महाश्वेता देवी
१४ जानेवारी १९२६ - २८ जुलै २०१६)
२३ एप्रिल रोजी जगभर 'पुस्तक दिन' साजरा होईल. त्या अनुषंगाने ज्येष्ठ भारतीय लेखिका महाश्वेता देवी यांचं स्मरण करणं उचित ठरावं. पद्मविभूषण, ज्ञानपीठ, रेमन मॅगसेसे तसंच सार्क साहित्य पुरस्कार अशा भारतीय आणि जागतिक पुरस्कारांसोबतच त्यांना 'ऑफिसर ऑफ आर्टस् अँड लिटरेचर' हा फ्रान्सचा दुसऱ्या क्रमांकाचा सर्वोच्च नागरी सन्मान प्राप्त झाला. त्यांच्या अतुलनीय साहित्यिक
योगदानाची ही एक पावतीच म्हणायला हवी.
बंगाली लेखिका व विशेषतः आदिवासींसाठी संघर्षात्मक आणि रचनात्मक कार्य करणाऱ्या महाश्वेता देवी यांचा जन्म १४ जानेवारी १९२६ रोजी ढाक्यात झाला. त्यांचे वडील मनीष घटक हे बंगाली लेखक, तर भाऊ ऋत्विक घटक हे सुप्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक ! महाश्वेता देवींनी १९४६ मध्ये रवींद्रनाथ टागोर यांनी स्थापन केलेल्या शांतिनिकेतनमधून इंग्रजी विषयात पदवी घेतली. त्यानंतर त्यांनी इंग्रजी साहित्यात विश्वभारती विद्यापीठातून एम.ए. केलं. पुढे इंग्रजीच्या प्राध्यापिका म्हणून महाविद्यालयात त्यांनी नोकरी केली. नोकरी, सामाजिक कार्य आणि आदिवासींच्या हक्कांसाठी संशोधकीय, संघर्षात्मक व
रचनात्मक कार्य करत असतानाच लेखणीशी
असलेली नाळ त्यांनी तुटू दिली नाही. साधारणतः विसाव्या शतकाच्या मध्यात, १९५०-६०च्या दशकात महाश्वेता देवींनी साहित्य लेखनाला सुरुवात केली. वैविध्यपूर्ण आणि भरपूर सकस साहित्य त्यांनी निर्माण केलं. त्यांच्या साहित्याचा अनुवाद अनेक भाषांमध्ये झाला. त्या अथनि त्यांनी बंगालीच नाही, तर भारतभरच्या आणि जगभरच्या विविध भाषिक वाचकांना समृद्ध केलं. पत्रकारिता आणि स्तंभलेखनावरही स्वतःचा स्वतंत्र ठसा त्यांनी उमटवला. जगाकडे बघावं कसं, अभ्यास कसा करावा, संशोधकीय आणि साहित्यिक शैलीत ते मांडावं कसं याचा वस्तुपाठ त्यांनी घालून दिला. भारतीय महिलांच्या साहित्यिक योगदानाला एका उंचीवर नेऊन ठेवण्यात महाश्वेता देवी यांचा महत्त्वपूर्ण आणि अद्वितीय वाटा आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा