्यांच्याही कानपिचक्या घेतल्या आहेत. भोंदू गुरू- बुवांच्या नादी लागणाऱ्या महिलांबाबत फुले म्हणतात -
*जप- अनुष्ठाने स्त्रिया, मुले होती*
*दुजा (पती) का करिती, मुलांसाठी।*
*अनुष्ठानावीण विधवा मुले देती*
*मारुनी टाकती, सांदीकोनी॥*
अशीच कठोर टीका फुले भोंदू साधूंवर करताना लिहितात -
*शिरी जटाभार, वाची भटी शास्त्र*
*सोंग रंगविले, साधू झाला।*
*सत्यवीण साधू, मानव बनले*
*सर्व वाया गेले, जोती म्हणे॥*
'पुनर्जन्म', 'पूर्वसंचित', 'कर्मफल सिद्धान्त', 'ब्रह्मांड' ह्या साऱ्या कल्पना खोट्या असल्याचे जोतिरावांनी सप्रमाण दाखवून दिलंय. तरीही ते अजूनही फुले-कार्याच्या लाभार्थींच्या डोक्यात घुसलेलं नाही. कारण, काही वाचत नाहीत. म्हणूनच जोतिराव कळवून सांगतात -
*थोडे दिन तरी, मद्य वर्ज्य करा*
*तोच पैसा भरा, ग्रंथासाठी।*
*ग्रंथ वाचताना, मनी शोध करा*
*देऊ नका थारा, वैरभावा॥*
महात्मा जोतिराव फुले यांच्या २०० व्या जयंती वर्षात; महात्मा फुले यांनी स्वतः लिहिलेल्या साहित्याचे वाचन करण्याचा निश्चय करा. त्याने तुमचे आणि देशाचेही भले होईल.
###
(प्रसिद्धी : दै. देशोन्नती, रविवार, ११ एप्रिल २०२६)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा